Home संपादकीय पुण्यातल्या तरुणाईवर प्रश्नचिन्ह

पुण्यातल्या तरुणाईवर प्रश्नचिन्ह

0
पुण्यातल्या तरुणाईवर प्रश्नचिन्ह

लोहगड किल्ल्यावर घडलेल्या केतन आगरवाल यांच्या हत्येने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडले आहे. ही घटना केवळ एका तरुणाच्या मृत्यूपुरती मर्यादित नसून, आजच्या बदलत्या सामाजिक मूल्यांचे, नातेसंबंधांतील विश्वासाच्या संकटाचे, तरुणांमधील वाढत्या हिंसक मानसिकतेचे आणि संवादाच्या अभावाचे विदारक वास्तव समोर आणणारे ठरले आहे. शिक्षण, आर्थिक सुबत्ता किंवा आधुनिक जीवनशैली असूनही भावनिक परिपक्वतेचा अभाव किती गंभीर परिणाम घडवू शकतो, याचे हे धक्कादायक उदाहरण आहे.

 

पुणे जिह्यातील लोहगड किल्ल्यावर घडलेल्या केतन आगरवाल मृत्यू प्रकरणाने संपूर्ण देशासह महाराष्ट्र हादरला आहे. या घटनेने वैयक्तिक नातेसंबंध, विश्वास, सुशिक्षितांमधील वाढती हिंसक वृत्ती, पर्यटनस्थळांवरील सुरक्षितता आणि मानसिक स्वास्थ्य यांसह एकूणच जेन झी पिढीतील उच्छृंखलपणा आणि गुन्हेगारी मानसिकतेचा प्रश्नच ऐरणीवर आला आहे. त्यामुळे लोहगडचे प्रकरण ही केवळ एखादी घटना न राहता सामाजिक चिंतेचा व चिंतनाचा विषय बनला आहे. म्हणूनच यापासून धडा घेऊन भविष्यात अशा घटना घडू नयेत, याकरिता वेगवेगळ्या पातळ्यांवर पावले उचलावी लागतील.

समाजात ‘लग्न’ ही केवळ उत्सव नसून जबाबदारी म्हणून त्याकडे पाहिले गेले पाहिजे. लग्नाच्या माध्यमातून यामधून दोन कुटुंब एकत्र येत असतात. अशा घटना घडल्या की याचे होणारे परिणाम हे दोन्ही कुटुंबांना भोगावे लागतात. या घटनेमुळे समाजात अनेक स्तरांवर चर्चा सुरू झाली. या घटनेने अरेंज्ड मॅरेज (ठरवून केलेल्या लग्नांमधील) विश्वासाला तडे दिले आहेत. साखरपुडा झालेली मुलगी आपल्या होणाऱ्या पतीचा इतक्या निर्दयीपणे काटा काढू शकते, या विदारक सत्याने पालकांमध्ये प्रचंड चिंतेचे आणि भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. नात्यांमध्ये केवळ वरवरची श्रीमंती किंवा सामाजिक प्रतिष्ठा पुरेशी नसते, तर अंतर्गत संवादाची आणि मानसिक विश्लेषणाची गरज किती तीव्र आहे, हे या घटनेतून सिद्ध झाले आहे. या प्रकरणाने अरेंज्ड मॅरेजमध्ये पारदर्शकता, पूर्वतपासणी आणि संमती यावर प्रŽश्न उपस्थित केले. प्रेमसंबंध लपवून लग्न करणे किती धोकादायक असू शकते, हे दाखवले. तरुण पिढीमध्ये भावनिक परिपक्वता आणि जबाबदारी यावर चर्चा सुरू झाली. अनेक कुटुंबे आता मुली/मुलांच्या संबंधांबाबत सावध झाले. प्रथम प्रेमसंबंध आणि वैवाहिक नात्यांतील विश्वास या विषयावर गंभीर प्रश्नŽ निर्माण झाले. कोणत्याही नात्याचा पाया विश्वासावर असतो, तो ढासळल्यास त्याचे परिणाम किती भीषण होऊ शकतात, याची जाणीव या घटनेने करून दिली.

