Home साप्ताहिक श्रध्दा-संस्कृती कर्म हेच ब्रह्मदेव

कर्म हेच ब्रह्मदेव

0
कर्म हेच ब्रह्मदेव
vamanraov pai

अंधारातून प्रकाशाकडे म्हणजेच अज्ञानातून ज्ञानाकडे या विषयाअंतर्गत आपण संचित प्रारब्ध ह्या संकल्पना समजावून घेत आहोत व हा विषय किती महत्त्वाचा आहे हे मी आधीही अनेकदा अधोरेखित केलेले आहे. आपल्या जीवनाची गुरुकिल्ली त्यात आहे. आपल्याला जीवन उत्तम रीतीने जगायचे असेल, तर हा विषय समजून घेतलाच पाहिजे. ह्यांत कुठेही अंधश्रद्धा नाही. संचित, प्रारब्ध, क्रियमान, नियती, सुखदुःख, नशीब हा आपल्या जीवनाचा नकाशा आहे. ह्या सर्व प्रवासात सर्वात महत्त्वाचे काय? ते म्हणजे क्रियमाण! ह्या क्रियमाणाचे आपल्या आयुष्यात, किंबहुना समस्त मानवी जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. महत्त्व आहे कारण तर ते एका बाजूने प्रारब्ध निर्माण करते व दुसऱ्या बाजूने नियती निर्माण करते. म्हणून प्रयत्नवादाचे महत्त्व आहे, ते इथे आहे. कारण प्रयत्न हे रत्न देवापेक्षाही श्रेष्ठ आहे.

https://prahaar.in/2026/07/16/eteshu-rupeshu-lakshmi-manifestations/

क्रियमाण करताना सावध चित्ताने केले तर एका बाजूने प्रारब्धाचा भोग सहज भोगता येतो व दुसऱ्या बाजूने शुभ नियती निर्माण करू शकतो. पण त्यासाठी योग्य मार्गदर्शन लागते. ह्या क्रियमाणाला म्हणजे कर्माला तोंडे आहेत. जसे ब्रह्मदेवाला चार तोंडे आहेत तसे विचार, इच्छा, उच्चार, आचार ही कर्मरूपी ब्रह्मदेवाला चार तोंडे आहेत. कर्म म्हणजे ब्रह्मदेव आहे. आपले शास्त्र सांगते, ब्रह्मदेव हा निर्माता आहे. तसे कर्म हे निर्माता आहे. आपण ब्रह्मदेव आहोत. ह्या कर्माचे पहिले तोंड म्हणजे विचार, ह्या विचारांचे महत्त्व अगणित आहे. विचारांच्या ठिकाणी सावध राहिलात तर आपल्या जीवनाला आपण पाहिजे तसा आकार देऊ शकतो. विचारांवर नीट लक्ष दिले तर आपल्या जीवनाला आपणच पाहिजे तसा आकार देऊ शकतो. हे आपल्याच हातात आहे म्हणून “तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार.” माणसाच्या हातात सर्व आहे.

https://prahaar.in/2026/07/16/introspection/

देव तुमच्या जीवनात ढवळाढवळ करीत नाही. देवाने तुम्हाला बुद्धी व कर्मस्वातंत्र्य दिले आहे. देवाने किंवा निसर्गाने म्हणा, तुम्हाला जे बुद्धी व कर्मस्वातंत्र्य दिलेले आहे, त्याचा वापर कसा करायचा हे तुम्हीच ठरवा. तुम्हाला कळत नसेल तर कुणाचा तरी सल्ला घ्या. तुला जर वाटत असेल मी ज्ञानी आहे तर कुणाकडे जाऊ नकोस. म्हणजे तू करतोस त्याला जबाबदार तूच आहेस. म्हणून कर्म काय करायचे हे देव ठरवणार नाही. नियती ठरवणार नाही. तुला बुद्धीचा वापर कसा करायचा हे कळत नसेल, तर कुणाकडे जाऊन, शिकून घे. विचार काय करतो पाहिले तर तुला कळेल की आपण कसे विचार करतो. विचार करतो ते चांगले करतो की वाईट करतो. त्यातून काय निर्माण करतो आहे हे कळेल. तरीसुद्धा तू स्वतःला ज्ञानी समजत असशील तर मग सगळा खटाटोप व्यर्थ आहे. गुरूबिरू नको म्हणणारी माणसे मूर्ख आहेत. कुणाचे तरी शिष्यत्व घ्यायला कमीपणा वाटतो ? स्वयंपाक करताना मुलींना आईच्या हाताखाली शिकावे लागते. आपल्याला कुणीतरी शिकवतो तेव्हा मार्गक्रमण कसे करायचे ते कळते व मार्गक्रमण केल्यावर दर्शन होते. मार्गदर्शन म्हणजे काय? तर योग्य मार्गक्रमण केल्यावर दर्शन होते. म्हणून विचार कसे करायचे? बुद्धीचा वापर कसा करायचा? हे कुणाकडून तरी शिकून घे.

___सद्गुरू वामनराव पै

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here