Nashik : शेतकऱ्यांसाठी जमीन म्हणजे सर्व काही असतं. मात्र हीच जमीन जर परस्पर तिसराच विकत असेल तर… तर पायाखालचीही जमीन सरकेल ! नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी (Dindori) तालुक्यात देखील असाच एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दिंडोरी येथील निळवंडी रोडवरील जाधव वस्ती येथे एका शेतकरी कुटुंबावर ओढावलेला भीषण प्रसंग अंगावर काटा आणणारा आहे.
या शेतकरी कुटुंबाने एका बँकेकडून कर्ज घेतले होते. सर्व कर्ज वन टाईम सेटलमेंट (OTS) योजनेअंतर्गत पूर्ण भरलेले असतानाही बँकेने शेतकऱ्याची कोट्यवधी रुपयांची जमीन परस्पर विकल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे या परस्पर विकलेल्या या जमिनीचा ताबा घेण्यासाठी पोलीस आणि बँकेचे कर्मचारी गेले तेव्हा याठिकाणी गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊन मोठी झटापट झाली. सध्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
https://prahaar.in/2026/08/04/40000-bribe-for-a-positive-report/
नेमकं प्रकरण काय ?
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दिंडोरी येथील एका शेतकरी कुटुंबावर बँकेचे 7 लाख 67 हजार रुपयांचे कर्ज होते. हे कर्ज त्यांनी ‘वन टाईम सेटलमेंट’ (OTS) योजनेअंतर्गत पूर्णपणे भरले होते. मात्र असे असतानाही बँकेच्या काही स्थानिक अधिकाऱ्यांनी मुंबईतील सेंट्रल ऑफिसला चुकीची माहिती पुरवली. बरं एवढ्यावरच न थांबता परस्पर कागदपत्रे तयार करून आणि स्थानिक एजंटशी संगनमत करून शेतकऱ्याची कोट्यवधी रुपयांची जमीन अवघ्या 73 लाख रुपयांमध्ये विकल्याचा आरोप शेतकरी कुटुंबाकडून केला जात आहे.
https://prahaar.in/2026/08/03/class-12-student-commits-suicide-in-the-suicide-note/
पोलिसांची काम करण्याची ही कोणती पद्धत ?
बँकेचे कर्मचारी जेव्हा या जमिनीचा प्रत्यक्ष ताबा घेण्यासाठी गेले, तेव्हा त्यांच्यासोबत पोलीस बंदोबस्तही उपस्थित होता. स्थानिक पोलीस प्रशासनाने जमिनीचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला असता, अन्यायग्रस्त शेतकरी कुटुंबाने त्यास तीव्र विरोध दर्शवला. या दरम्यान पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये मोठी झटापट झाली. पोलिसांनी अरेरावी करतानाचा व्हिडीओ मोबाईलमध्ये कैद करणाऱ्या एका युवकाला मारहाण केल्याचा गंभीर आरोप शेतकरी कुटुंबाने केला आहे.
https://prahaar.in/2026/08/03/1500-state-of-the-art-cctv-cameras-to-be-operational-across-the-city-within-two-months/
कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून….
दुसरीकडे, पोलीस प्रशासनाने आणि संबंधित अधिकाऱ्यांनी या आरोपांवर स्पष्टीकरण दिले आहे. कोर्टाच्या कायदेशीर आदेशानुसारच बँकेच्या अधिकाऱ्यांसोबत पोलीस पथक घटनास्थळी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून गेले होते, अशी माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे. मात्र या घटनेनंतर संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. जर कुटुंबाचा आरोप खरा असेल तर सर्वसामान्य शेतकरी बँकेच्या भोंगळ कारभारामुळे कशाप्रकारे मेटाकुटीला येऊ शकतो याचं हे जिवंत उदाहरण म्हणावं लागेल.