मनस्वास्थ्य गरजेचे

आजच्या तरुण पिढीमध्ये संवादाची जागा अत्यंत टोकाच्या हिंसक मानसिकतेने घेतली आहे, हे यातून स्पष्ट होते. आजच्या सोशल मीडिया आणि तंत्रज्ञानाच्या जगात कुठेतरी संवाद हरवत चालला आहे. सोशल मीडिया आणि आभासी जगाचा घातक प्रभाव आजच्या पिढीवर स्पष्टपणे जाणवतो. आजची तरुण पिढी स्वत:चे वास्तव लपवून सोशल मीडियावर एक आदर्श किंवा ‘परफेक्ट’ आयुष्य दाखवण्याच्या नादात स्वत:ची विवेकबुद्धी हरवून बसली आहे. खऱ्या भावनांपेक्षा इतरांच्या नजरेत आपण कसे दिसतो, याला अवाजवी महत्त्व दिल्यामुळे अशा गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत आहेत. त्यामुळे अशा घटना वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. मुळातच या सर्वांसाठी निरोगी मन आणि शरीर यासाठी गरजेचे आहे. निकोप, निर्भेळ, स्वच्छ मनासाठी पालक, समाज, परिसर तसा असणे, गरजेचे आहे. समाजच बदलत असल्याने उथळ मानसिकतेपेक्षा सुदृढ, निकोप मन हवे. आजकाल साध्या साध्या गोष्टीतून उडत असलेल्या भडक्यावर संयम, सदसदविवेकबुद्धी हवे. यासाठी आता मानसोपचार तज्ज्ञांची गरज आहे. घर, तसेच शालेय स्तरावरूनच याची सुरुवात करायला हवी. याबरोबरच आजच्या काळात संवाद साधणे खूप महत्त्वाचे आहे. संवाद साधल्याने मनही हलके होते. मनातल्या भावना व्यक्त करण्यासाठी जवळचा मित्र, मैत्रीण असणे आवश्यक आहे. वैयक्तिक मतभेद किंवा कौटुंबिक समस्या हिंसक मार्गाने न सोडवता संवाद, समुपदेशन आणि कायदेशीर मार्गांचा अवलंब करणे हेच योग्य आहे. या घटनेमुळे पर्यटनस्थळांवरील सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. लोहगडसारख्या लोकप्रिय किल्ल्यांवर सुरक्षा व्यवस्था, सीसीटीव्ही यंत्रणा, मार्गदर्शक फलक आणि आपत्कालीन मदत यांची आवश्यकता अधिक प्रकर्षाने जाणवू लागली. या घटनेनंतर आता लोहगडसह महाराष्ट्रातील इतर प्रमुख किल्ल्यांवर सुरक्षा व्यवस्था वाढवण्याची, पर्यटकांची सक्तीची नोंदणी करण्याची आणि कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

निकोप संवाद हवा

ही घटना म्हणजे पालकांसाठी अत्यंत महत्त्वाचा धडा आहे. आपल्या मुलांच्या मनामध्ये काय चालले आहे, त्यांचा मित्रपरिवार कसा आहे, ते सोशल मीडियावर काय सर्च करत आहेत, याकडे पालकांचे बारीक लक्ष असायला हवे. मुलांशी इतका मोकळा आणि निकोप संवाद असायला हवा की, मुले कोणत्याही दबावाशिवाय आपल्या भावना मांडू शकतील. लग्नाला नकार देणे हा गुन्हा नाही; परंतु नकार देण्याची भीती जर मुलांमध्ये हिंसेची प्रवृत्ती निर्माण करत असेल, तर आपल्या संगोपनात आणि कौटुंबिक संवादात नक्कीच मोठा दोष आहे.

लोहगड अगरवाल हत्याकांड हे प्रेमाच्या नावाखालील क्रूर विश्वासघाताचे उदाहरण आहे. केतनसारख्या उज्ज्वल भविष्य असलेल्या तरुणाचा बळी गेला. संबंधांमध्ये प्रामाणिकपणा, कुटुंबीयांच्या मताचा आदर, पूर्वतपासणी आणि कायद्याची काटेकोर अंमलबजावणी हे या घटनेतून मिळणारे धडे स्पष्ट आहेत. पोलीस तपास पूर्ण होऊन न्याय मिळेपर्यंत प्रक्रिया सुरू आहे. आरोपींना शिक्षा झाली तरच बळींच्या आत्म्याला शांती मिळेल. समाजाने या प्रकारच्या घटनांवरून बोध घेऊन सुरक्षित, पारदर्शक आणि मूल्याधिष्ठित संबंध जोपासले पाहिजेत. या घटनेतून समाजाने संयम, जबाबदारी, संवाद आणि कायद्यावरील विश्वास यांचे महत्त्व ओळखणे आवश्यक आहे. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी नागरिक, प्रशासन आणि समाज या तिन्ही घटकांनी आपापली जबाबदारी पार पाडणे हीच काळाची गरज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here