मुंबई : राज्यातील आरोग्य व्यवस्था अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि उत्तरदायी करण्यासाठी आरोग्य विभागाच्या विविध आरोग्य समित्यांच्या माध्यमातून थेट नागरिकांशी संवाद साधण्यात येत आहे. आतापर्यंत सहा लाखांहून अधिक नागरिकांशी संवाद साधण्यात आला असून भविष्यात आणखी चार लाख नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या आरोग्यविषयक समस्या जाणून घेऊन त्यांची सोडवणूक करण्यात येईल, अशी माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली. सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत कार्यरत महिला आरोग्य समिती (MAS), जन आरोग्य समिती (UPHC-UHWC) तसेच रुग्णकल्याण समिती (UCHC) यांच्या सदस्यांशी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी ऑनलाइन पद्धतीने ‘जन आरोग्य संवाद’ साधला. यावेळी राज्यातील विविध भागांतील आरोग्य सेवांची वस्तुस्थिती जाणून घेत त्यांनी समित्यांच्या कामकाजाचा आणि नागरिकांना मिळणाऱ्या आरोग्य सुविधांचा आढावा घेतला.
https://prahaar.in/2026/08/16/financial-assistance-should-be-provided-from-the-corpus-fund-for-organ-transplants-for-poor-and-needy-patients-health-minister-prakash-abitkar/
डॉक्टरांच्या उपस्थितीपासून रुग्णसेवेपर्यंत थेट आढावा
या संवादामध्ये आरोग्यमंत्री आबिटकर यांनी समित्यांच्या बैठका नियमित होतात का, रुग्ण दवाखान्यात येतात का, डॉक्टर वेळेवर उपस्थित राहतात का, डॉक्टर रुग्णांशी योग्य संवाद साधतात का, रुग्णालयांमध्ये आवश्यक सेवा उपलब्ध आहेत का, यासह विविध आरोग्य सेवा विषयक बाबींची थेट माहिती घेतली. ‘आरोग्य व्यवस्था कागदावर नाही, तर प्रत्यक्ष रुग्णालयात आणि नागरिकांच्या अनुभवातून दिसली पाहिजे,’ या भूमिकेतून स्थानिक पातळीवरील अडचणी जाणून घेऊन त्यावर तातडीने उपाययोजना करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे आबिटकर यांनी स्पष्ट केले.
https://prahaar.in/2026/08/16/fda-cracks-down-on-vimal-elaichi-advertisement-notice-issued-to-ajay-shah-rukh-and-tiger/
१,४४० डॉक्टरांची नियुक्ती लवकरच
राज्यात १,४४० डॉक्टर उपलब्ध झाले असून त्यांची नियुक्ती येत्या काही दिवसात करण्यात येणार आहे. तसेच आणखी ६०० डॉक्टरांसाठी जाहिरात काढण्यात येत आहे. लवकरच सुमारे २५० दंतचिकित्सक आरोग्य सेवेसाठी उपलब्ध होणार आहेत. राज्याच्या आरोग्य व्यवस्थेला अधिक बळकटी देण्यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
https://prahaar.in/2026/08/16/how-much-water-is-stored-in-the-reservoirs-for-mumbaikars-following-the-repair-of-the-mumbai-3-water-pipeline/
आरोग्य समस्यांसाठी ऑनलाइन पोर्टल
नागरिकांना आरोग्य सेवांशी संबंधित तक्रारी व समस्या थेट प्रशासनापर्यंत पोहोचविता याव्यात, यासाठी लवकरच ऑनलाइन पोर्टल कार्यान्वित करण्यात येणार आहे. या माध्यमातून नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांचे निराकरण करण्यासाठी प्रभावी यंत्रणा उभारण्यात येणार आहे. तसेच स्थानिक बचत गटांच्या माध्यमातून रुग्णांना चांगल्या गुणवत्तेचा सकस व पोषक आहार उपलब्ध करून देण्याची व्यवस्था निर्माण करण्यात येणार असल्याचेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
https://prahaar.in/2026/08/16/navy-personnel-commits-suicide-along-with-family-in-navy-nagar-police-investigation-underway/
लोकप्रतिनिधींकडून आरोग्य व्यवस्थेबाबत सूचना
या जन आरोग्य संवादामध्ये लोकप्रतिनिधींनीही आरोग्य सेवांबाबतच्या सूचना मांडल्या. माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आरोग्य विभागाशी संबंधित तक्रारींसाठी स्वतंत्र डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करण्याची तसेच शासकीय दवाखान्यांमध्ये अनुपस्थित राहणाऱ्या डॉक्टरांच्या अनुषंगाने १आठवड्यातून एक दिवस निश्चित करून आढावा बैठक घेण्याची सूचना केली. या सूचनेला आरोग्यमंत्री आबिटकर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
https://prahaar.in/2026/08/16/the-mumbai-ahmedabad-bullet-train-will-start-soon/
राज्यभरातून लोकप्रतिनिधींचा सहभाग
या ऑनलाइन जन आरोग्य संवादात राज्यमंत्री,आशिष जयस्वाल, माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार, आमदार प्रकाशदादा सोळंके, आमदार सुरेश धस, आमदार दौलत दरोडा, आमदार किसन कथोरे, आमदार विनोद निकोले, आमदार प्रवीण स्वामी, आमदार राजू तोडसाम, उमेश ऊर्फ चंदू यावलकर, आमदार प्रवीण तायडे, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, आमदार नितीन पवार यांच्यासह विविध ठिकाणचे नगराध्यक्ष, आरोग्य समित्यांचे पदाधिकारी व सदस्य ऑनलाइन सहभागी झाले. यावेळी सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक, सचिव-२ श्री. ई. रविंद्रन, आरोग्य सेवा आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे अभियान संचालक श्री. संजय श्रीपतराव काटकर, आयुक्त, शहरी आरोग्य डॉ. सुनील भोकरे, संचालक डॉ. विजय कंदेवाड, सहसंचालक डॉ. सुनिता गोल्हाईत, कोल्हापूर विभागाचे उपसंचालक डॉ. दिलीप माने तसेच राज्यातील सर्व जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी ऑनलाइन सहभागी झाले. ‘निरोगी महाराष्ट्र – सुदृढ महाराष्ट्र’ या संकल्पनेत नागरिकांचा थेट सहभाग वाढवून आरोग्य सेवांमधील अडचणी समजून घेणे, त्यावर प्रभावी उपाययोजना करणे आणि प्रत्येक नागरिकाला दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे, हा आरोग्य विभागाचा प्रयत्न राहणार असल्याचे आरोग्यमंत्री आबिटकर यांनी सांगितले.