– ९ ते १७ ऑगस्टदरम्यान आयोजन; १० ऑगस्टला मुंबईत २५ हजार तरुणांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी होणार
मुंबई : भारतीय स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र भाजपच्या वतीने प्रत्येक जिल्ह्यात ९ ते १७ ऑगस्ट या कालावधीत ‘तिरंगा रॅली’चे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेअंतर्गत १० ऑगस्ट रोजी मुंबईत एका भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले असून, यामध्ये सुमारे २५ हजार तरुणांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः रस्त्यावर उतरून रॅलीचे नेतृत्व करणार आहेत. (BJP)
९ ते १७ ऑगस्ट या कालावधीत राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये स्थानिक रॅली पार पडतील. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह पक्षाचे सर्व केंद्रीय मंत्री, राज्य मंत्रिमंडळातील मंत्री, खासदार, आमदार आणि स्थानिक पदाधिकारी आपापल्या संपर्क क्षेत्रातील रॅलींमध्ये सक्रिय सहभाग नोंदवणार आहेत. मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि नाशिक या प्रमुख शहरांसह सर्व जिल्ह्यांमध्ये हा उपक्रम राबवला जाईल. या मोहिमेत विविध सामाजिक संस्था, मित्रपक्ष आणि समविचारी संघटनांनीही मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन पक्षाकडून करण्यात आले आहे. मुंबईत १० ऑगस्ट रोजी निघणारी रॅली या संपूर्ण अभियानाचे मुख्य आकर्षण ठरणार आहे. (Tiranga Rally)
https://prahaar.in/2026/08/06/action-likely-against-these-auto-rickshaw-and-taxi-drivers-after-august-15-no-deadline-extension-to-be-granted/
गेल्या काही दिवसांत ‘नीट’सह विविध शैक्षणिक मुद्द्यांवरून देशपातळीवर तरुण वर्गाकडून आंदोलने उभी राहिली होती. या पार्श्वभूमीवर, तरुणांमधील असंतोष दूर सारून त्यांना पुन्हा पक्षाच्या व्यासपीठावर एकत्र आणण्यासाठी भाजपने या ‘तिरंगा रॅली’चे नियोजन केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. आगामी राजकीय आव्हाने लक्षात घेता स्वातंत्र्यदिनाचा उत्साह आणि देशभक्तीच्या भावनेच्या माध्यमातून तरुण वर्गाला मोठ्या प्रमाणावर पक्षाशी जोडून घेण्याची ही रणनीती मानली जात आहे. (Independence Day)