कोलकाता : कोलकात्यातून (Kolkata) एक अत्यंत दुर्दैवी आणि हादरवणारी घटना समोर आली आहे. बुधवारी पहाटेच्या सुमारास येथील एका गजबजलेल्या परिसरातील हॉटेलला अचानक भीषण आग लागली. या दुर्घटनेत एका लहान मुलासह ९ बांगलादेशी नागरिकांचा मृत्यू झाला असून ६ जण गंभीर जखमी झाले आहेत.
वैद्यकीय उपचारासाठी आले होते भारतात
अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत पावलेले सर्व नागरिक हे बांगलादेशातून भारतात वैद्यकीय उपचारासाठी आले होते. यामध्ये ६ पुरुष, २ महिला आणि एका चिमुकल्याचा समावेश आहे. उपचार घेऊन परतण्यापूर्वीच त्यांच्यावर हा काळाने घाला घातला.
धुराच्या लोटामुळे ६० जणांची गुदमर
पहाटे २ वाजताच्या सुमारास हॉटेलमध्ये अचानक आग पसरली. काही वेळातच संपूर्ण इमारतीत धुराचे प्रचंड लोट पसरले, ज्यामुळे अनेक नागरिक आतच अडकले आणि गुदमरून बेशुद्ध पडले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. बचाव पथकाने कौशल्याने तत्परता दाखवत सुमारे ६० हून अधिक लोकांना सुखरूप बाहेर काढले. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
https://prahaar.in/2026/08/19/jalgaon-crime-attempted-assault-on-sister-in-law-she-was-murdered-after-resisting/
सुरक्षा नियमांची पायमल्ली; दोन कर्मचाऱ्यांना घेतले ताब्यात
ही आग एका जुन्या आणि अत्यंत अरुंद गल्लीतील इमारतीमध्ये चालवल्या जाणाऱ्या हॉटेलमध्ये लागली. घटनास्थळी भेट दिल्यानंतर राज्याचे अग्निशमन मंत्री कौशिक चौधरी यांनी तीव्र संताप व्यक्त केला. “इमारतीमध्ये सुरक्षेच्या कोणत्याही नियमांचे पालन केले जात नव्हते. एकाच इमारतीत अनेक हॉटेल्स बेकायदेशीरपणे सुरू असल्याचे प्राथमिक तपासात दिसत आहे,” असे मंत्री म्हणाले. या प्रकरणी पोलिसांनी निष्काळजीपणाचा ठपका ठेवत हॉटेलच्या दोन कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना घडल्याचा संशय
आगीचे नेमके कारण अजून स्पष्ट झालेले नसले तरीही, प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची शंका व्यक्त केली जात आहे. पोलीस आणि फॉरेन्सिक टीम या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. लवकरच राज्याचे मुख्यमंत्री सुवेंद्रू अधिकारी घटनेची पाहणी करण्यासाठी अपघातस्थळाला भेट देण्याची शक्यता आहे.