मुंबई : कुलाबा येथील नेव्ही नगर परिसरात नौदल कर्मचाऱ्यासह त्याची पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी रात्री समोर आली. मृतांमध्ये दोन महिन्यांचे चिमुकले बाळ आणि तीन वर्षांच्या मुलाचा समावेश असल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. (Navy Nagar)
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शनिवारी रात्री साडेअकराच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. नौदल कर्मचाऱ्याच्या घरातून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने संशय निर्माण झाला. त्यानंतर घरात पाहणी केली असता चौघेही मृतावस्थेत आढळून आले. (Suicide)
प्राथमिक माहितीनुसार, नौदल कर्मचाऱ्याने गळफास घेतल्याचा संशय आहे. तर त्याची पत्नी आणि दोन्ही मुलांचा मृत्यू विषप्राशनामुळे झाला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
https://prahaar.in/2026/08/16/sunday-mega-block-changes-to-traffic-on-all-three-central-railway-lines-major-relief-for-western-railway-passengers/
घटनेची माहिती मिळताच पोलीस तसचे नौदलाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. चौघांचे मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. शवविच्छेदन अहवाल आणि इतर तपासणीनंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, या घटनेमागे कौटुंबिक वाद, मानसिक तणाव, आर्थिक अडचण किंवा अन्य कोणते कारण होते का, याचा पोलीस तपास करत आहेत. तसेच पत्नी आणि मुलांच्या मृत्यूची परिस्थिती आणि त्यानंतर नौदल कर्मचाऱ्याच्या मृत्यूमागील घटनाक्रम याचाही तपास केला जात आहे. (Navy Nagar Suicide News)
या प्रकरणात पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी करून आवश्यक पुरावे गोळा करण्यात आले आहेत. कुटुंबातील सदस्य, नातेवाईक आणि संबंधित व्यक्तींची चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. सध्या या प्रकरणाबाबत अधिकृत कारण समोर आलेले नसून, तपास पूर्ण झाल्यानंतरच घटनेचे संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे.