इराणसोबत सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या शस्त्रसाठ्यावर मोठा दबाव निर्माण झाल्याचे समोर येत आहे. विशेषतः पॅट्रियट आणि THAAD क्षेपणास्त्रांच्या साठ्यात घट झाल्याने अमेरिकेसमोर संरक्षण उत्पादन वेगाने वाढवण्याचे आव्हान उभे राहिले आहे. त्यामुळे पेंटागॉनने संरक्षण क्षेत्रातील कंपन्यांना शस्त्रनिर्मिती आणि पुरवठा वाढवण्यासाठी 21 दिवसांची मुदत दिल्याची माहिती समोर आली आहे. (US Weapons Stockpile)
‘वर्षानुवर्षांचे डेव्हलपमेंट सायकल आता मान्य नाही’ :
वॉशिंग्टन पोस्टच्या वृत्तानुसार, अमेरिकेचे उपसंरक्षण मंत्री स्टीव्ह फाइनबर्ग यांनी संरक्षण उद्योगाला एक मेमो पाठवला आहे. यामध्ये कंपन्यांनी 21 दिवसांच्या आत अशी प्रस्तावना सादर करावी, ज्यामुळे शस्त्रांची डिलिव्हरी जलद करता येईल आणि उत्पादन क्षमता वाढवता येईल, असे निर्देश देण्यात आले आहेत. दीर्घकाळ चालणाऱ्या विकास प्रक्रियेऐवजी संरक्षण प्रकल्पांचे वेळापत्रक वेगाने पुढे नेणे आणि उत्पादन क्षमता वाढवणे गरजेचे असल्याचे मेमोमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. (US Weapons Stockpile)
https://prahaar.in/2026/08/09/five-historic-railway-stations-in-mumbai-to-celebrate-their-birthday-a-150-year-legacy-to-be-revisited/
पॅट्रियट आणि THAADचा साठा किती घटला?
इराणसोबतच्या संघर्षामुळे अमेरिकेच्या महत्त्वाच्या हवाई संरक्षण प्रणालींच्या साठ्यावर दबाव वाढल्याचे सांगितले जात आहे. पेंटागॉनकडून Patriot आणि Terminal High Altitude Area Defense (THAAD) इंटरसेप्टरचा साठा पुन्हा भरून काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
Center for Strategic and International Studies (CSIS)च्या आकडेवारीनुसार, युद्धापूर्वी जगभरातील पॅट्रियट क्षेपणास्त्रांचा साठा सुमारे 2,200 होता. तो आता 827 पेक्षा कमी झाल्याचा दावा करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे THAADचा साठाही 452 वरून 278 पेक्षा कमी झाल्याचे सांगितले जाते. यामुळे भविष्यात एकाच वेळी अनेक आघाड्यांवर मोठा संघर्ष निर्माण झाल्यास अमेरिकेच्या क्षेपणास्त्र संरक्षण क्षमतेवर दबाव वाढू शकतो, अशी चिंता व्यक्त केली जात आहे. (US Weapons Stockpile)
संरक्षण कंपन्यांसोबत करार, पण अंमलबजावणीसाठी निधीची गरज :
पेंटागॉनने उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी मोठ्या संरक्षण आणि तंत्रज्ञान कंपन्यांसोबत काही फ्रेमवर्क करार केले आहेत. मात्र, हे करार पूर्णपणे बंधनकारक नसून त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी अमेरिकन काँग्रेसकडून निधी मिळणे आवश्यक आहे. CSISच्या मिसाइल डिफेन्स प्रोजेक्टचे संचालक टॉम कराको यांनी पेंटागॉनच्या योजनांबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्यांच्या मते, प्रत्यक्षात अद्याप फारच कमी करार झाले असून, हीच मोठी अडचण आहे. (US Weapons Stockpile)
पेंटागॉनचे प्रवक्ते सीन पार्नेल यांनी फाइनबर्ग यांच्या मेमोची पुष्टी केली आहे. हा मेमो 2028च्या आर्थिक वर्षाच्या संरक्षण बजेटला आकार देण्यासाठी आणि अमेरिकेच्या संरक्षण औद्योगिक पायाभूत सुविधांना मजबूत करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, तब्बल 1.15 ट्रिलियन डॉलरच्या संरक्षण खर्चाच्या विधेयकावर अमेरिकन काँग्रेसमध्ये अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळे शस्त्रनिर्मिती वाढवण्याच्या योजनांना निधी मिळण्यास विलंब होण्याची शक्यता आहे. (US Weapons Stockpile)
https://prahaar.in/2026/08/09/india-us-relations-a-new-direction-for-india-us-ties-us-vice-president-holds-a-phone-conversation-with-prime-minister-modi/
‘माघार घेण्याचा प्रश्नच नाही’ :
दरम्यान, इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियन यांनी देश युद्धातून माघार घेणार नसल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्या निर्णयांवर पूर्ण विश्वास व्यक्त करत, कोणताही निर्णय घेतला तरी त्यासोबत शेवटपर्यंत ठामपणे उभे राहणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. देशासाठी कोणतीही किंमत मोजण्याची तयारी असल्याचे सांगताना पेझेश्कियन यांनी युद्धजन्य परिस्थितीत नागरिकांना कठीण काळासाठी तयार राहण्याचे आवाहन केले. अमेरिका आणि युरोपमध्ये युद्धाच्या परिस्थितीत महागाई आणि टंचाई वाढू शकते, त्याचप्रमाणे इराणलाही आर्थिक आणि सामाजिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो, असा इशाराही त्यांनी दिला. (US Weapons Stockpile)