लातूर : देवणी येथील आठवडी बाजारात आईपासून दुरावलेल्या अवघ्या चार वर्षीय आरोहीचा देवणी पोलिसांनी अवघ्या चार तासांत शोध घेऊन तिला सुखरूप वडिलांच्या ताब्यात दिले. मुलीला व्यवस्थित बोलता येत नसल्याने तिची ओळख पटविणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. मात्र, पोलिसांनी संवेदनशीलता आणि तत्परता दाखवत सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती प्रसारित करून तिच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचविण्यात यश मिळविले.
https://prahaar.in/2026/08/20/woman-dies-three-others-critically-injured-in-car-accident-on-mumbai-goa-highway/
सायंकाळी चारच्या सुमारास देवणी येथील आठवडी बाजार परिसरात आरोही ही चार वर्षीय मुलगी पोलिसांना हरवलेल्या अवस्थेत आढळून आली. आईपासून दुरावल्यामुळे ती अत्यंत घाबरलेली होती. तिला व्यवस्थित बोलता येत नसल्याने तिचे नाव, पत्ता किंवा पालकांची माहिती मिळविण्यात अडचणी येत होत्या. देवणी पोलिसांनी तात्काळ मुलीची काळजी घेत तिच्या पालकांचा शोध सुरू केला. मुलीची ओळख पटविण्यासाठी तिचे छायाचित्र आणि माहिती सोशल मीडियाच्या विविध माध्यमांतून प्रसारित करण्यात आली.
https://prahaar.in/2026/08/20/notices-issued-to-1268-drivers-lacking-practical-marathi-skills-learn-marathi-within-a-month-or-face-badge-suspension/
मुलीचे वडील अजय चव्हाण अशिक्षित असून त्यांच्याकडे मोबाईल फोनही नसल्याचे समोर आले. मात्र, सोशल मीडियावर प्रसारित झालेली माहिती त्यांच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचली. त्यानंतर सायंकाळी आठच्या सुमारास अजय चव्हाण देवणी पोलीस ठाण्यात दाखल झाले. पोलिसांनी आवश्यक पडताळणी करून आरोही ही अजय चव्हाण यांचीच मुलगी असल्याची खात्री केली. त्यानंतर तिला सुखरूप वडिलांच्या ताब्यात देण्यात आले. चार तासांच्या प्रयत्नांनंतर मुलगी पालकांच्या स्वाधीन झाल्याने कुटुंबीयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.