ठाणे : पावसाळ्यात धबधबे आणि हिरवाईचा आनंद घेण्यासाठी माळशेज घाटाकडे जाण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. मुसळधार पावसामुळे करंजाळे गावाजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वरील रस्ता मोठ्या प्रमाणात खचल्याने माळशेज घाटातील वाहतूक आणखी किमान तीन ते चार दिवस बंद राहणार आहे. त्यामुळे पर्यटकांनी सध्या माळशेजकडे जाण्याचे नियोजन टाळावे आणि पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.(malshej ghat)
https://prahaar.in/2026/07/29/pandharpur-flood-pandharpur-in-the-grip-of-floods-the-chandrabhaga-river-is-flowing-bank-full/
करंजाळे गावाजवळ नव्याने काँक्रिट(concrete) करण्यात आलेल्या रस्त्याचा सुमारे १०० मीटरचा भाग पाच ते सहा फूट खोलपर्यंत खचल्याने हा मार्ग पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून दुरुस्तीचे काम सुरू असले, तरी ते पूर्ण होण्यासाठी आणखी काही दिवस लागणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे सध्या या मार्गावरून वाहतूक सुरू होण्याची शक्यता नाही.(malshej ghat)
प्राथमिक माहितीनुसार, मुसळधार पावसामुळे रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात पाणी साचले. त्याचबरोबर शेजारील शेतीमधील खोदकामामुळे संरक्षक भिंतीच्या पायाभूत रचनेवर ताण आला आणि अखेर रस्त्याचा मोठा भाग खचला. सुरक्षिततेच्या कारणास्तव प्रशासनाने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.पावसाळ्यात माळशेज घाटात हजारो पर्यटकांची गर्दी होत असते. मात्र सध्याची परिस्थिती लक्षात घेता घाट परिसरातील सहली टाळण्याचा सल्ला प्रशासनाने दिला आहे. सतत सुरू असलेल्या पावसामुळे दरड कोसळण्याचा धोकाही कायम असल्याने प्रवासापूर्वी वाहतुकीची अद्ययावत माहिती तपासण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, वाहनचालकांसाठी दोन पर्यायी मार्ग सुचविण्यात आले आहेत. आळेफाटा–राजगुरुनगर–चाकण–तळेगाव एमआयडीसी–लोणावळा–मुंबई हा पहिला, तर आळेफाटा–संगमनेर–नाशिक–कसारा–कल्याण–मुंबई हा दुसरा मार्ग वापरता येणार आहे. मात्र या मार्गांमुळे प्रवासाचा कालावधी साधारण चार ते पाच तासांनी वाढण्याची शक्यता आहे. याचा परिणाम दूध, भाजीपाला आणि इतर नाशवंत वस्तूंच्या वाहतुकीवरही होत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.(malshej ghat)