मुंबई : मुंबईतील (Mumbai) भटके श्वान (Dogs) व मांजरींचे (Cats) लसीकरणासाठी तसेच ‘रेबीजमुक्त मुंबई’ करण्यासाठी मुंबई महानगरपालिका (BMC) आणि वर्ल्डवाईड व्हेटरनरी सर्व्हिसेस-होप/मिशन रेबीज इंडिया (WVS-HOPE/Mission Rabies India) यांच्यात महानगरपालिका मुख्यालय येथे गुरुवारी २३ जुलै २०२६ रोजी सामंजस्य करार करण्यात आला. या सामंजस्य करार अंतर्गत, ही संस्था मुंबईतील भटक्या कुत्र्यांचे रेबीज लसीकरण करण्यासाठी नि:शुल्क सेवा प्रदान करणार आहे, अशी माहिती अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) प्राजक्ता लवंगारे यांनी दिली. अतिरिक्त आयुक्त (शहर) प्राजक्ता लवंगारे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मार्गदर्शनात हा सामंजस्य करार करण्यात आला.

उप आयुक्त (विशेष) विनायक विसपुते, देवनार पशुवधगृहाचे महाव्यवस्थापक डॉ. कलीमपाशा पठाण, मिशन रेबीज इंडियाचे संचालक तसेच डब्ल्यूव्हीएस-होपचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बालाजी चंद्रशेखर यांची यावेळी उपस्थिती होती.
https://prahaar.in/2026/07/24/sonam-wangchuk-ends-fast-after-26-days-takes-major-decision-to-avert-violence/
अतिरिक्त आयुक्त (शहर) प्राजक्ता लवंगारे यावेळी म्हणाल्या की, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभाग तसेच मत्स्यपालन आणि पशूसंवर्धन विभागाच्या संयुक्त विद्यमाने वर्ष २०३० पर्यंत श्वानांपासून होणाऱ्या रेबीज रोगाच्या निर्मुलनासाठी राष्ट्रीय कृती आराखडा निश्चित करण्यात आला आहे. तथापि, भारतीय कल्याण मंडळ यांनी सुचवलेल्या मानक कार्यपद्धत्तीनुसार, सार्वजनिक आरोग्याच्या संरक्षणासाठी भटक्या श्वानांचे लसीकरण करून रेबीज निर्मूलनासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. या अनुषंगाने, मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘रेबीजमुक्त मुंबई’ करण्याच्या उद्देशाने विविध उपाययोजना केल्या जात आहेत. या उपाययोजनेचा एक भाग म्हणून वर्ल्डवाईड व्हेटरनरी सर्व्हिसेस-होप/मिशन रेबीज इंडिया (WVS-HOPE/Mission Rabies India) या संस्थेसोबत २०२६ ते २०२८ या तीन वर्षांच्या कालावधीसाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे. या अंतर्गत, रेबीज आजाराविषयी जनजागृती व शिक्षण, रेबीज प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा प्रसार, भटक्या श्वानांचे मोठ्या प्रमाणावर रेबीज प्रतिबंधक लसीकरण (Mass Dog Vaccination) तसेच रेबीज सर्व्हिलन्स (Rabies Surveillance) उपक्रम राबविण्यात येणार आहे, असेही प्राजक्ता लवंगारे यांनी सांगितले.