Home ब्रेकिंग न्यूज Mumbai Metro Line 5 : ठाणे-भिवंडी-कल्याण-उल्हासनगर मेट्रोला मिळणार वेग! कशेळी डेपोचे काम युद्धपातळीवर; २७ हेक्टर प्रकल्पातील २३% काम पूर्ण

Mumbai Metro Line 5 : ठाणे-भिवंडी-कल्याण-उल्हासनगर मेट्रोला मिळणार वेग! कशेळी डेपोचे काम युद्धपातळीवर; २७ हेक्टर प्रकल्पातील २३% काम पूर्ण

0
Mumbai Metro Line 5 : ठाणे-भिवंडी-कल्याण-उल्हासनगर मेट्रोला मिळणार वेग! कशेळी डेपोचे काम युद्धपातळीवर; २७ हेक्टर प्रकल्पातील २३% काम पूर्ण

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील मेट्रो नेटवर्क आणखी मजबूत करण्यासाठी मेट्रो मार्ग ५ (ठाणे-भिवंडी-कल्याण-उल्हासनगर) प्रकल्पाच्या कशेळी मेट्रो डेपोचे काम वेगाने सुरू आहे. या डेपोच्या माध्यमातून मेट्रो गाड्यांचे परिचालन, देखभाल आणि व्यवस्थापन अधिक सक्षम होणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) कडून कशेळी टोल प्लाझाजवळ सुमारे २७ हेक्टर क्षेत्रात हा अत्याधुनिक डेपो उभारण्यात येत आहे. जून २०२६ अखेर या प्रकल्पाचे २३ टक्के भौतिक काम पूर्ण झाले आहे. (Mumbai Metro Line 5)

मेट्रो मार्ग ५ साठी महत्त्वाचा केंद्रबिंदू :

सुमारे ३२ किलोमीटर लांबीच्या ठाणे-भिवंडी-कल्याण-उल्हासनगर मेट्रो मार्गिकेवरील संपूर्ण रोलिंग स्टॉक फ्लीट आणि दीर्घकालीन परिचालनासाठी कशेळी डेपो महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. डेपोचे संपूर्ण काम पूर्ण होण्याची वाट न पाहता मेट्रो सेवा लवकर सुरू करण्यासाठी एमएमआरडीएने टप्प्याटप्प्याने बांधकामाचे धोरण स्वीकारले आहे. त्यामुळे गाड्यांची चाचणी, तपासणी आणि देखभालीची कामे अंतरिम सुविधांच्या माध्यमातून सुरू करता येणार आहेत. (Mumbai Metro Line 5)

३० मेट्रो ट्रेनसाठी अत्याधुनिक सुविधा :

कशेळी डेपोमध्ये अनेक अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत. यामध्ये —

– सुमारे ३० मेट्रो ट्रेन संचांच्या स्थिरीकरणाची क्षमता
– ५ तपासणी बे मार्गिका आणि ४ कार्यशाळा मार्गिका
– स्वतंत्र चाचणी मार्ग आणि शंटिंग सुविधा
– ट्रेनची प्रतिबंधात्मक आणि दुरुस्तीविषयक देखभाल व्यवस्था
– डेपो नियंत्रण केंद्र आणि प्रशासकीय इमारत
– कर्मचारी निवास व्यवस्था
– वीजपुरवठा प्रणाली
– ट्रेन वॉशिंग आणि स्वच्छता सुविधा
– सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प
– अग्निशमन आणि सुरक्षा यंत्रणा

अशा विविध सुविधांचा समावेश असणार आहे. (Mumbai Metro Line 5)

https://prahaar.in/2026/07/15/major-tragedy-averted-in-mira-road-massive-fire-breaks-out-at-n-l-dalmia-school-building-students-narrowly-escape/

मऊ जमिनीवर अत्याधुनिक अभियांत्रिकीचा वापर :

कशेळी परिसरातील जमिनीखाली सुमारे ६ ते ९ मीटरपर्यंत मऊ सागरी चिकणमातीचे थर आहेत. त्यामुळे जमिनीची स्थिरता वाढवण्यासाठी एमएमआरडीएने आयआयटी मुंबईच्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली भू-सुधारणा तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. यासाठी प्रीफॅब्रिकेटेड व्हर्टिकल ड्रेन्स (PVDs) आणि टप्प्याटप्प्याने अतिरिक्त भराव टाकण्याच्या पद्धतीचा वापर केला जात आहे. सुरुवातीला सुमारे १० हेक्टर क्षेत्रात ही प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, ६.२ मीटर उंचीचा भराव टप्प्याटप्प्याने टाकण्यात आला आहे. (Mumbai Metro Line 5)

बांधकामाला वेग; अनेक कामे प्रगतिपथावर :

डेपोच्या विविध भागांचे काम एकाच वेळी सुरू आहे. यामध्ये चार मजली डेपो नियंत्रण केंद्राचे बांधकाम, कर्मचारी निवासस्थानांची पायाभरणी, आवश्यक पायाभूत सुविधांची उभारणी यांचा समावेश आहे. तसेच बीएमसीच्या २४०० मिमी आणि २७५० मिमी व्यासाच्या जलवाहिन्या खाली घेण्याचे काम नोव्हेंबर २०२५ मध्ये पूर्ण करण्यात आले आहे. (Mumbai Metro Line 5)

लवकर मेट्रो सेवेसाठी तात्पुरत्या सुविधांची उभारणी :

मेट्रो मार्ग ५ चे परिचालन लवकर सुरू करण्यासाठी कायमस्वरूपी डेपोसोबतच तात्पुरत्या सुविधाही विकसित करण्यात येत आहेत. यामध्ये प्री-इंजिनिअर्ड इमारत, तात्पुरती तपासणी शेड, चाचणी मार्ग, ऑक्झिलरी सबस्टेशन, स्वतंत्र शंटिंग नेक यांचा समावेश आहे. या सुविधांमुळे कायमस्वरूपी डेपो पूर्ण होण्यापूर्वीच मेट्रो गाड्यांच्या चाचण्या आणि कार्यान्वयनाची प्रक्रिया सुरू करता येणार आहे. (Mumbai Metro Line 5)

https://prahaar.in/2026/07/15/horrific-accident-on-the-mumbai-goa-highway-tragedy-strikes-a-family-returning-from-goa-three-killed-on-the-spot/

ठाणे ते उल्हासनगर प्रवास होणार अधिक सोपा :

कशेळी डेपो कार्यान्वित झाल्यानंतर तो मेट्रो मार्ग ५ चा तांत्रिक आणि परिचालनात्मक कणा म्हणून काम करणार आहे. यामुळे ठाणे, भिवंडी, कल्याण आणि उल्हासनगर भागातील नागरिकांना वेगवान, सुरक्षित आणि विश्वासार्ह सार्वजनिक वाहतूक सुविधा मिळणार आहे. एमएमआरडीएच्या मते, आधुनिक अभियांत्रिकी, नियोजनबद्ध अंमलबजावणी आणि टप्प्याटप्प्याच्या कामामुळे मुंबई महानगर प्रदेशातील मेट्रो कनेक्टिव्हिटीला मोठी चालना मिळणार आहे. (Mumbai Metro Line 5)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here