गोव्यात जलवाहतुकीचा प्रत्यक्ष अनुभव; सिंधुदुर्गात जहाजबांधणी, दुरुस्ती उद्योगाच्या संधींचा अभ्यास
मुंबई : सिंधुदुर्गासह संपूर्ण कोकणातील खाड्या, नद्या आणि सागरी संपत्तीचा नियोजनबद्ध वापर करून जलवाहतुकीचे नवे मार्ग विकसित करण्याच्या दृष्टीने राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी गुरुवारी गोव्यातील जलवाहतूक व्यवस्थेचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. चोडना ते रायबंदर या जलमार्गावर प्रवासी तसेच वाहने घेऊन जाणाऱ्या ‘रो-रो’ फेरीबोटीने प्रवास करून त्यांनी या व्यवस्थेची माहिती घेतली. त्यानंतर उत्तर गोव्यातील प्रका इंजिनिअरिंग शिपयार्डला भेट देऊन जहाजबांधणी आणि जहाजदुरुस्ती उद्योगाच्या कार्यपद्धतीचीही पाहणी केली.(Minister Nitesh Rane)
जलवाहतुकीबरोबरच जहाजबांधणी आणि जहाजदुरुस्ती उद्योगाच्या विस्ताराच्या दृष्टीनेही राणे यांनी शिपयार्डची पाहणी केली. शिपयार्डमधील जहाजबांधणी व दुरुस्तीची कार्यपद्धती, डाय डॉकची सुविधा, त्यासाठी आवश्यक पायाभूत व्यवस्था तसेच या उद्योगातून निर्माण होणाऱ्या रोजगार आणि व्यवसायाच्या संधींची माहिती त्यांनी घेतली. महाराष्ट्राला लाभलेली विस्तीर्ण किनारपट्टी, बंदरे आणि जलवाहतुकीची क्षमता लक्षात घेता राज्यात जहाजबांधणी व जहाजदुरुस्ती उद्योगाच्या विकासाला मोठी संधी असल्याचे राणे यांनी म्हटले.(Minister Nitesh Rane)
या पाहणीवेळी प्रका इंजिनिअरिंग शिपयार्डचे व्यवस्थापकीय संचालक प्रियेश कामत, प्रशांत देसाई, उद्योजक डॉ. निलेश बाणावलीकर, सूरज देव्हाद्या, बाबू नाईक, साईल देसाई तसेच जिल्हा परिषद सदस्य मनोज रावराणे, मिलिंद मेस्त्री, संदीप साटम, संतोष कानडे, डॉ. अमोल तेली आदी उपस्थित होते.
https://www.prahaar.in/2026/09/10/international-travel-from-navi-mumbai-airport-set-to-become-cheaper-aera-approves-vtp-concessions/
फायदा काय होणार?
- विशेषतः सिंधुदुर्गातील उपलब्ध सागरी संसाधने, बंदर सुविधा आणि जलवाहतुकीची क्षमता यांचा योग्य नियोजनातून वापर केल्यास स्थानिक युवकांसाठी प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्ष रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होऊ शकतात. त्याचबरोबर पूरक उद्योग, तांत्रिक कौशल्य, सेवा क्षेत्र आणि स्थानिक व्यवसायांच्या विकासालाही या उद्योगामुळे गती मिळू शकते. त्यामुळे महाराष्ट्राच्या सागरी क्षमतेचा प्रभावी वापर करून जहाजबांधणी आणि जहाजदुरुस्ती क्षेत्रात राज्याला अग्रणी स्थान मिळवून देण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनांचा अभ्यास सुरू असल्याचे राणे यांनी सांगितले.
- सिंधुदुर्गातील सागरी संसाधने आणि उपलब्ध पायाभूत सुविधांचा एकत्रित व नियोजनबद्ध वापर करून जलवाहतूक तसेच जहाजबांधणी क्षेत्राला चालना देणे, हा या पाहणीमागील प्रमुख उद्देश असल्याचे सांगण्यात आले. या माध्यमातून किनारपट्टीवरील अर्थव्यवस्थेला चालना देण्यासोबतच स्थानिक पातळीवर नवीन रोजगार आणि औद्योगिक विकासाच्या संधी निर्माण करण्याचा प्रयत्न आहे, असे यावेळी मंत्री नितेश राणे म्हणाले.(Minister Nitesh Rane)