Home क्राईम Jalgaon Crime : जळगावात ‘सिद्ध साधू’ बनून भामट्यांची हातचलाखी, आशीर्वादाच्या बहाण्याने ७० हजारांची सोन्याची अंगठी लंपास

Jalgaon Crime : जळगावात ‘सिद्ध साधू’ बनून भामट्यांची हातचलाखी, आशीर्वादाच्या बहाण्याने ७० हजारांची सोन्याची अंगठी लंपास

0
Jalgaon Crime : जळगावात ‘सिद्ध साधू’ बनून भामट्यांची हातचलाखी, आशीर्वादाच्या बहाण्याने ७० हजारांची सोन्याची अंगठी लंपास
Crime

Jalgaon Crime : पत्ता विचारण्याच्या बहाण्याने नागरिकाला कारजवळ बोलावून ‘हरिद्वारचे सिद्ध साधू’ असल्याचा बनाव करत हातचलाखीने सोन्याची अंगठी लांबविल्याचा धक्कादायक प्रकार शहरातील गिरणा पंपिंग रोड परिसरात उघडकीस आला आहे. मॉर्निंग वॉक करून घरी परतणाऱ्या व्यक्तीच्या हातातील सुमारे ७० हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी अज्ञात भामट्यांनी लंपास केली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं काय घडलं ?

दिलीप बाबूराव सुरवाडे (रा. गुलमोहर हौसिंग सोसायटी, जळगाव) हे नेहमीप्रमाणे सकाळी मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले होते. सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास वाघनगर परिसरातून पायी घरी परतत असताना एका गोदामासमोर त्यांना विनाक्रमांकाची पांढऱ्या रंगाची कार दिसली. कारमधील दोघांनी सुरवाडे यांना थांबवत ‘मंदिर कुठे आहे?’ अशी विचारणा केली. सुरुवातीला हा केवळ पत्ता विचारण्याचा प्रकार असल्याचे वाटल्याने सुरवाडे यांनी त्यांच्याशी संवाद साधला. त्यानंतर चालकाने ‘मला ऐकू येत नाही, पुढे येऊन सांगा,’ असे सांगत त्यांना कारजवळ बोलावून घेतले. (Jalgaon Crime News)

https://www.prahaar.in/2026/09/11/jalgaon-crime-news-enraged-over-constant-conversations-with-his-mother-a-17-year-old-minor-killed-a-35-year-old-man/

आशीर्वादाच्या बहाण्याने सोन्याची अंगठी लंपास

कारमध्ये साधूच्या वेशातील एक व्यक्ती आधीच बसलेली होती. चालकाने कारमधील व्यक्ती हरिद्वारहून आलेले सिद्ध साधू असल्याचे सांगत सुरवाडे यांना त्यांचे दर्शन घेण्यास प्रवृत्त केले. अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवून सुरवाडे कारजवळ गेले. यानंतर साधूच्या वेशातील भामट्याने आशीर्वाद देण्याच्या बहाण्याने सुरवाडे यांच्या हातात १०० रुपयांची नोट ठेवली. त्यावर सुरवाडे यांनी, ‘मला पैसे नकोत, फक्त आशीर्वाद द्या,’ असे सांगितले. याच संधीचा फायदा घेत संबंधित व्यक्तीने हातचलाखी करत सुरवाडे यांच्या उजव्या हाताच्या बोटातील सोन्याची अंगठी काढून घेतली. (Jalgaon Crime News)

रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

काही क्षणांतच अंगठी हातातून काढून घेतल्याचे सुरवाडे यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ अंगठी परत मागितली. मात्र, काही समजण्याच्या आतच कारचालकाने वाहन सुरू केले आणि भरधाव वेगाने तेथून पसार झाला. सुरवाडे यांनी आरडाओरड करून कार थांबविण्याचा प्रयत्न केला; मात्र तोपर्यंत संशयित दूर निघून गेले होते. घटनेनंतर दिलीप सुरवाडे यांनी रामानंद नगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Jalgaon Crime News)

संशयितांनी वापरलेली पांढऱ्या रंगाची कार विनाक्रमांकाची असल्याने त्यांची ओळख पटविणे पोलिसांसमोर आव्हान ठरले आहे. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे चित्रण तपासण्यास सुरुवात केली आहे. कार कोणत्या दिशेने गेली, त्यामध्ये किती व्यक्ती होत्या आणि संशयितांची ओळख पटू शकते का, याचा तपास सुरू आहे. तसेच, धार्मिक व्यक्ती असल्याचे भासवून नागरिकांना गंडा घालणाऱ्या टोळीचा यामागे सहभाग आहे का, याचाही तपास पोलिसांकडून केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here