मुंबई : मुंबईला (Mumbai) पाणी पुरवठा (Water Supply) करणाऱ्या सर्व धरणांमधील पाणी साठा आता चांगल्याप्रकारे वाढू लागला असून मागील आठवड्यात ४९ टक्क्यांच्या आतच रेंगाळणारी पाण्याची पातळी आता प्रत्येक दिवशी सरासरी ५ ते ६ मीटरने वाढून पाणी साठ्यात वाढ होताना दिसत आहे. २४ जुलैपर्यंत या सर्व धरणांमध्ये ७७.६२ टक्के एवढा पाणी साठा जमा झाला असून मागील वर्षीच्या तुलनेत दहा टक्क्यांनी साठा कमी आहे. तर त्या आधीच्या वर्षीच्या तुलनेत १९ टक्क्यांनी अधिक आहे. त्यामुळे पाणी साठा सुस्थितीत असला तरी प्रतीक्षा आहे ती ऑगस्टमधील पावसाची.
मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या धरणांमध्ये वर्षभराची तहान भागवण्यासाठी १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर अर्थात १ लाख ४४ हजार ७३६ कोटी लिटर एवढ्या पाण्याची आवश्यकता असते.त्यातुलने यासर्व धरणांमध्ये २४ जुलै सकाळपर्यंत ७७.६२ टक्के पाणी साठा जमा झाला आहे. यासर्व धरणांमध्ये ११ लाख २३ हजार ४४३ दशलक्ष लिटर अर्थात १ लाख १२ हजार ३४४ कोटी लिटर एवढ्या पाण्याचा साठा जमा झाला आहे.
https://prahaar.in/2026/07/25/ashadhi-ekadashi-the-mahapuja-and-mahabhishek-were-performed-by-mumbai-mayor-smt-ritu-tawde-at-the-prati-pandharpur-vitthal-temple-wadala/
आतापर्यंत विहार, तुळशी, तानसा आणि मोडकसागर हे चार धरणे भरुन वाहू लागली असून मुंबईकरांना सर्वांत जास्त पाण्याचा पुरवठा केला जाणाऱ्या भातसा धरणांतील पाणी साठा ७३.५१ टक्के एवढा पाणी साठा जमा झाला आहे. येत्या काही दिवसांमध्ये पावसाची शक्यता कमीच आहे.त्यामुळे तलावांतील पाणी साठा वाढत असला तरी महापालिका प्रशासन मात्र ३१ सप्टेंबर पर्यंतच्या पाणी साठ्यांवरच पुढील नियोजन ठरवत असते. त्यामुळे सध्या लागू करण्यात आलेली १० टक्के पाणी कपात आणि २० टक्के कमर्शियलची पाणीकपात ही पुढेही कायम ठेवली जाणार आहे. स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी तलावातील पाणी साठा असला तरी लागू करण्यात आलेली कपात हवामान खाते तथा वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार मागे घेणे हिताचे नसून पुढील पावसाळा लक्षात घेवूनच कपात मागे घेतला जाण्याचा निर्णय घेतला जाईल. पण लागू कपात आता मागे घेता येणार नाही असे स्पष्ट केले.
धरणांमधील पाणी साठ्याची टक्केवारी
- अप्पर वैतरणा : ६२ टक्के
- मोडक सागर : १०० टक्के
- तानसा : ९८.७७ टक्के
- मध्य वैतरणा : ७५.१४ टक्के
- भातसा : ७३.५१ टक्के
- विहार : १०० टक्के
- तुळशी : १०० टक्के
२४ जुलैपर्यंत मागील तीन वर्षांपर्यंतचा पाणीसाठा(दशलक्ष लिटरमध्ये)
सन २०२६ : ११ लाख २३ हजार ४४३ (७७.६२ टक्के)
सन २०२५ : १२ लाख ६२ हजार ६५२ (८७.२४ टक्के)
सन २०२४ : ८ लाख ४१ हजार ३९८ (५८.१३ टक्के)