Home साप्ताहिक कोलाज जाणीव ठेवून केली परतफेड…

जाणीव ठेवून केली परतफेड…

0
जाणीव ठेवून केली परतफेड…

– स्मृतीपटल; अनिल रा. तोरणे

– आपण केलेक्या त्यागाचे फळ आपल्याला कधी ना कधी तरी मिळतेच. हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रख्यात अभिनेते राकेश रोशन यांच्याबाबतीतही असेच काहीसे घडले होते. यासाठी त्या त्या वेळी संयमाने वागणे अतिशय आवश्यक असते.

सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक रोशन (रोशन लाल नागरथ) यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र राकेश यांना दाक्षिणात्य चित्रपट निर्माते बी. नागी रेड्डी यांनी आपल्या ‘घर घर की कहानी’ या चित्रपटात नायकाची भूमिका करण्याची संधी दिली. या चित्रपटासाठी पार्श्वगायक किशोर कुमार यांनी गायिलेले “समा है सुहाना सुहाना, नशे में जहान है” हे गीत अतिशय लोकप्रिय झाले होते. या गीताचे बोल राकेश रोशन यांच्यासाठीच लिहिले गेले होते; पण ते गीत चित्रपटातील प्रसंगानुसार अभिनेते जलाल आगा यांच्यावर चित्रित करण्यात आले. अशा तऱ्हेने इतक्या सुंदर गीतावर अभिनय करण्यापासून राकेश रोशन वंचितच राहिले! पण येणाऱ्या काळात अन्य एखाद्या चित्रपटात किशोर कुमार यांनी गायिलेल्या एखाद्या गीतावर अभिनय करण्याची आपल्याला संधी मिळेल, अशी आशा त्यांना वाटत होती.

या चित्रपटानंतर राकेश यांना आणखी एक-दोन नवे चित्रपट मिळाले. त्यात दिग्दर्शक वीरेंद्र सिन्हा यांचा ‘बुनियाद’ हा चित्रपट होता. या चित्रपटात राकेश यांच्याबरोबर अभिनेत्री योगिता बाली यांना घेण्यात आले होते. शिवाय फरीदा जलाल, बिंदू, प्राण आणि शत्रुघ्न सिन्हा हे कलावंत महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये होते.
या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी राकेश रोशन व योगिता बाली या जोडीसाठी “पुकारो मुझे पुकारो” हे युगुलगीत किशोर कुमार आणि लता मंगेशकर या पार्श्वगायकांच्या आवाजांमध्ये ध्वनिमुद्रित केले होते. त्या गीताची चाल ऐकून राकेश रोशन सुखावले होते आणि त्यांना वाटले, की आपल्या अभिनय जीवनाला पुढे नेण्यात या गीताचा मोठाच हातभार लागेल. पण सगळे आपल्या मनासारखे थोडेच घडते? त्या चित्रपटात त्यांचे सहकलावंत असलेले शत्रुघ्न सिन्हा यांनी ते गीत स्वत:वर चित्रित केले जावे असा आग्रह धरला. राकेश रोशन यांच्याजागी जर अन्य कोणी अभिनेता असता तर त्याने तसे करण्यावर आक्षेप घेतला असता आणि किशोर कुमार यांनी गायिलेल्या गीतावर अभिनय करण्याची संधी त्याने दुसऱ्यांदा गमाविली नसती; परंतु राकेश रोशन यांनी संयम बाळगला आणि ते स्वत: शत्रुघ्न सिन्हा यांच्या जवळ जाऊन त्यांना म्हणाले, की हे गीत आपण आणि फरीदा जलाल यांच्यावरच चित्रित केले जाणार आहे.

शत्रुघ्न सिन्हा यांनी राकेश रोशन यांचे हे अमूल्य सहकार्य पक्के लक्षात ठेवले. कालांतराने राकेश रोशन यांनी स्वत:च चित्रपट दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पदार्पण करण्याची योजना आखून जितेंद्र आणि रजनीकांत या कलावंतांना घेऊन एक चित्रपट निर्माण करण्याचा विचार केला. या दोन कलावंतांना घेऊन त्यांनी निर्माता या नात्याने ‘भगवान दादा’ हा चित्रपट निर्माण केलेला होता.

अभिनेते रजनीकांत यांना राकेश रोशन यांनी दोन नायकांची एक कथा ऐकविली. त्यातील एक नायक उत्तर भारतातील, तर दुसरा दक्षिण भारतातील असतो. उत्तर भारतीय व्यक्तिरेखेसाठी जितेंद्र यांना आणि दक्षिणात्य व्यक्तिरेखेसाठी रजनीकांत यांना घेण्याची योजना होती; परंतु रजनीकांत यांनी विषय ऐकताच त्या चित्रपटात भूमिका करण्यास नकार दिला. कारण त्यावेळी ते तशाच प्रकारच्या विषयावर आधारलेल्या ‘उत्तर दक्षिण’ या चित्रपटात अभिनेते जॅकी श्रॉफ यांच्यासमवेत काम करीत होते आणि त्यांना पुनरावृत्ती नको होती. रजनीकांत यांचे म्हणणे राकेश रोशन यांना पटले.

त्या दिवसांत राकेश रोशन यांची अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांच्याशी भेट झाली. राकेश यांच्या चित्रपटात भूमिका करण्यास रजनीकांत यांनी नकार दिला असल्याचे शत्रुघ्न सिन्हा यांना समजताच त्यांनी राकेश यांच्या चित्रपटाच्या कथेतील दक्षिणात्य व्यक्तिरेखेला बिहारी व्यक्तिरेखा बनवून टाकण्याचा राकेश यांना सल्ला दिला. शत्रुघ्न त्यांना म्हणाले, की या बदलामुळे तुमच्या चित्रपटाची कथा ‘उत्तर दक्षिण’ या चित्रपटाच्या कथेपेक्षा वेगळ्या स्वरूपात पडद्यावर येईल. राकेश रोशन यांनी ती सूचना शिरसावंद्य मानून पटकथेत त्या प्रकारे बदल केला आणि ‘खुदगर्ज’ या चित्रपटाची कथा तयार झाली. शत्रुघ्न सिन्हा बिहारचेच असल्याने ती भूमिका त्यांनाच देण्यात आली. शत्रुघ्न सिन्हा यांनीही या भूमिकेसाठी नाममात्र मानधन घेऊन बिहारी बाबूची भूमिका उत्तम साकारली. अशा तऱ्हेने शत्रुघ्न सिन्हा यांनी ‘बुनियाद’ या चित्रपटातील जे गीत राकेश यांच्याकडून स्वत:साठी मागितले होते त्यावेळी राकेश रोशन यांनी केलेल्या सहकार्याची अशी पूर्ण जाणीव ठेवून परतफेड केली.

‘खुदगर्ज’ हा चित्रपट शत्रुघ्न सिन्हा यांच्यामुळेच यशस्वी झाला आणि राकेश रोशन एक दिग्दर्शक म्हणून प्रस्थापित झाले. त्यानंतर राकेश रोशन यांनी निर्माण केलेले अनेक चित्रपट यशस्वी आणि लोकप्रिय झाले. नंतरच्या काळात त्यांनी आपले पुत्र हृतिक रोशन यांनाही आपल्या ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटाद्वारे एका मोठ्या अभिनेत्याच्या रूपात प्रस्थापित केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here