Home ब्रेकिंग न्यूज Laxmanrao Joshi : ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मणराव जोशी यांचे निधन; ‘व्रतस्थ संपादकाला मुकलो’ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Laxmanrao Joshi : ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मणराव जोशी यांचे निधन; ‘व्रतस्थ संपादकाला मुकलो’ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
Laxmanrao Joshi : ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मणराव जोशी यांचे निधन; ‘व्रतस्थ संपादकाला मुकलो’ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर :  नागपूर ‘तरुण भारत’चे माजी मुख्य संपादक ल. त्र्यं. (लक्ष्मणराव) जोशी (Laxmanrao Joshi) यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला आहे. पत्रकारितेतील चिंतनशील, व्रतस्थ व्यक्तिमत्त्व आणि विविध विषयांचे गाढे अभ्यासक हरपल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

https://prahaar.in/2026/07/28/fake-ceo-id-used-in-attempt-to-defraud-company-of-%e2%82%b996-lakh/

मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, राजकारण आणि सिंचन अनुशेष हे लक्ष्मणराव जोशी यांच्या विशेष अभ्यासाचे विषय होते. पत्रकार म्हणून एखादा प्रकल्प दत्तक घेऊन त्यावर सातत्याने लेखन करण्याची परंपरा त्यांनी रुजवली. गोसीखुर्द प्रकल्पावर त्यांनी केलेले विपुल लेखन त्याचे उत्तम उदाहरण असल्याचे त्यांनी नमूद केले.

लक्ष्मणराव जोशी यांनी ‘तरुण भारत’मध्ये प्रदीर्घ काळ सेवा बजावत मुख्य संपादक म्हणून काम पाहिले. निवृत्तीनंतरही त्यांनी गोवा आणि इतर ठिकाणच्या विविध वृत्तपत्रांमध्ये संपादक म्हणून कार्य केले. तसेच समाजमाध्यमांच्या माध्यमातूनही त्यांनी आपली लेखणी अखेरपर्यंत सक्रिय ठेवली.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “संपादकपदावर असतानाही हाडाचे पत्रकार कसे असतात, याचे लक्ष्मणराव जोशी हे मूर्तिमंत उदाहरण होते. माझ्या वडिलांच्या काळापासून त्यांचा परिचय होता. त्यांचे सातत्याने मार्गदर्शन लाभले. त्यांच्या निधनाने अभ्यासू आणि पितृतुल्य व्यक्तिमत्त्व मी गमावले आहे.”

लक्ष्मणराव जोशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आपण सहभागी असल्याची भावना व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here