Home देश Panipuri History : पाणीपुरीचा शोध महाभारतातील द्रौपदीने लावला होता ? जाणून घ्या या लोकप्रिय पदार्थाचा अनोखा इतिहास!

Panipuri History : पाणीपुरीचा शोध महाभारतातील द्रौपदीने लावला होता ? जाणून घ्या या लोकप्रिय पदार्थाचा अनोखा इतिहास!

0
Panipuri History : पाणीपुरीचा शोध महाभारतातील द्रौपदीने लावला होता ? जाणून घ्या या लोकप्रिय पदार्थाचा अनोखा इतिहास!

नवी दिल्ली : आंबट-तिखट पाणी, खमंग पुऱ्या आणि जिभेवर होणारी चवींची उधळण… भारताच्या कानाकोपऱ्यात मिळणारा ‘पाणीपुरी’ हा असा पदार्थ आहे, ज्याचे नाव काढताच प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटते. पण या लाडक्या पाणीपुरीचा शोध नेमका कुठे आणि कसा लागला? यावर जर तुम्ही पाच वेगवेगळ्या लोकांना विचारले, तर भारत-पाकिस्तानच्या क्रिकेट सामन्यावर जितक्या आवेशाने चर्चा रंगतात, तितक्याच ठामपणे प्रत्येक जण तुम्हाला वेगवेगळी उत्तरे देईल. पाणीपुरीच्या उग्माबाबत अनेक कथा आणि दावे केले जातात, परंतु या सर्व आख्यायिकांमध्ये सर्वात जास्त रंजक आणि नाट्यमय कथा जोडली जाते ती थेट महाभारतातील पंचाल देशाची राजकुमारी ‘द्रौपदी’ हिच्याशी!

द्रौपदी आणि पाणीपुरीची पौराणिक कथा

‘अमर चित्र कथा’नुसार, पांडवांच्या वनवासाच्या काळात एक रंजक प्रसंग घडला होता. नुकतेच लग्न होऊन आलेल्या द्रौपदीच्या गृहिणीपदाची आणि कल्पकतेची परीक्षा घेण्याचे तिची सासू कुंती यांनी ठरवले. कुंती यांनी द्रौपदीच्या हातात अगदी थोडेसे शिल्लक राहिलेले बटाट्याचे भाजी-सारण आणि एका लहानशा चपातीपुरतीच कणिक दिली. साहित्य कितीही कमी असले, तरी पाचही पांडवांचे पोट भरले पाहिजे, अशी अट कुंती यांनी द्रौपदीसमोर ठेवली. कोणत्याही साध्या गृहिणीसाठी हे आव्हान कठीण ठरले असते. मात्र, द्रौपदीने हार मानली नाही. तिने त्या छोट्याशा कणकेचे बारीक-बारीक गोळे केले. ते लहान आकाराचे गोळे तळून छान टम्म फुगवल्या जाणाऱ्या पुऱ्या बनवल्या आणि त्यात बटाट्याचे उरलेले सारण भरले. थोड्याशा साहित्यापासून तयार झालेला हा नवीन पदार्थ पाचही भावांसाठी पुरेसा ठरला. द्रौपदीची ही कल्पकता पाहून कुंती अत्यंत प्रसन्न झाल्या आणि त्यांनी या पदार्थाला अमरत्वाचा आशीर्वाद दिला. म्हणूनच की काय, हजारो वर्षांनंतरही पाणीपुरी प्रत्येकाची ‘ऑल-टाईम फेव्हरेट’ राहिली आहे.

प्राचीन मगध साम्राज्य आणि ‘फुलकी’चा उगम

द्रौपदीची ही कथा ऐकायला जितकी सुंदर वाटते, तितकाच पाणीपुरीचा ऐतिहासिक प्रवासही वेगळा आहे. इतिहासकारांच्या मते, पाणीपुरीचा उगम प्राचीन ‘मगध’ राज्यात म्हणजे आजचा बिहार परिसर झाला. या काळात भारतीय उपखंडात वेगवेगळ्या प्रकारच्या खमंग आणि नमकीन (फारसाण) पदार्थांचा शोध लागत होता. त्या काळात पाणीपुरीच्या या पूर्वजाला ‘फुलकी’ असे म्हटले जायचे. रंजक गोष्ट म्हणजे आजही भारताच्या काही भागांत पाणीपुरीला ‘फुलकी’ या नावानेच ओळखले जाते. त्या काळातील पुऱ्या आजच्या तुलनेत अधिक लहान आणि कुरकुरीत असायच्या. मात्र, त्यामध्ये नेमके कोणते सारण भरले जायचे, याची अचूक नोंद उपलब्ध नाही.

इतिहासाच्या पानांवर नाव नसलेला अवलिया

महाभारतातील कथेसारखे ऐतिहासिक नोंदींमध्ये पाणीपुरीचा शोध लावणाऱ्या कोणत्याही एका विशिष्ट व्यक्तीचे नाव आढळत नाही. कणकेचा छोटा गोळा तळून तो पोकळ होईपर्यंत फुगवणे आणि त्यात चवदार सारण भरून एकाच घासात खाणे, ही भन्नाट कल्पना सर्वात आधी कोणाला सुचली, हे रहस्य आजही इतिहासाच्या गर्भात दडलेले आहे.

एकाच पदार्थाची अनेक नावे

पाणीपुरीचा जन्म वनवासातील द्रौपदीच्या कल्पकतेतून झाला असो वा प्राचीन मगधातील बाजारपेठेतून, आज या पदार्थाने संपूर्ण देशावर राज्य केले आहे. प्रत्येक राज्यात या पदार्थाला एका नव्या नावाने आणि चवीने ओळखले जाते. उत्तर भारतात याला ‘गोलगप्पा’, कोलकातामध्ये ‘पुचका’, ओडिशामध्ये ‘गुपचुप’, तर उत्तर प्रदेशच्या काही भागांत ‘बताशे’ असे म्हटले जाते. काळ बदलला तरी रस्त्यावरील टपरीवर उभं राहून चमचमीत पाणीपुरी खाण्याचा आनंद आजही तसाच कायम आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here