Home संपादकीय जनसंवाद

जनसंवाद

0
जनसंवाद

बेस्ट बससेवेची शताब्दी

मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या ‘बेस्ट’ बससेवेला १५ जुलै २०२६ रोजी १०० वर्षे पूर्ण झाली. १५ जुलै १९२६ रोजी दक्षिण मुंबईत अवघ्या २४ बससह सुरू झालेला हा प्रवास आज २८०४ बसच्या ताफ्यापर्यंत पोहोचला आहे. ४०० हून अधिक मार्गांवर दररोज २५ लाख प्रवासी बेस्टचा प्रवास करतात. ८ डिसेंबर १९३७ रोजी ताफ्यात दुमजली बस आल्या आणि ७ ऑगस्ट १९४७ रोजी ही सेवा मुंबई महानगरपालिकेच्या अधिपत्याखाली आली. काळाच्या ओघात साध्या बस, वातानुकूलित आणि आता पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक बसच्या माध्यमातून बेस्टने स्वतःला आधुनिक केले आहे. ‘मुव्हीट’ आणि ‘चलो’ ॲपसारख्या सुविधांमुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. संकटाच्या काळातही कर्मचाऱ्यांनी अविरत सेवा देत बेस्टचे नाव उज्ज्वल ठेवले आहे. मुंबईकरांच्या मनातील या बससेवेचे स्थान अढळ असून, येणाऱ्या काळातही ही सेवा अधिक सक्षम होईल, यात शंका नाही.- प्रदीप अनुसया शंकर मोरे, अंधेरी (पूर्व)

शिक्षकांना अशैक्षणिक कामांतून मुक्त करा

मतदार यादी पडताळणीच्या (एसआयआर) तणावामुळे मुंबईतील एका शिक्षिकेने केलेल्या आत्महत्येचा प्रयत्न शिक्षण व्यवस्थेसाठी धोक्याची घंटा आहे. विद्यार्थ्यांना घडवणाऱ्या शिक्षकांवर जनगणना, निवडणुका आणि विविध सर्वेक्षणांचा बोजा टाकणे अत्यंत चुकीचे आहे. या अशैक्षणिक कामांमुळे शिक्षकांचा अध्यापनाचा वेळ वाया जातो आणि मानसिक तणाव वाढतो. राज्यात लाखो सुशिक्षित बेरोजगार युवक-युवती उपलब्ध आहेत. त्यांना आवश्यक प्रशिक्षण देऊन सर्वेक्षण किंवा प्रशासकीय कामांसाठी नियुक्त केल्यास, बेरोजगारांना रोजगार मिळेल आणि शिक्षकांना त्यांच्या मूळ अध्यापनाच्या कामावर लक्ष केंद्रित करता येईल. शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी आणि शिक्षकांचे मानसिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी शासनाने यावर निर्णय घेणे गरजेचे आहे.- दीपक काशिराम गुंडये, वरळी

राजकीय परिपक्वतेचा अभाव

शिवसेना (उबाठा) पक्षाने अयोध्येतील कथित भ्रष्टाचार मुद्द्यावरून नागपुरात ‘रामरक्षा आंदोलन’ करण्याचे ठरवले आहे. मात्र, हा विषय भावनेशी जोडलेला असल्याने, अशा आंदोलनांमुळे पक्षाची प्रतिमा नकारात्मक ठरू शकते. अयोध्येतील प्रकरणाची चौकशी कायदेशीररीत्या सुरू असताना, राजकीय हेतूने रस्त्यावर उतरणे सर्वसामान्यांना पटणारे नाही. पक्षाने आंदोलनाऐवजी महागाई, बेरोजगारी आणि शिक्षण यांसारख्या सामाजिक प्रश्नांवर लक्ष केंद्रित करायला हवे होते. या आंदोलनामुळे जुन्या वादग्रस्त विधानांची चर्चा पुन्हा सुरू होऊन पक्षाच्याच विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते. राजकारणात ‘वेळ’ आणि ‘विषय’ निवडण्याचे कौशल्य महत्त्वाचे असते. धोरणात्मक परिपक्वतेचा अभाव असल्यास अशी आंदोलने स्वतःवरच उलटतात. पक्षाने विधायक कामांवर भर दिल्यास त्यांना अधिक जनसमर्थन मिळेल.- अविनाश देशपांडे, पुणे

