मुंबई : एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईच्या (Asiatic Society of Mumbai) बहुचर्चित आणि अनेक महिन्यांपासून रखडलेल्या निवडणुका अखेर शनिवारी पार पडल्या. या निवडणुकीत ‘एशियाटिक टुमॉरी’ पॅनेलचे विनय सहस्रबुद्धे (Vinay Sahasrabuddhe) अध्यक्षपदी निवडून आले. त्यांच्या पॅनेलने अध्यक्षपदासह एकूण १९ पदांवर विजय मिळवत स्पष्ट बहुमत मिळवले. तर कुमार केतकर यांच्या नेतृत्वाखालील ‘सेव्ह एशियाटिक’ पॅनेलला पराभव स्वीकारावा लागला.
अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विनय सहस्रबुद्धे यांना ३४९ मते मिळाली. तर प्रतिस्पर्धी कुमार केतकर यांना १५० पेक्षाही कमी मते मिळाल्याची माहिती समोर आली आहे. संस्थेच्या सुमारे २,५०० सदस्यांपैकी ५०० हून अधिक सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला.
https://prahaar.in/2026/07/05/bmc-news-sonography-of-tree-roots/
या निवडणुकीपूर्वी दोन्ही पॅनेलमध्ये आरोप-प्रत्यारोप झाले होते. कुमार केतकर (Kumar Ketkar) यांच्या गटाने संस्थेवर राजकीय प्रभाव वाढवण्याचा आरोप केला होता. त्याला उत्तर देताना सहस्रबुद्धे यांच्या गटाने संस्थेत अनेक वर्षे विशिष्ट विचारांच्या लोकांनाच संधी दिली गेल्याचा दावा केला होता.
या निवडणुका मूळतः नोव्हेंबर २०२५ मध्ये होणार होत्या. मात्र मतदार यादीतील कथित अनियमितता, सदस्यत्वावरील वाद आणि विविध न्यायालयीन याचिकांमुळे निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. मुंबई उच्च न्यायालयाने निवडणुकीसंदर्भातील अनेक याचिका फेटाळल्यानंतर अखेर मतदानाचा मार्ग मोकळा झाला.
धर्मादाय आयुक्तांनी निवडणूक प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी स्वतंत्र निवडणूक अधिकाऱ्याची नियुक्ती केली होती. त्यानंतर सुधारित मतदार यादीच्या आधारे मतदान प्रक्रिया पार पडली. (Mumbai News)
https://prahaar.in/2026/07/05/mumbai-rain-update-mumbai-received-approximately-74-of-its-average-july-rainfall-in-just-24-hours/
उपाध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत रमेश पतंगे (३२९), नितीश भारद्वाज (३२८), द्विवेदी (३२७) आणि देशमुख (३२३) हे विजयी झाले.
व्यवस्थापन समितीच्या निवडणुकीत प्राची मोघे (३४१), माधव भांडारी (३३९), मल्हार कुलकर्णी (३३३), प्रमोद बापट (३२९), व्ही. चक्रवर्ती (३२४) आणि राजेश बेहरे (३२१) यांनी विजय संपादन केला.
तपासणी (स्क्रुटिनायझेशन) समितीच्या निवडणुकीत स्नेहल नागरकर यांनी सर्वाधिक ३७० मते मिळवली. त्यांच्यासोबत अभिजीत मुळे (३६२), माधवी (३६२), उमंग काळे (३५८), अमोघ जाधव (३४९), मल्हार गोखले (३४८) आणि दत्तात्रय पांचवाघ (३४४) हेही विजयी झाले.
निकालानंतर विनय सहस्रबुद्धे यांनी सर्व मतदारांचे आभार मानले. एशियाटिक सोसायटीला पुन्हा तिचे वैभव मिळवून देण्यासाठी आणि नव्या पिढीला या संस्थेशी जोडण्यासाठी सर्वसमावेशक पद्धतीने काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.