‘देवगिरी’वर सहा तास खलबते; सुनील तटकरे यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी?
मुंबई : देशातील नामवंत राजकीय रणनीतीकार आणि बिहारचे आमदार प्रशांत किशोर यांनी गुरुवारी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची घेतलेली भेट चर्चेचा विषय ठरली. मुंबईतील ‘देवगिरी’ या शासकीय निवासस्थानी तब्बल सहा तास चाललेल्या या मॅरेथॉन बैठकीत प्रशांत किशोर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या कार्यपद्धतीवर बोट ठेवल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. “भविष्यात मी निवडणूक रणनीतीकार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेससोबत काम करावे असे वाटत असेल, तर राज्यातील विद्यमान नेतृत्व आणि प्रदेशाध्यक्ष पदाबाबत तातडीने निर्णय घ्या,” असा सल्ला प्रशांत किशोर यांनी सुनेत्रा पवार यांना दिल्याचे समजते.
बिहारमधील बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवाराचा पराभव करून प्रत्यक्ष राजकारणात आपला करिश्मा सिद्ध केल्यानंतर प्रशांत किशोर हे पहिल्यांदाच मुंबईत दाखल झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते खासदार पार्थ पवार हे स्वतः विशेष विमानाने प्रशांत किशोर यांना दिल्लीहून मुंबईत घेऊन आले होते. गुरुवारी पार पडलेल्या या बैठकीला सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि प्रशांत किशोर यांच्या कोअर टीममधील दोन सदस्य प्रत्यक्ष उपस्थित होते, तर त्यांचे दुसरे पुत्र जय पवार हे ऑनलाइन सहभागी झाले होते. या बैठकीत किशोर यांनी स्पष्ट केले की, जोपर्यंत राज्यातील मुख्य नेतृत्व रणनीतीनुसार काम करत नाही आणि दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी करत नाही, तोपर्यंत आपल्याला राज्यात काम करणे कठीण होईल.
https://prahaar.in/2026/08/07/ban-on-114-publications-glorifying-extremist-views/
सूत्रांच्या दाव्यानुसार, सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी यापूर्वी तीनवेळा प्रशांत किशोर यांची भेट घेऊन पक्षाच्या संघटनात्मक रचनेबाबत चर्चा केली होती. त्या वेळी किशोर यांनी पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी आणि मरगळ झटकण्यासाठी काही महत्त्वाचे बदल सुचवले होते. मात्र, तीन बैठका उलटूनही सुचवलेल्या बदलांची किंवा धोरणांची अंमलबजावणी झाली नसल्याचे समोर आले आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडून सहकार्य मिळत नसल्यानेच पक्षाची रणनीती रखडल्याचे सांगत, भविष्यातील निवडणुकांसाठी आपले मार्गदर्शन अपेक्षित असेल तर प्रदेशाध्यक्ष पदाबाबत ठोस निर्णय घ्यावाच लागेल, अशी भूमिका प्रशांत किशोर यांनी मांडली.
‘गुंगी गुडिया’ टीकेवर शांत राहण्याचा सल्ला
विरोधी पक्षांकडून सुनेत्रा पवार यांच्यावर होणाऱ्या ‘गुंगी गुडिया’ या टीकेबाबतही बैठकीत सविस्तर चर्चा झाली. या टीकेला जाहीर उत्तर देऊन वाद वाढवण्याऐवजी सुनेत्रा पवार यांनी संयम बाळगून शांत राहावे आणि घटनात्मक कामांवर लक्ष केंद्रित करावे, असा सल्ला प्रशांत किशोर यांनी दिला. पक्षांतर्गत नवीन नियुक्त्यांवर भर देणे आणि तळागाळातील कार्यकर्त्यांना ताकद देणे हेच या टीकेला चोख उत्तर असेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
https://prahaar.in/2026/08/07/good-news-for-the-youth-recruitment-of-a-massive-30000-teachers-registration-has-begun-on-this-portal/
राज्यभरात सर्वेक्षणाला सुरुवात
अजित पवारांच्या निधनानंतर पक्षाची जनमानसातील प्रतिमा सावरण्यासाठी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील पीछेहाट भरून काढण्यासाठी प्रशांत किशोर यांच्या टीमने राष्ट्रवादी काँग्रेससाठी राज्यभर व्यापक स्तरावर जनमत सर्वेक्षणाचे (सर्व्हे) काम हाती घेतले आहे. या सर्वेक्षणाचा प्राथमिक अहवाल लवकरच सुनेत्रा पवार यांना सादर केला जाणार आहे. हा अहवाल समोर आल्यानंतर पक्षात आणि राज्य संघटनेत आमूलाग्र बदल केले जातील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
जानेवारी २०२६ मध्ये अजित पवारांचे निधन झाल्यानंतर मार्च महिन्यात पक्षाने ‘डिझाईन बॉक्स’ कंपनीचे कंत्राट रद्द केले होते, त्यानंतर आता प्रशांत किशोर यांच्या रूपाने पक्षाला नवा सल्लागार मिळाल्याचे दिसत असून, आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे संघटनात्मक बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.