मुंबई : भारतीय क्रिकेट संघातील अत्यंत शांत, संयमी आणि कठीण काळात संघाचा ‘संकटमोचक’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माजी कर्णधार अजिंक्य रहाणेने (Ajinkya Rahane) आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अखेरचा निरोप दिला आहे. ३८ वर्षीय अजिंक्यने सोशल मीडियावर एक भावुक व्हिडिओ शेअर करत आपल्या कारकिर्दीवर पडदा पाडला. मागील काही काळापासून तो भारतीय संघातून बाहेर होता; जुलै २०२३ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध खेळलेला कसोटी सामना हा त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील अखेरचा सामना ठरला.
“कॅप २७८ आता निरोप घेत आहे…”
View this post on Instagram
अजिंक्यने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून निवृत्तीची घोषणा करताना एक अत्यंत संवेदनशील संदेश लिहिला. “कॅप नंबर २७८ आता कायमची निरोप घेत आहे. इतक्या वर्षांत देशवासियांनी, चाहत्यांनी मला जे प्रेम आणि भक्कम पाठिंबा दिला, त्याबद्दल मी आयुष्यभर ऋणी राहीन,” अशा शब्दांत त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या. व्हिडिओमध्ये बोलताना त्याचा गळा दाटून आला होता. डोळ्यांतून वाहणारे अश्रू आणि थरथरणारे शब्द आवळत त्याने पुढे मराठीत चाहत्यांचे आभार मानले. “तुम्ही मला कधीही परके मानले नाही, नेहमी कुटुंबातील एका सदस्याप्रमाणे प्रेम दिले,” असे सांगताना त्याला स्वतःच्या अश्रूंवर नियंत्रण ठेवणे कठीण झाले होते.
परदेशी भूमीवर गाजवलेले शौर्य
मुंबईच्या मैदानातून क्रिकेटचे धडे गिरवणाऱ्या अजिंक्य रहाणेने भारतासाठी अनेक ऐतिहासिक विजयांमध्ये मोलाचा वाटा उचलला. विशेषतः ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेसारख्या आव्हानात्मक परदेशी मैदानांवर जेव्हा-जेव्हा भारतीय फलंदाजी कोलमडली, तेव्हा अजिंक्य ढालीसारखा खंबीरपणे उभा राहिला. २०२०-२१ मधील ऐतिहासिक मेलबर्न कसोटीतील त्याचे शतक आणि त्याच्या नेतृत्वाखाली भारताने ऑस्ट्रेलियात मिळवलेला ‘बॉर्डर-गावस्कर चषक’ विजय हा क्रिकेटच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेला आहे. त्याच्या निवृत्तीमुळे भारतीय क्रिकेटमधील एका सुसंस्कृत, प्रामाणिक आणि अत्यंत आदरणीय अध्यायाची सांगता झाली आहे.
https://prahaar.in/2026/07/30/karnataka-man-asks-rs-40-lakh-from-daughters-groom-to-be-stabs-her-after-she-objects/
कसोटी कारकिर्दीची आकडेवारी आणि नेतृत्व
अजिंक्यने भारतासाठी ८५ कसोटी सामन्यांच्या १४४ डावांमध्ये ३८.४६ च्या सरासरीने ५,०७७ धावा उभारल्या. यात त्याने १२ शतके आणि २६ अर्धशतके झळकावली असून १८८ ही त्याची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या राहिली. याशिवाय, त्याने ६ कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघाचे यशस्वी नेतृत्व केले. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने ४ सामन्यांत विजय मिळवला, तर २ सामने अनिर्णित (Draw) राहिले; म्हणजेच कर्णधार म्हणून तो एकही कसोटी सामना हरला नाही.
एकदिवसीय आणि टी-२० मधील योगदान
कसोटीव्यतिरिक्त मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्येही अजिंक्यने छाप पाडली. ९० एकदिवसीय सामन्यांतील ८७ डावांमध्ये त्याने ३५.२६ च्या सरासरीने २,९६२ धावा केल्या, ज्यामध्ये ३ शतके आणि २४ अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच २० आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांमध्ये त्याने भारताचे प्रतिनिधित्व करताना ३७५ धावांची भर घातली.