Home महाराष्ट्र पालघर Vasai Accident : आईच्या हातातून निसटलं अन् दुचाकीवरून पडून एक वर्षाच्या बाळाचा मृत्यू, वसईतील दुर्घटना

Vasai Accident : आईच्या हातातून निसटलं अन् दुचाकीवरून पडून एक वर्षाच्या बाळाचा मृत्यू, वसईतील दुर्घटना

0
Vasai Accident : आईच्या हातातून निसटलं अन् दुचाकीवरून पडून एक वर्षाच्या बाळाचा मृत्यू, वसईतील दुर्घटना
Accident

पालघर : वसईतील नायगाव (Vasai Accident) परिसरात घडलेल्या एका दुर्दैवी घटनेत दुचाकीवरून पडल्याने एक वर्षाच्या बाळाचा मृत्यू झाला. शुक्रवारी रात्री मुंबईतील केईएम रुग्णालयात उपचारादरम्यान कृषा या चिमुकलीने अखेरचा श्वास घेतला. या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नायगाव पूर्व येथील पवित्रधाम सोसायटी परिसरात राहणारे योगेश भावसार (35) हे शुक्रवारी दुपारी सुमारे 1.15 वाजता पत्नी आणि एक वर्षाची मुलगी कृषा हिच्यासोबत स्कूटीवरून तिवारी रोडने जात होते. योगेश हे स्कूटी चालवत होते, तर त्यांची पत्नी मागे बसून कृषाला हातात घेऊन प्रवास करत होती. (Bike Accident)

https://prahaar.in/2026/08/09/tribal-culture-celebrated-through-vanrang-2026-chhagan-bhujbal-lauds-the-communitys-contribution/

प्रवासादरम्यान जोरदार वाऱ्यामुळे महिलेचे केस विस्कटून चेहऱ्यावर येत होते. त्यामुळे एका हाताने मुलीला पकडून दुसऱ्या हाताने केस बांधण्याचा प्रयत्न करत असताना तिच्या हातातून चिमुकलीची पकड सुटली. त्याच क्षणी कृषा धावत्या स्कूटीवरून रस्त्यावर पडली. (Accident news)

मुलगी रस्त्यावर पडल्याचे लक्षात येताच पालकांनी तातडीने स्कूटी थांबवून तिला जवळच्या रुग्णालयात नेले. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने पुढील उपचारांसाठी तिला मुंबईतील केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी उपचार करण्याचे प्रयत्न केले, मात्र प्रकृती गंभीर असल्याने शुक्रवारी रात्री तिचा मृत्यू झाला.

या घटनेने भावसार कुटुंबाला मोठा धक्का बसला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दुचाकीवर लहान मुलांसोबत प्रवास करताना पालकांनी विशेष काळजी घेण्याची गरज या घटनेतून पुन्हा अधोरेखित झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here