प्लास्टर ऑफ पॅरिसचा विळखा

२०१२ पासून पीओपी मूर्तींविरोधात न्यायालयाचे निर्देश असूनही, हा प्रश्न आजही ‘प्लास्टरमध्ये भिजत पडलेल्या घोंगड्यासारखा’ प्रलंबित आहे. सरकार शाडू मातीसाठी निधी देत असले, तरी बाजारात आजही रासायनिक रंगांच्या मूर्तींचेच वर्चस्व दिसते. भक्तीपेक्षा भव्यता आणि श्रद्धेपेक्षा स्पर्धा वाढल्यामुळे हे प्रश्न जटिल झाले आहेत. मागणी मोठी आणि पर्यायांची उपलब्धता मर्यादित असल्याने पीओपीचा वापर थांबवणे कठीण झाले आहे. केवळ मोफत साहित्य वाटून उपयोग नाही, तर मूर्तिकारांना प्रशिक्षण देणे, अनियंत्रित व्यापारीकरणावर नियंत्रण आणणे आणि सातत्याने जनजागृती करणे आवश्यक आहे. निसर्गाला धोका पोहोचवून केलेले उत्सव भविष्यासाठी घातक आहेत. सरकारने ठोस धोरण राबवून पर्यावरणपूरक मूर्तींची उपलब्धता वाढवली, तरच आपण खऱ्या अर्थाने पर्यावरण रक्षण करू शकू.- विठ्ठल बाबुराव घाडी, कांदिवली, मुंबई

प्रशासकीय अनास्था आणि जनतेच्या अपेक्षा

लोकशाहीत सरकारकडून जनतेला न्याय आणि कल्याणाची अपेक्षा असते; परंतु सध्याची स्थिती चिंताजनक आहे. पावसाळ्यापूर्वीची कामे वेळेत न झाल्यामुळे होणारे पाण्याचे तुंबणे, शाळांना सुट्ट्या आणि जीवितहानी यांसारख्या समस्या प्रशासकीय अनास्थेचे प्रतीक आहेत. भ्रष्टाचार हा राज्याच्या प्रगतीतील सर्वात मोठा अडथळा ठरत आहे. तुकाराम मुंढे यांच्यासारखे प्रामाणिक अधिकारी भ्रष्टाचाराविरुद्ध लढा देत आहेत, ते कौतुकास्पद आहे. मात्र, सरकारने केवळ भ्रष्टाचाराच्या निर्मूलनावरच नव्हे, तर जनतेच्या मूलभूत समस्यांवर लक्ष केंद्रित करायला हवे. जर सरकार आपल्या जबाबदारीचे पालन करणार नसेल, तर सामान्य माणसाचे जगणे दुसह्य होईल.- महादेव गोळवसकर, मुंबई

वारकऱ्यांच्या अपघातांबाबत चिंता

आषाढी वारीच्या निमित्ताने लाखो वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे मार्गस्थ होतात. ही वारी केवळ एक धार्मिक यात्रा नसून ती भक्ती आणि शिस्तीचा एक मोठा सोहळा असतो. मात्र, अलीकडेच एका अपघातात निष्पाप वारकऱ्याला आपला जीव गमवावा लागल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. अनेक प्रकारची खबरदारी घेऊनही असे प्रकार घडतात, हे एकूणच समाजासाठी क्लेशदायक आहे. वारीच्या काळात रस्त्यावर वारकऱ्यांची मोठी गर्दी असते. अशा वेळी संबंधित मार्गावरून येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांच्या वेगावर मर्यादा असणे आवश्यक आहे.- प्र. मु. काळे, सातपूर-नाशिक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here