मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ताफ्यात ५ हजार नव्या ‘लालपरी’ दाखल होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या बसेसच्या खरेदीची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, सर्वांत कमी दराचा देकार टाटा मोटर्सने सादर केला आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी रविवारी दिली. नव्या बसेसमुळे जुन्या बसगाड्यांवरील ताण कमी होऊन ग्रामीण भागातील बसफेऱ्या वाढविण्यास मदत होणार आहे.
पुढील सहा महिन्यांत एसटीच्या ताफ्यातील सुमारे ५ हजारांहून अधिक बसेस कालबाह्य होऊन भंगारात जाणार आहेत. सध्या नाईलाजाने १२ ते १४ वर्षे जुन्या बसेसची दुरुस्ती करून त्यांचा प्रवासी सेवेसाठी वापर करावा लागत आहे. या बसेस वारंवार नादुरुस्त होत असल्याने प्रवाशांना तसेच चालकांना त्रास सहन करावा लागतो. नव्या बसेस दाखल झाल्यानंतर ही समस्या कमी होण्याची अपेक्षा आहे.
https://www.prahaar.in/2026/09/13/do-not-obstruct-roads-or-footpaths-by-displaying-advertisements/
ग्रामीण महाराष्ट्राच्या लोकवाहिनीला मिळणार नवी ताकद
एसटीने यापूर्वीच ताफ्याच्या आधुनिकीकरणाला सुरुवात केली आहे. २ बाय २ आसन व्यवस्थेच्या २ हजार ६४० ‘लालपरी’ ताफ्यात दाखल झाल्या आहेत. तसेच ३ बाय २ आसन व्यवस्थेच्या ३ हजार ‘राजमाता जिजाऊ’ बसेस दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आता आणखी ५ हजार बसेसची भर पडल्याने एसटीचा ताफा अधिक सक्षम होणार आहे.
सध्या बसगाड्यांची कमतरता असल्याने शालेय फेऱ्या अचानक रद्द होणे, ग्रामीण भागातील मुक्कामी बसफेऱ्या उपलब्ध न होणे, अशा समस्या निर्माण होत आहेत. नव्या बसेस ताफ्यात दाखल झाल्यानंतर ‘मागेल त्याला बसफेरी’ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे सरनाईक यांनी सांगितले. मात्र, बसफेरीची मागणी करणाऱ्यांनी संबंधित फेरी तोट्यात जाणार नाही, याची हमी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
https://www.prahaar.in/2026/09/13/the-number-of-artificial-ponds-for-this-years-ganeshotsav-has-increased-by-as-many-as-85-the-municipal-administration-has-appealed-to-ganesh-devotees-to-immerse-their-idols-in-these-artificial-pond/
५ हजार ‘लालपरी’चा हा टप्पा एसटीच्या पारंपरिक डिझेल बस ताफ्याच्या विस्तारातील महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. त्यानंतर पर्यावरणपूरक ई-बसेसच्या दिशेने एसटीचा प्रवास अधिक वेगाने सुरू करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे ताफ्याच्या विस्तारासोबतच आधुनिकीकरण आणि पर्यावरणपूरक वाहतुकीवरही भर दिला जाणार आहे, असे परिवहनमंत्री म्हणाले.