बॉलिवूडमधील अत्यंत लोकप्रिय ठरलेला ‘आवारापन’ (Awarapan) हा चित्रपट आता एका नव्या सिक्वलसह प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाला आहे. या महिन्यात प्रदर्शित होणाऱ्या ‘आवारापन २’मध्ये अभिनेता इम्रान हाशमी (Emran Hashmi) पुन्हा एकदा ‘शिवम पंडित’ (Shivam Pandit) या त्याच्या गाजलेल्या व्यक्तिरेखेत दिसणार आहे. या नव्या चित्रपटाची सर्वात खास गोष्ट म्हणजे, २००७ साली प्रचंड गाजलेली ‘तो फिर आओ’ आणि ‘तेरा मेरा रिश्ता’ ही दोन लोकप्रिय गाणी पुन्हा नव्या रुपात सादर केली जात आहेत. संगीतकार मिथुन यांच्यासोबत मूळ गीतकार सईद काद्री हेच या गाण्यांची पुनर्निर्मिती करत आहेत. मात्र, ही कल्ट गाणी नव्याने लिहित असताना आपल्यावर प्रचंड दडपण असल्याचे सईद काद्री यांनी स्पष्ट केले आहे.
“श्रोत्यांची निराशा होऊ नये हीच माफक अपेक्षा” – सईद काद्री
गीतकार सईद काद्री यांनी जुन्या गाण्यांचा वारसा पुढे नेण्यामागचे आव्हान स्पष्ट केले. ते म्हणाले की, जेव्हा एखादी कलाकृती लोकांच्या मनात घर करते, तेव्हा कलाकाराकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा प्रचंड वाढतात. त्यामुळे नव्या गाण्यांवर काम करताना दडपण असणे स्वाभाविक आहे. लोकांचे प्रेम कायम राहावे आणि श्रोत्यांसमोर मान खाली घालावी लागू नये, यासाठी अत्यंत प्रामाणिकपणे काम करावे लागते. आपल्या लेखनामुळे चाहत्यांच्या चेहऱ्यावर नाराजी दिसू नये, हीच एकच इच्छा मनात ठेवून हे संगीत तयार केल्याचे त्यांनी सांगितले.
https://prahaar.in/2026/08/08/crucial-meeting-between-pm-modi-and-cm-yogi-in-new-delhi-detailed-discussion-on-uttar-pradeshs-development/
पहिल्या भागाच्या यशाबद्दल व्यक्त केल्या आठवणी
२००७ मधील मूळ ‘आवारापन’ चित्रपटाबद्दल बोलताना सईद काद्री यांनी काही जुने प्रसंग आठवले. चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा त्याच्या संगीताला लगेचच उत्तम प्रतिसाद मिळाला होता, परंतु चित्रपटाला प्रेक्षकांचे प्रेम मिळण्यासाठी थोडा वेळ लागला. सुरुवातीच्या काळात चित्रपटाला मिळालेल्या संथ प्रतिसादामुळे संपूर्ण टीम काहीशी निराश झाली होती. मात्र, आपण सर्वांनी निष्ठेने काम केले असल्याने कधी ना कधी हे काम लोकांच्या पसंतीस नक्की उतरेल, असा विश्वास टीमला होता. हळूहळू प्रेक्षक इम्रान हाशमीची भूमिका आणि चित्रपटातील भावूक गाण्यांशी जोडले गेले.
कधी प्रदर्शित होणार ‘आवारापन २’ ?
नितीन कक्कर यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला ‘आवारापन २’ हा चित्रपट येत्या १४ ऑगस्ट रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात इम्रान हाशमीसोबत दिशा पटानी, शबाना आझमी आणि सुविंदर विक्की यांच्या मुख्य भूमिका आहेत. जुन्या गाण्यांची जादू आणि इम्रानचा नवा अंदाज यामुळे या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत आहे.