Home क्रीडा BWF World Championships : लक्ष्य सेनला पराभवाचा धक्का; उन्नती हुडाचेही आव्हान संपुष्टात

BWF World Championships : लक्ष्य सेनला पराभवाचा धक्का; उन्नती हुडाचेही आव्हान संपुष्टात

0
BWF World Championships : लक्ष्य सेनला पराभवाचा धक्का; उन्नती हुडाचेही आव्हान संपुष्टात
World Badminton Championships

नवी दिल्ली : भारताचा स्टार बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनला बीडब्ल्यूएफ जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पराभवाला सामोरे जावे लागले. पुरुष एकेरीच्या ३२ खेळाडूंच्या फेरीत सेन अमेरिकेच्या ज्युनियर क्रमवारीत अव्वल असलेल्या गॅरेट टॅनकडून २१-१९, १९-२१, १७-२१ असा पराभूत झाला. लक्ष्यचे स्पर्धेतून बाहेर पडणे हा भारतासाठी एक मोठा धक्का आहे, कारण त्याच्याकडून पदकाच्या मोठ्या अपेक्षा होत्या. उन्नती हुडाची बीडब्ल्यूएफ जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील पहिलीच वाटचाल दुसऱ्या फेरीतच संपुष्टात आली. तिला कॅनडाच्या मिशेल लीकडून कडवी झुंज देऊन पराभव पत्करावा लागला. १८ वर्षीय भारतीय बॅडमिंटनपटूने आपल्यापेक्षा उच्च मानांकित असलेल्या कॅनेडियन प्रतिस्पर्ध्याला पराभूत करण्याच्या अगदी जवळ पोहोचली होती. पण इंदिरा गांधी क्रीडा संकुलात एका तासापेक्षा कमी वेळ चाललेल्या सामन्यात तिला २१-११, ९-२१, २१-२३ असा पराभव पत्करावा लागला.

https://prahaar.in/2026/08/19/rain-expected-in-maharashtra-on-august-20-meteorological-department-issues-yellow-alert-for-4-districts/

तनिषा क्रास्टो आणि ध्रुव कपिला या मिश्र दुहेरीच्या जोडीने मकाऊच्या लिओंग येओक चोंग आणि एनजी वेंग ची यांना २१-११, २१-११ असे पराभूत करून उप उपांत्यपूर्व फेरी गाठली. भारतीय पुरुष दुहेरीची जोडी सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी बीडब्ल्यूएफ जागतिक चॅम्पियनशिपच्या उप उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. सात्विक आणि चिराग यांना त्यांच्या पहिल्या सामन्यात वॉकओव्हर मिळाला. दरम्यान, आयुष शेट्टी आणि पी. व्ही. सिंधू यांनी सरळ गेम्समध्ये विजय मिळवत उप उपांत्यपूर्व फेरीपूर्वीच्या फेरीत धडक मारली. आयुषने पुन्हा एकदा दमदार कामगिरी करत पुरुष एकेरीच्या फेरीत श्रीलंकेच्या दुमिंदू अबेविक्रमाचा अवघ्या २६ मिनिटांत २१-८, २१-१० असा पराभव केला. तर पी. व्ही. सिंधूनेही कॅनडाच्या वेन यू झांगचा २१-१६, २१-१७ असा पराभव करून स्पर्धेच्या पुढील फेरीत प्रवेश केला. आयुष आणि सिंधू यांच्या विजयांमुळे एकेरीच्या स्पर्धांमध्ये भारताचे आव्हान कायम राहिले, मात्र लक्ष्य आणि उन्नती यांच्या पराभवामुळे यजमान देशासाठी हा दिवस संमिश्र ठरला.