Nashik : येवला शहरातील विंचूर चौफुली परिसरात आसरा हॉटेलजवळ गुरुवारी झालेल्या भीषण रस्ता अपघातात पिंपळगाव जलाल येथील ७७ वर्षीय दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हा दुर्दैवी अपघात घडला. या घटनेमुळे परिसरात काही काळ वाहतूक विस्कळीत झाली असून नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. मृत व्यक्तीचे नाव वसंत संभाजी वाघ (वय ७७, रा. पिंपळगाव जलाल) असे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वसंत वाघ हे त्यांच्या टीव्हीएस मोटारसायकलवरून (क्रमांक MH 13 B 4163) येवला शहरातून जात असताना विंचूर चौफुली परिसरातील आसरा हॉटेलजवळ भरधाव कंटेनरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी मोठी होती की, वाघ गंभीर जखमी झाले.
https://prahaar.in/2026/07/10/chhatrapati-sambhajinagar-crime-such-a-high-price-for-a-piece-of-advice-15-year-old-boy-kills-50-year-old-man/
घटनेची माहिती मिळताच येवला शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमी वाघ यांना त्वरित उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.
या अपघातानंतर परिसरात मोठी गर्दी झाली होती. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून वाहतूक सुरळीत केली. येवला शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक यांनी सांगितले की, अपघाताबाबत आवश्यक पंचनामा करण्यात आला असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.
विंचूर चौफुली परिसरात वाढती वाहतूक आणि भरधाव वाहनांचा वेग यामुळे हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणाचा अधिक तपास येवला शहर पोलीस करत आहेत.