Home देश ICMR on Young Childrens : भारतातील लहान मुलांना गंभीर आजारांचा धोका; आयसीएमआरचा चिंताजनक इशारा

ICMR on Young Childrens : भारतातील लहान मुलांना गंभीर आजारांचा धोका; आयसीएमआरचा चिंताजनक इशारा

0
ICMR on Young Childrens : भारतातील लहान मुलांना गंभीर आजारांचा धोका; आयसीएमआरचा चिंताजनक इशारा

नवी दिल्ली: आजच्या बदलत्या जीवनशैलीत मुलांच्या खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये झालेला बदल पालकांसाठी अत्यंत चिंतेचा विषय बनला आहे. ‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’ (ICMR) अंतर्गत असलेल्या ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन’ (NIN) या संस्थेने एक नवीन आणि धक्कादायक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार, जंक फूड, कोल्ड ड्रिंक्स आणि पॅकबंद ज्यूस हे आता भारतातील लहान मुलांच्या आरोग्याचे सर्वात मोठे शत्रू ठरत आहेत. तुमच्या घरातही लहान मूल असेल आणि ते वारंवार पिझ्झा, बर्गर किंवा शीतपेयांचे सेवन करत असेल, तर हा अहवाल तुमच्यासाठी एक मोठा इशारा आहे.

https://prahaar.in/2026/07/29/orders-prohibiting-weapons-and-assembly-issued-in-nashik/

लठ्ठपणा आणि मधुमेहाचा वाढता विळखा

अहवालातील आकडेवारी अत्यंत चिंताजनक आहे. देशातील ५ ते १९ वयोगटातील सुमारे ४ कोटी १० लाख मुलं अतिरिक्त वजन किंवा लठ्ठपणाच्या समस्येने त्रस्त आहेत. परिस्थिती किती गंभीर आहे याचा अंदाज यावरून येतो की, या वयोगटातील जवळपास १० टक्के मुले ‘प्री-डायबेटिस’च्या उंबरठ्यावर आहेत, १ टक्के किशोरवयीन मुलांना मधुमेह जडला आहे, तर तब्बल ५ टक्के मुले उच्च रक्तदाबाचा (High BP) सामना करत आहेत. थोडक्यात सांगायचे तर, आज देशात दर तीन मुलांपैकी एका मुलाला कोणत्या ना कोणत्या गंभीर आजाराचा त्रास होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

https://prahaar.in/2026/07/29/world-tiger-day-2026-where-villages-once-stood-the-roar-of-tigers-now-echoes-tigers-roam-freely-in-the-satpuras/

जंक फूड म्हणजे नेमकं काय?

वैज्ञानिक भाषेत जंक फूडला ‘HFSS’ म्हणजेच High Fat, Sugar, and Salt असे म्हटले जाते. याचा अर्थ असा की, या पदार्थांमध्ये चरबी (फॅट), साखर आणि मीठ यांचे प्रमाण अत्यंत धोकादायक पातळीवर जास्त असते. चिप्स, पिझ्झा, बर्गर, फ्रेंच फ्राईज, मोमोज, शीतपेये आणि पॅकबंद स्नॅक्स यांसारख्या पदार्थांमधून शरीराला मिळणारे पोषणमूल्य नगण्य असते, परंतु त्यातील कॅलरीजचे प्रमाण मात्र खूप जास्त असते. असे अस्वास्थ्यकर पदार्थ रोज खाल्ल्यामुळे मुलांचे वजन झपाट्याने वाढते. कालांतराने याच लठ्ठपणामुळे मधुमेह, हृदयविकार, उच्च रक्तदाब आणि कर्करोगासारखे जीवघेणे आजार उद्भवण्याचा धोका निर्माण होतो.

https://prahaar.in/2026/07/29/threat-of-100-tariffs-looms-over-these-5-countries-including-india/

बाजारपेठेत दीडशे टक्क्यांची प्रचंड वाढ

गेल्या काही वर्षांत भारतात ‘अल्ट्रा-प्रोसेस्ड’ खाद्यपदार्थांच्या बाजारपेठेने प्रचंड वेग घेतला आहे. एका अहवालानुसार, २००६ मध्ये केवळ ०.९ अब्ज डॉलर्स इतके मूल्य असलेली ही बाजारपेठ २०१९ पर्यंत तब्बल ३७.९ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली. विशेषतः २००९ ते २०२३ या चौदा वर्षांच्या काळात अशा अस्वास्थ्यकर खाद्यपदार्थांच्या विक्रीत तब्बल दीडशे टक्क्यांची प्रचंड वाढ झाली आहे.

https://prahaar.in/2026/07/29/india-on-pok-elections-india-issues-a-stern-warning-to-pakistan-regarding-the-pok-elections-merely-a-charade-to-mask-the-illegal-occupation/

पालकांसाठी धोक्याची घंटा

लहान मुलांच्या आरोग्याचा हा प्रश्न आता केवळ एका घरापुरता मर्यादित नसून तो राष्ट्रीय आरोग्याची मोठी समस्या बनत चालला आहे. वेळीच पावले उचलली नाहीत, तर येत्या काळात तरुण पिढी गंभीर आजारांच्या विळख्यात अडकण्याचा धोका आहे. त्यामुळे पालकांनी मुलांच्या खाण्याच्या सवयींवर लक्ष ठेवणे, त्यांना घरचे पौष्टिक अन्न खायला देणे आणि जंक फूडपासून दूर ठेवणे अत्यंत गरजेचे झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here