Home ब्रेकिंग न्यूज Usha Nadkarni Emotional Story : वडिलांचा कोयत्याने हल्ला, आईने काढले घराबाहेर; पडद्यावर खडूस सासू, पण खऱ्या आयुष्यात… उषा नाडकर्णींची हादरवणारी कहाणी

Usha Nadkarni Emotional Story : वडिलांचा कोयत्याने हल्ला, आईने काढले घराबाहेर; पडद्यावर खडूस सासू, पण खऱ्या आयुष्यात… उषा नाडकर्णींची हादरवणारी कहाणी

0
Usha Nadkarni Emotional Story : वडिलांचा कोयत्याने हल्ला, आईने काढले घराबाहेर; पडद्यावर खडूस सासू, पण खऱ्या आयुष्यात… उषा नाडकर्णींची हादरवणारी कहाणी

मुंबई : टेलिव्हिजन विश्वातील अतिशय गाजलेली मालिका ‘पवित्र रिश्ता’ आणि त्यात ‘खडूस सासू’ म्हणून घराघरांत पोहोचलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी (Usha Nadkarni) यांचा मोठा चाहतावर्ग आहे. वयाच्या ८० व्या वर्षीही त्या सिनेसृष्टीत तितक्याच उत्साहाने कार्यरत आहेत. पडद्यावर कडक आणि बिनधास्त दिसणाऱ्या उषा नाडकर्णी यांचे वैयक्तिक आयुष्य मात्र एखाद्या नाट्यमय चित्रपट कथेपेक्षा कमी राहिलेले नाही. पतीपासून विभक्त होणे, मुलापासून दुरावा, बालपणी वडिलांचा भीषण मारहाण आणि आईने घराबाहेर काढणे… अशा अनेक दुःखांच्या वादळातून त्यांचे आयुष्य गेले आहे.

पती आणि कुटुंबापासून दुरावा

मागील अनेक दशकांपासून उषा नाडकर्णी मुंबईतील आपल्या फ्लॅटमध्ये एकट्याच राहत आहेत. आता त्यांना या एकाकीपणाची सवय झाली आहे. कोणाचाही आधार न घेता त्या स्वाभिमानाने जीवन जगत आहेत आणि आपले शूटिंगचे कामही सांभाळत आहेत. एका मुलाखतीदरम्यान त्यांनी स्पष्ट केले की, त्या अनेक वर्षांपासून पतीपासून विभक्त राहत आहेत. असे असले तरी त्यांच्या मनात पती किंवा सासरच्या कुटुंबाबद्दल कोणतीही कटुता किंवा आकस उरलेला नाही. उलट, अनेकदा त्या नाडकर्णी कुटुंबाला प्रेमाने आपल्या घरी जेवायलाही बोलावतात.

https://prahaar.in/2026/08/06/how-to-use-multiple-upi-apps-with-one-mobile-number-check/

‘तुम्ही मला फक्त जन्म दिलाय…’; मुलाशी असलेला दुरावा आणि आईची आठवण

उषा नाडकर्णी यांना एकुलता एक मुलगा असून तो सध्या परदेशात (विदेशात) स्थायिक आहे. अभिनयाच्या कामात आणि शूटिंगमध्ये सातत्याने व्यग्र राहिल्यामुळे त्यांना मुलाला पुरेसा वेळ देता आला नाही. त्यामुळे त्यांच्या आईनेच त्याचे संपूर्ण संगोपन केले. यामुळेच बऱ्याचदा त्यांचा मुलगा त्यांना सहज बोलून जातो की, “तुम्ही मला फक्त जन्म दिला आहे, माझी खरी आई तर माझी आजीच होती.” मुलाचे हे शब्द ऐकून मन दुखावत असले तरी परिस्थीती स्वीकारल्याचे त्या सांगतात.

१९८७ पासून एकाकी प्रवास आणि रात्रीच्या मृत्यूची भीती

उषा नाडकर्णी १९८७ या सालापासून पूर्णपणे एकट्या राहत आहेत. सुरुवातीच्या काळात एकटेपणाची सवय नसल्याने त्यांना प्रचंड भीती वाटायची. रात्रीच्या वेळी घरात कोणी घुसून हल्ला तर करणार नाही ना? या भीतीपोटी त्या इमारतीच्या सिक्युरीटी गार्डला घराच्या दरवाजापर्यंत सोबत सोडायला सांगायच्या. आता मात्र त्यांना कशाचीही भीती उरलेली नाही. सध्याच्या वयाबद्दल बोलताना त्यांनी एक भावूक चिंता व्यक्त केली. त्या म्हणाल्या, “जर अचानक रात्रीच्या वेळी माझा मृत्यू झाला, तर कोणाला कसे कळणार?” पण लगेचच आपल्या नेहमीच्या मिश्कील शैलीत हसत त्या म्हणाल्या, “कदाचित दुसऱ्या दिवशी शेजारी येऊन दार ठोठावतील आणि म्हणतील— अरे, म्हातारीने आज दारच उघडलं नाही वाटतं!”

वडिलांचा कोयत्याने वार आणि आईने सामान फेकले बाहेर

उषा नाडकर्णींचे बालपण अत्यंत कष्टप्रद आणि भयानक आठवणींनी भरलेले होते. त्यांचे वडील अत्यंत रागीट स्वभावाचे होते आणि किरकोळ कारणांवरून मुलांना प्रचंड मारायचे. असाच एक प्रसंग आठवताना त्या म्हणाल्या की, एके दिवशी वडिलांच्या मारहाणीपासून त्या आपल्या भावाला वाचवायला गेल्या. त्यावेळी संतापलेल्या वडिलांनी त्यांच्यावर थेट कोयत्याने वार केला. या हल्ल्यात त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली. पण तरीही हातावर पट्टी बांधून त्या तशाच अवस्थेत मंचावर जाऊन नाटक सादर करायला गेल्या. दुसरीकडे, त्यांच्या आईला उषाजींनी अभिनयाच्या क्षेत्रात जाणे अजिबात मान्य नव्हते. याच रागातून एकदा आईने त्यांचे सर्व सामान घराबाहेर फेकून दिले होते. नंतर त्यांच्या वडिलांनीच त्यांना पुन्हा घरात घेतले होते. पडद्यावर आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना हसवणाऱ्या आणि प्रसंगी कडक वाटणाऱ्या उषा नाडकर्णी यांच्या वैयक्तिक आयुष्यात दुःखाचे डोंगर कोसळले. पण या सर्व संकटांवर मात करत त्यांनी आज वयाच्या ८० व्या वर्षीही आपला स्वाभिमान आणि अभिनयाची आवड जिवंत ठेवली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here