Home ताज्या घडामोडी Nashik : नोकरीचे आमिष दाखवले अन् ३ लाख ३० हजार उकळले, गुन्हा दाखल

Nashik : नोकरीचे आमिष दाखवले अन् ३ लाख ३० हजार उकळले, गुन्हा दाखल

0
Nashik : नोकरीचे आमिष दाखवले अन् ३ लाख ३० हजार उकळले, गुन्हा दाखल

Nashik : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. कायमस्वरूपी नोकरी देण्याचे आमिष दाखवून एका तरुण शिक्षकाची लाखो रुपयांची आर्थिक फसवणूक झाली आहे. मालेगाव तालुक्यातील टेहरे येथील समता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षकाची कायमस्वरूपी नोकरी देण्याचे आमिष दाखवून एका तरुण शिक्षकाची तब्बल ३ लाख ३० हजार रुपयांची फसवणूक झाली आहे. या प्रकरणी संस्थाचालक व त्यांच्या मुलाविरोधात येथील छावणी पोलीस ठाण्यात (Cantonment Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं प्रकरण काय ?

तक्रारीनुसार, डिसेंबर २०१५ मध्ये सोयगाव येथील रहिवासी अमोल साळुंके (३८) यांच्या चुलत मामांच्या मध्यस्थीने संबंधित संस्थाचालकांची भेट घेण्यात आली होती. यावेळी संस्थाचालक व त्यांच्या मुलाने शिक्षकाची नोकरी देण्यासाठी ३ लाख रुपयांची मागणी केली. ही रक्कम दिल्यानंतर शाळेत इंग्रजी विषय शिकवण्यासाठी रुजू करून घेण्यात आले, मात्र कोणताही अधिकृत नियुक्ती आदेश त्यांना देण्यात आला नाही. धक्कादायक म्हणजे ​संशयीतांनी २०१५ ते २०२४ या तब्बल ९ वर्षांच्या कालावधीत विनामोबदला राबवून घेतले. या काळात शाळेत शिक्षक म्हणून काम करून घेण्यासोबतच स्वतःच्या खाजगी गाडीवर ड्रायव्हर, घरातील कामे करण्यासाठी घरगडी आणि शाळेच्या कार्यक्रमांचे फोटो काढण्याचे कामही आपल्याकडून करून घेण्यात आल्याचे साळुंखे यांनी तक्रारीत नमूद केले आहे.

https://www.prahaar.in/2026/08/31/nashiknegligence-in-handling-power-theft-cases-proves-costly-mahavitaran-executive-engineer-suspended/

पैसे देण्यास असमर्थता अन् अपमानास्पद वागणूक

२०१९ मध्ये जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकार्‍यांकडे नोकरीसाठीचा प्रस्ताव पाठविण्याच्या नावाखाली आणखी ३० हजार रुपये घेण्यात आले. ३ लाख रुपये घेऊनही नोकरीचे नियुक्तीपत्र दिले नसताना पुन्हा ३० हजार रुपये घेण्यात आल्याने त्यांच्या मनात संभ्रम निर्माण होण्यास सुरवात झाली. पुढे २०२१ मध्ये शाळेतील काही शिक्षक निवृत्त झाल्यावर कायमस्वरूपी नोकरीसाठी विचारणा केली असता संशयीतांकडून आणखी ७ लाख रुपयांची मागणी केली गेली. पैसे देण्यास असमर्थता दर्शवली असता, आपणास अपमानास्पद वागणूक देण्यात आली.

संस्थाचालक व त्यांच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल

तसेच नियुक्तीपत्र न मिळाल्याने आणि आजारी वडिलांच्या उपचारासाठी पैशांची गरज असल्याने नोकरीसाठी दिलेले पैसे परत मागितल्यावर संस्थाचालक व त्यांच्या मुलाने शिवीगाळ व दमदाटी केल्याचे साळुंके यांनी म्हटले आहे. या तक्रारीनुसार पोलिसांनी संस्थाचालक व त्यांच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नोकरीच्या आमिषाला बळी पडून आर्थिक फसवणूक झाल्याने परिसरातही चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.