नवी दिल्ली : विमानातून प्रवास करताना “सीटबेल्ट बांधा” अशी सूचना मिळणे ही अगदी सामान्य गोष्ट आहे. मात्र, मंगळवारी फुकेत (थायलंड) वरून दिल्लीकडे येणाऱ्या एअर इंडियाच्या AI2379 या विमानात या सूचनेचा अर्थच पूर्णपणे बदलला. हवेतील अचानक आणि तीव्र टर्ब्युलन्समुळे (हवेचा प्रचंड दाब आणि वादळी धक्का) हे विमान अत्यंत भीषण पद्धतीने हादरले. या अचानक बसलेल्या धक्क्यांमुळे विमानातील ४ कर्मचाऱ्यांसह तब्बल १७ प्रवासी जखमी झाले आहेत.
“सीटबेल्ट बांधा! सीटबेल्ट बांधा!” विमानातील हवाई सुंदरींच्या भीतीदायक आरोळ्या
आपत्कालीन परिस्थितीतही शांत राहण्याचे प्रशिक्षण घेतलेल्या विमानातील क्रू मेंबर्सना देखील या परिस्थितीचे गांभीर्य लपवणे अशक्य झाले होते. विमानाला लागणाऱ्या भयानक धक्क्यांमुळे एकीकडे हवाई सुंदरी मोठ्याने ओरडून प्रवाशांना आवरण्याचा प्रयत्न करत होती, तर दुसरीकडे अनाउन्समेंट सिस्टमवरून सातत्याने “कृपया सर्वांनी सीटबेल्ट बांधा!” अशी विनंती केली जात होती. विमानातील सामान ठेवण्याचे वरचे कप्पे तुटून प्रवाशांच्या डोक्यावर पडले होते. बॅग्ज आणि कप्प्यांचे तुटलेले भाग विमानाच्या पॅसेजमध्ये विखुरले होते, तर काही बॅग्ज खाली पडण्याच्या स्थितीत लटकत होत्या.
https://prahaar.in/2026/08/06/municipal-corporations-bulldozer-targets-encroachments-in-cidco/
“३०० फूट विमान खाली आले अन् वडील थेट छतावर आदळले”
Air India: Phuket – Delhi, 04.08.2026.
The worst two hours of my life. Please, please, please always wear your seatbelt on a plane, even when the seatbelt sign is off.
I saw people being thrown into the air, hitting their heads, and getting injured. For a while, I genuinely… pic.twitter.com/3bVjcZZ18g— Minchen (@minchen_t) August 4, 2026
विमानात प्रचंड घबराट पसरली होती. प्रवासी घाबरून एकमेकांना घट्ट पकडून ठेवण्याचा आणि धीर देण्याचा प्रयत्न करत होते. या थरारक घटनेचा व्हिडिओ बनवणाऱ्या मिनचेन नावाच्या एका प्रवाशाने सांगितले की, हे तिच्या आयुष्यातील सर्वात भयानक २ तास होते. तिने सांगितले, “विमानात असताना सीटबेल्टचे चिन्ह बंद असले तरी नेहमी सीटबेल्ट बांधून ठेवा. मी लोकांना हवेत उडताना, छतावर डोके आपटताना आणि जखमी होताना पाहिले. काही काळासाठी मला वाटले होते की आपण आता वाचणार नाही.” तसेच एका भारतीय प्रवाशाने ‘एएनआय’शी (ANI) बोलताना सांगितले की, अचानक विमान ३०० फूट खाली कोसळले. त्या वेळी त्याचे वडील कॉफी पीत होते आणि सीटबेल्टचे चिन्ह ऑन नव्हते. धक्क्यामुळे ते थेट विमानाचा सीटबेल्ट सोडून छतावर आदळले आणि खाली पॅसेजमध्ये पडले. त्यांच्या डोक्याला आणि शरीराला दुखापत झाली.
लहान मुलांसह आईला दुखापत; “आमचा नवीन जन्मच झाला!”
या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील अनेक जण जखमी झाले. संबंधित प्रवाशाने सांगितले की, खिडकीजवळ बसलेल्या त्याच्या आईचे डोके वरच्या कप्प्यावर आपटल्याने त्यांना सूज आली, तसेच कप्प्याचा एक भाग त्यांच्या डाव्या डोळ्यावर पडल्याने जखम झाली. त्यांची दोन वर्षांची लहान मुलगी आणि पत्नीदेखील हवेत उडून दोन सीट्सच्या मधल्या जागेत जाऊन पडल्या. चिमुकलीच्या डोक्याला दुखापत झाली असून तिच्यावर विमानतळावर ‘मेदान्ता’च्या (Medanta) वैद्यकीय टीमने उपचार केले. सुदैवाने, डॉक्टरांनी या सर्व जखमा किरकोळ असल्याचे सांगितल्यानंतर कुटुंबाला डिस्चार्ज देण्यात आला आणि ते टॅक्सीने चंदीगडकडे रवाना झाले. प्रवाशाने सांगितले, “विमानात सगळीकडून किंचाळ्यांचे आवाज येत होते. माझी पाच वर्षांची मोठी मुलगी प्रचंड घाबरली होती. आम्ही ‘वाहेगुरु’चे नाव घेत होतो. मी तर म्हणेन की हा आमचा नवीन जन्मच झाला आहे.” त्यांनी संकटसमयी मदत करणाऱ्या पायलट आणि क्रू मेंबर्सचे कौतुक केले असून हवाई सुरक्षेसाठी या घटनेच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे. आम्हाला वाटले आज आम्ही मरणार”; इटालियन प्रवाशाची आपबिती अन् फोर्टिस रुग्णालयात उपचार इटलीहून आलेल्या व्हिवियाना या प्रवाशासाठी हा प्रवास एखाद्या भयानक स्वप्नासारखा होता. तिने आपल्या बहिणीला हवेत फेकले जाताना आणि आईच्या डोक्याला गंभीर दुखापत होताना पाहिले. “आम्हाला वाटले होते की आता आपण जिवंत वाचणार नाही,” असे तिने अत्यंत भीतीपोटी सांगितले.
दरम्यान, या दुर्घटनेनंतर दिल्लीच्या वसंतकुंज येथील फोर्टिस (Fortis) रुग्णालयात ७ जखमी प्रवाशांना तातडीने दाखल करण्यात आले. एअर इंडियाने दिलेल्या पूर्वसूचनेनंतर रुग्णालयात ‘कोड येलो’ (Code Yellow) लागू करून आपत्कालीन वैद्यकीय टीम आणि संसाधने तैनात करण्यात आली. जखमी प्रवाशांचे सीटी स्कॅन (CT Scan), एमआरआय (MRI) आणि एक्स-रे (X-Ray) करण्यात आले असून त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. फुकेतवरून उड्डाण केलेले हे एअर इंडियाचे विमान अखेर दिल्लीत सुरक्षितपणे लँड झाले असले, तरी विमानातील प्रवाशांसाठी ते काही तास मृत्यूच्या दाढेतून परत आल्यासारखे होते. या घटनेने विमान प्रवासादरम्यान सीटबेल्ट बांधण्याचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.