मुंबई : आज रविवार 6 सप्टेंबर रोजी मध्य आणि पश्चिम रेल्वेवर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे रविवारी मुंबई उपनगरीय रेल्वे प्रवाशांना प्रवासाचे नियोजन करूनच घराबाहेर पडण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे. (Mumbai Mega Block )
मध्य रेल्वेवर मुख्य मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार स्थानकादरम्यान सकाळी 10.55 ते दुपारी 3.55 वाजेपर्यंत अप आणि डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक राहील. या काळात सुटणाऱ्या धीम्या लोकल गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि विद्याविहार दरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्या भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांत थांबून पुढे पुन्हा धीम्या मार्गावर चालवल्या जातील. ( Mumbai Local News)
https://www.prahaar.in/2026/09/06/govinda-accident-update-highest-number-of-injured-at-kem-hospital-data-from-mumbai-hospitals-released/
हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी व वांद्रे दरम्यान ब्लॉक घेण्यात आला आहे. सकाळी 11.40 ते सायंकाळी 4.40 वाजेपर्यंत डाऊन मार्गावर आणि सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 वाजेपर्यंत अप मार्गावर सेवा प्रभावित राहतील. या काळात सीएसएमटीवरून वाशी, बेलापूर, पनवेल आणि वांद्रे, गोरेगावच्या दिशेने जाणाऱ्या अनेक फेऱ्या रद्द राहतील. प्रवाशांच्या सोयीसाठी पनवेल ते कुर्ला दरम्यान दर 20 मिनिटांनी विशेष लोकल चालवण्यात येतील.
दुसरीकडे पश्चिम रेल्वेवरही ट्रॅक आणि सिग्नलिंगच्या देखभालीसाठी चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 वाजेपर्यंत 5 तासांचा जम्बोब्लॉक असेल. या काळात जलद मार्गावरील सर्व लोकल धीम्या मार्गावर वळवल्या जातील. ब्लॉकमुळे काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर चर्चगेटला जाणाऱ्या काही गाड्या वांद्रे किंवा दादर स्थानकापर्यंतच चालवून तिथून परत वळवण्यात येतील. ( Railway Block 6 September)