Home ब्रेकिंग न्यूज डेटा-लिकप्रकरणी सीईटी केंद्रांचे फॉरेन्सिक ऑडिट

डेटा-लिकप्रकरणी सीईटी केंद्रांचे फॉरेन्सिक ऑडिट

0
डेटा-लिकप्रकरणी सीईटी केंद्रांचे फॉरेन्सिक ऑडिट

मुंबई: एमएच-सीईटी परीक्षेतील गैरप्रकारांच्या तक्रारींची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील तक्रार असलेल्या सर्व सीईटी केंद्रांचे फॉरेन्सिक ऑडिट करण्याचे निर्देश रविवारी दिले. तसेच, डेटा लीक प्रकरणाचेही फॉरेन्सिक ऑडिट करून त्याचा तपास सहपोलिस आयुक्तांमार्फत करण्याचे आदेश त्यांनी दिले. याप्रकरणी दोषी आढळणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. (CET Exam)

एमएच-सीईटीशी संबंधित विविध समस्या आणि तक्रारी मांडण्यासाठी राज्यभरातील शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने रविवारी मुख्यमंत्री फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली. यावेळी त्यांनी विद्यार्थी आणि शिक्षकांशी चर्चा करून त्यांच्या तक्रारी जाणून घेतल्या. शिष्टमंडळाने मांडलेल्या सर्व तक्रारी मुख्यमंत्र्यांनी ऐकून घेतल्यानंतर संबंधित यंत्रणांना कारवाईचे निर्देश दिले. (Cm Devendra Fadanvis)

https://www.prahaar.in/2026/09/13/friendship-via-tinder-dating-app-two-sisters-harassed-by-two-young-men-after-meeting-through-an-online-connection/

एमएच-सीईटी परीक्षेदरम्यान ज्या केंद्रांबाबत तक्रारी करण्यात आल्या आहेत, अशा सर्व केंद्रांचे फॉरेन्सिक ऑडिट केले जाणार आहे. शिक्षकांनी मांडलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने एफआयआर दाखल करून सहपोलिस आयुक्तांमार्फत त्याचा तपास करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. डेटा लीकच्या तक्रारींचेही फॉरेन्सिक ऑडिट करून त्याचा तपास सहपोलिस आयुक्तांमार्फत केला जाणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. या प्रकरणात दोषी आढळणाऱ्या सर्वांवर कठोर कारवाई केली जाईल. यासंदर्भातील आदेश तत्काळ मुंबई पोलीस आयुक्तांना देण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, एमएच-सीईटी परीक्षेतील कथित घोळाचा मुद्दा गेल्या महिनाभरापासून विद्यार्थी आणि पालकांकडून उपस्थित केला जात आहे. सीईटीमधील पर्सेंटाइलबाबतच्या तक्रारी तसेच डेटा लीक प्रकरणात तत्काळ कारवाई करण्याची मागणी विद्यार्थी आणि शिक्षकांकडून केली जात होती. या पार्श्वभूमीवर शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. परीक्षा ऑनलाइन घेण्याऐवजी पूर्वीप्रमाणे ऑफलाइन पद्धतीने घ्यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here