पुणे : पुणे-नाशिक महामार्गावर खेड तालुक्यात बुधवारी सकाळी सुमारे 6.15 वाजता भीषण अपघात झाला. नाशिकहून पुण्याकडे येणाऱ्या भरधाव कंटेनरने चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुभाजक तोडून विरुद्ध दिशेने जाणाऱ्या ट्रकला जोरदार धडक दिली. या धडकेमुळे ट्रक रस्त्याच्या खाली कोसळला, तर त्याच्या खाली एक कारही चिरडली गेली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. (Pune Nashik Highway Accident)
प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, धडक इतकी जोरदार होती की ट्रक रस्त्याबाहेर फेकला गेला आणि त्याच्या शेजारी असलेली कारही त्याखाली दबली. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
https://prahaar.in/2026/08/04/amendment-to-the-railways-act-1989-fines-increased-for-ticketless-travel-and-unauthorized-entry-into-reserved-coaches/
अपघातानंतर पुणे-नाशिक महामार्गावरील दोन्ही दिशेची वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली. विशेषतः पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. महामार्ग पोलिसांनी क्रेनच्या मदतीने कंटेनर आणि ट्रक रस्त्याच्या बाजूला हटवण्याचे काम हाती घेतले असून, वाहतूक पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. (Nashik Road Accident)
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पावसामुळे पुणे-नाशिक महामार्गाची दुरवस्था चर्चेत आहे. अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही दिवसांपूर्वी याच महामार्गावर दुचाकी अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला होता. आजच्या भीषण अपघातानंतर पुन्हा एकदा या महामार्गाच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. (Car Accident)