Jalgaon Accident News : जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावमधून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. चाळीसगाव-मालेगाव रस्त्यावर बिलाखेड गावाजवळ हा भीषण अपघात झाला. भरधाव कारने रस्त्याने जाणाऱ्या तीन महिलांना जोरदार धडक दिली. या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.
तीन महिलांना उडवले, एकीचा मृत्यू
अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की, मृत महिला कारमध्ये अडकून पडली होती. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. कारमध्ये अडकलेल्या मृत महिलेला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. तर गंभीर जखमी झालेल्या दोन्ही महिलांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. (Jalgaon Accident News)
https://www.prahaar.in/2026/09/02/jalgaon-crime-railway-takes-action-against-passenger-for-performing-puja-by-lighting-a-lamp-on-a-moving-train/
चाळीसगाव-मालेगाव रस्त्यावर रास्ता रोको
या अपघातानंतर बिलाखेड गावातील नागरिकांमध्ये मोठा संताप निर्माण झाला. वारंवार अपघात होत असलेल्या या रस्त्यावर सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी करत संतप्त ग्रामस्थांनी चाळीसगाव-मालेगाव रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन सुरू केले. रस्त्यावर स्पीड ब्रेकर बसवावेत, वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात तसेच वाहनचालकांना सावध करण्यासाठी ठिकठिकाणी सुरक्षा फलक लावावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. (Jalgaon Accident News)
https://www.prahaar.in/2026/09/02/jalgaon-crime-jalgaon-crime-major-twist-following-allegations-of-abduction-and-sexual-assault/
चाळीसगाव-मालेगाव मार्गावरील वाहतूक विस्कळीत
अपघातानंतर करण्यात आलेल्या या रास्ता रोको आंदोलनामुळे चाळीसगाव-मालेगाव मार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे घटनास्थळी काही काळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. आंदोलनाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत ग्रामस्थांशी चर्चा केली. पोलिसांनी ग्रामस्थांची समजूत काढल्यानंतर अखेर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले. (Jalgaon Accident News)
https://www.prahaar.in/2026/09/01/jalgaon-a-birthday-yesterday-today-a-heart-wrenching-wail-the-little-one-hanged-in-a-cloth-cradle/
दरम्यान, या भीषण अपघातामुळे बिलाखेड गावासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. रस्त्यावर सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याची मागणी पुन्हा एकदा ऐरणीवर आली असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता असून पोलिसांकडून अपघाताच्या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.