मुंबई: श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर यांच्या जन्मस्थानाचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील भुईकोट किल्ल्याला राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा देण्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी रविवारी केली. याबाबत सुधारित प्रस्तावाला सांस्कृतिक विभागाने मान्यता दिली असून, लवकरच शासन निर्णय जाहीर करण्यात येणार आहे.
https://www.prahaar.in/2026/09/13/commuting-for-mumbaikars-set-to-get-a-major-boost-work-on-the-dahisar-bhayandar-coastal-route-is-progressing-rapidly-a-45-minute-journey-will-be-cut-down-to-15-minutes/
भुईकोट किल्ल्याचा ऐतिहासिक तपशील, सीमा आणि क्षेत्रफळ आदी बाबींची पुनर्तपासणी करून सुधारित प्रस्ताव तयार करण्यात आला. या प्रस्तावाला सांस्कृतिक विभागाने मान्यता दिली आहे. राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा मिळाल्यानंतर या ऐतिहासिक वास्तूचे संरक्षण आणि संवर्धन अधिक प्रभावीपणे करता येणार आहे. श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर यांच्या जन्मस्थळाचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन त्याचे जतन करणे, त्याचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवणे आणि या इतिहासाची माहिती उपलब्ध करून देणे, या उद्देशाने ही कार्यवाही करण्यात आली आहे, असे शेलार यांनी सांगितले.
सुधारित प्रस्तावाला सांस्कृतिक विभागाची मान्यता
महाराजा यशवंतराव होळकर यांच्या पराक्रमाचा आणि ऐतिहासिक योगदानाचा गौरव करताना त्यांच्या जन्मभूमीचे जतन होणे आवश्यक आहे. भुईकोट किल्ल्याला राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा मिळाल्याने या ऐतिहासिक वास्तूचे संरक्षण आणि संवर्धन अधिक प्रभावीपणे करता येईल, असेही शेलार यांनी स्पष्ट केले. या निर्णयामुळे महाराजा यशवंतराव होळकर यांच्या इतिहासाशी संबंधित या महत्त्वाच्या स्थळाच्या संवर्धनाला चालना मिळणार आहे. तसेच, भविष्यात या परिसराचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा म्हणून विकास करण्यासही मदत होणार असल्याचे सांस्कृतिक विभागाकडून सांगण्यात आले.