मुंबई : दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने शनिवारी मुंबईत सर्वत्र उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. ‘गोविंदा रे गोपाळा’ आणि ‘बोल बजरंग बली की जय’च्या जयघोषात विविध गोविंदा पथकांनी उंच हंडी फोडण्यासाठी मानवी मनोरे रचले. ढोल-ताशांच्या गजरात आणि गाण्यांवर थिरकत गोविंदांनी थरावर थर लावत हंडी फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही ठिकाणी मनोरे कोसळल्याने अनेक गोविंदा जखमी झाले. (DahiHandi 2026 )
शनिवारी सकाळपासूनच मुंबईच्या विविध भागांमध्ये दहीहंडी उत्सवासाठी गोविंदा पथके रवाना झाली होती. अनेक ठिकाणी राजकीय पक्ष आणि स्थानिक मंडळांकडून दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. हंडी फोडण्यासाठी गोविंदांनी उंच मानवी मनोरे उभारले. काही पथकांनी हंडी फोडण्यात यश मिळवले, तर काहींनी केवळ सलामी देत सहभाग नोंदवला. मात्र, थर रचताना तोल गेल्याने काही मनोरे कोसळले आणि गोविंदांना दुखापत झाली. त्यामुळे उत्सवाच्या आनंदासोबतच जखमी गोविंदांच्या उपचारासाठी रुग्णालयांमध्येही दिवसभर गर्दी पाहायला मिळाली.
https://www.prahaar.in/2026/09/05/as-many-as-168-govindas-injured-in-mumbai/