Nashik Crime : गंगापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गेल्या दीड वर्षापासून सुरू असलेल्या दिवसा घरफोडीच्या मालिकेचा अखेर उलगडा करण्यात नाशिक शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा अंबड युनिट-३ आणि गंगापूर पोलिसांच्या संयुक्त पथकाला मोठे यश आले आहे. गुजरात, जळगाव आणि बुलढाणा येथे कारवाया करत आंतरराज्यीय घरफोडी करणाऱ्या टोळीतील चार सराईत सदस्यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून तब्बल १७ लाख १५ हजार ३६७ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चंद्रकांत उर्फ बाबा राजेंद्र पाटील (वय २२, रा. सुरत, गुजरात), मिलिंद संजय खैरनार (वय ३२, रा. सुरत, गुजरात), बाळकृष्ण गोपी उर्फ जितू गोकुळ जाधव (वय ३१, रा. सुरत, गुजरात) आणि सौरभ प्रकाश महाजन (वय २८, रा. लिहा बुद्रुक, जि. बुलढाणा) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
https://www.prahaar.in/2026/09/01/nashik-75-year-old-woman-battles-for-life-in-dark-well-for-two-days/
नेमकं प्रकरण काय ?
पोलिसांच्या माहितीनुसार, या टोळीचे सदस्य पोलिसांना चकवा देण्यासाठी वारंवार आपली राहण्याची ठिकाणे बदलत होते. त्यामुळे त्यांचा माग काढणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. मात्र, अंबड गुन्हे शाखा आणि गंगापूर पोलिसांनी संशयितांच्या सोशल मीडिया अॅक्टिव्हिटीसह त्यांच्या गुन्हेगारी पद्धतीवर म्हणजेच एमओबीवर तांत्रिक पद्धतीने लक्ष केंद्रित केले. संशयितांचा माग काढण्यासाठी पोलिस पथकाने सलग दहा दिवस सुरत आणि जळगाव येथे तळ ठोकून तपास केला. तांत्रिक विश्लेषणातून संशयितांच्या हालचालींचा माग काढण्यात पोलिसांना यश आले आणि अखेर चौघांना अटक करण्यात आली.
या टोळीने चोरीच्या गुन्ह्यांसाठी पोलिसांची दिशाभूल करण्याची विशेष पद्धत अवलंबल्याचे तपासात समोर आले आहे. संशयित आपल्या वाहनांवर तब्बल २६ डुप्लिकेट नंबर प्लेट्स लावून फिरत होते. त्यामुळे प्रत्येक गुन्ह्यानंतर वाहनाची ओळख बदलण्याचा प्रयत्न केला जात होता. मात्र, पोलिसांच्या तांत्रिक तपासामुळे या टोळीचे डिजिटल फुटप्रिंट्स हाती लागले आणि त्यातून संशयितांपर्यंत पोहोचणे शक्य झाले. महात्मा नगर येथील स्वप्निल अपार्टमेंटमधील फ्लॅटचे कुलूप तोडून तब्बल १३ लाख ८६ हजार रुपयांचे दागिने चोरीला गेल्याच्या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू असताना या टोळीचा पर्दाफाश झाला. या टोळीतील आणखी दोन साथीदार अद्याप फरार असून, पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे.
https://www.prahaar.in/2026/09/01/jalgaon-a-birthday-yesterday-today-a-heart-wrenching-wail-the-little-one-hanged-in-a-cloth-cradle/
खैरनारवर ७२ पेक्षा अधिक गुन्हे
अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी मिलिंद संजय खैरनार हा अट्टल घरफोड्या असल्याचे तपासात समोर आले आहे. त्याच्याविरोधात जळगाव, छत्रपती संभाजीनगर, पुणे, अकोला तसेच भावनगर, गुजरात येथे ७२ पेक्षा अधिक घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याशिवाय छत्रपती संभाजीनगरमध्ये ६ आणि अमरावती शहर आयुक्तालयाच्या हद्दीत २५ गुन्ह्यांमध्येही ही टोळी पोलिसांना हवी होती.
गंगापूर पोलीस ठाण्यातील २० गुन्हे उघड
या कारवाईमुळे गंगापूर पोलीस ठाण्यात (Gangapur Police Station) दाखल असलेल्या तब्बल २० घरफोडीच्या गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे. पोलिसांनी या कारवाईत १७ लाख १५ हजार ३६७ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. जप्त मुद्देमालामध्ये सुमारे १३० ग्रॅम सोने, ज्याची किंमत १३ लाख ५६ हजार रुपये आहे, तसेच ३ किलो २३२ ग्रॅम चांदी, ज्याची किंमत ३ लाख ४५ हजार २१७ रुपये आहे, यांचा समावेश आहे. याशिवाय चारचाकी वाहनांच्या तब्बल २६ डुप्लिकेट नंबर प्लेट्स, कटर, लोखंडी स्क्रू ड्रायव्हर तसेच चोरीचे दागिने वितळवण्यासाठी वापरले जाणारे साहित्यही पोलिसांनी जप्त केले आहे.