Home ब्रेकिंग न्यूज Rajpal Yadav : राजपाल यादव याच्यावर बँकेची मोठी कारवाई; चेक बाऊन्स प्रकरणानंतर आता होणार मालमत्तांचा लिलाव

Rajpal Yadav : राजपाल यादव याच्यावर बँकेची मोठी कारवाई; चेक बाऊन्स प्रकरणानंतर आता होणार मालमत्तांचा लिलाव

0
Rajpal Yadav : राजपाल यादव याच्यावर बँकेची मोठी कारवाई; चेक बाऊन्स प्रकरणानंतर आता होणार मालमत्तांचा लिलाव

मुंबई : बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव (Rajpal Yadav) याच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. चेक बाऊन्स प्रकरणात न्यायालयाकडून दोषी ठरल्यानंतर आता १६.६१ कोटी रुपयांचे कर्ज थकीत राहिल्यामुळे सेंट्रल बँक ऑफ इंडियाने त्याच्या दोन मालमत्तांच्या लिलावाची प्रक्रिया सुरू केली आहे. बँकेने संबंधित मालमत्तांचा ताबा घेतला असून, ९ सप्टेंबर रोजी लिलाव होणार असल्याची नोटीसही जारी करण्यात आली आहे.

यापूर्वी १० जुलै रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने चेक बाऊन्स प्रकरणात राजपाल यादव (Rajpal Yadav) याच्याविरोधातील दोषसिद्धी कायम ठेवत कारावासाची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर आता कर्जवसुलीसाठी बँकेने आणखी कठोर पाऊल उचलल्याने अभिनेता पुन्हा चर्चेत आला आहे.

https://prahaar.in/2026/08/06/bombay-high-court-convcits-tarun-tejpal-in-2013-sexual-assault-case-overturns-trial-courts-verdict/

कोणत्या मालमत्तांचा होणार लिलाव?

बँकेच्या माहितीनुसार, लिलावासाठी ठेवण्यात आलेल्या दोन मालमत्तांपैकी एक उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर येथील कचहरी रोड परिसरात, तर दुसरी मुंबईतील वांद्रे आणि वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) परिसरात आहे. या मालमत्ता कर्जाच्या हमी म्हणून गहाण ठेवण्यात आल्या होत्या.

राजपाल यादव (Rajpal Yadav) याने पत्नी राधा यादव आणि आई गोदावरी यादव यांच्या नावावर मुंबईतील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून १६.६१ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र, ठरलेल्या मुदतीत कर्जाची परतफेड न झाल्याने बँकेने दोन वर्षांपूर्वीही नोटीस बजावली होती. त्यानंतर काही काळ सेटलमेंटबाबत चर्चा झाली, मात्र थकबाकी कायम राहिल्याने आता लिलावाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

कर्जाचा संबंध ‘अता पता लापता’ चित्रपटाशी :

मीडिया रिपोर्टनुसार, हे संपूर्ण प्रकरण २०१२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अता पता लापता’ या चित्रपटाशी संबंधित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन स्वतः राजपाल यादवने केले होते. चित्रपटाच्या निर्मितीसाठी बँकेकडून कर्ज घेण्यात आले होते. मात्र चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरल्याने कर्जाची परतफेड होऊ शकली नाही. कालांतराने व्याज वाढत गेले आणि थकीत रक्कम १६ कोटी रुपयांहून अधिक झाली.

https://prahaar.in/2026/08/05/received-an-offer-for-bigg-boss-but-marathi-actress-chhaya-kadam-said-no-the-reason-will-leave-you-amazed/

राजपाल यादवची प्रतिक्रिया नाही :

या संपूर्ण प्रकरणावर राजपाल यादव याने अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, त्यांचे मोठे भाऊ श्रीपाल यादव यांनी माध्यमांशी बोलताना हे कर्ज प्रकरण जुने असून बँकेसोबत तडजोड (सेटलमेंट) करण्यासाठी चर्चा सुरू असल्याचे सांगितले आहे.

नेमके प्रकरण काय?

२०१० मध्ये राजपाल यादव याने त्याच्या निर्मितीतील ‘अता पता लापता’ या चित्रपटासाठी सुमारे ५ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. चित्रपट अपेक्षित यश मिळवू शकला नाही आणि त्यानंतर कर्जफेड रखडली. दरम्यान, कर्जफेडीसाठी दिलेले काही धनादेश (चेक) बाऊन्स झाल्याने त्यांच्याविरोधात न्यायालयीन लढाई सुरू झाली. यापूर्वीही या प्रकरणात त्याला तुरुंगवास भोगावा लागला होता.

अलीकडेच दिल्ली उच्च न्यायालयाने त्याच्याविरोधातील दोषसिद्धी कायम ठेवत तीन महिन्यांच्या कारावासाचा निर्णयही कायम ठेवला. त्यानंतर आता थकीत कर्जाची पूर्ण परतफेड न झाल्यामुळे बँकेने मालमत्तांचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला असून, या प्रकरणाकडे बॉलिवूडसह आर्थिक वर्तुळाचेही लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here