Home संपादकीय मंथन जिद्दीचा प्रवास

जिद्दीचा प्रवास

0
जिद्दीचा प्रवास

दी लेडी बॉस-अर्चना सोंडे

 

कधी कधी आयुष्य आपल्याला अशा वळणावर आणून उभे करते, जिथे सर्व काही संपल्यासारखे वाटते. शरीर साथ देत नाही, मन खचलेले असते आणि भविष्य अंधारमय दिसत असते. पण अशाच काळात काही जण स्वतःला नव्याने घडवतात आणि त्यांच्या संघर्षाची कहाणी हजारो लोकांसाठी प्रेरणादायी ठरते. पुण्यातील मुग्धा प्रधान यांची कहाणी ही अशाच एका पुनर्जन्माची कथा आहे. एकेकाळी नैराश्य, वाढते वजन, हाशिमोटो रोग आणि प्री-डायबिटीज यांसारख्या समस्यांनी ग्रासलेल्या मुग्धा आज हजारो लोकांना निरोगी जीवनाचा मार्ग दाखवत आहेत. त्यांनी २०१७ मध्ये कोणतीही आर्थिक गुंतवणूक न करता सुरू केलेली ‘आयथ्राइव्ह न्यूट्रिशन कन्सल्टन्सी’ आज ३.६ कोटी रुपयांची उलाढाल करणारी संस्था बनली आहे. आज इतरांना आरोग्याचे धडे देणाऱ्या मुग्धा काही वर्षांपूर्वी स्वतःच गंभीर आरोग्य समस्यांशी झुंज देत होत्या. कामाचा प्रचंड ताण, अनियमित जीवनशैली आणि चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे त्यांचे वजन झपाट्याने वाढले. सततचा थकवा, ऊर्जाहीन वाटणे आणि मानसिक तणाव यामुळे त्यांचे आयुष्य विस्कळीत झाले. त्यांना हाशिमोटो रोग आणि प्री-डायबिटीजचे निदान झाले होते. दिवसभर काम करण्यासाठी त्या सतत कॉफी, चहा आणि जंक फूडवर अवलंबून राहायच्या. जणू काही शरीरात ऊर्जाच उरली नव्हती. स्थिती इतकी गंभीर झाली की त्या नैराश्यात गेल्या आणि आत्महत्येचे विचारही त्यांच्या मनात येऊ लागले. मात्र, याच काळात त्यांच्या आयुष्यात एक अनपेक्षित बदल घडला.

एके दिवशी योगायोगाने त्यांनी डॉ. रंगन चॅटर्जी यांचे फंक्शनल न्यूट्रिशनवरील टेड टॉक पाहिले. तो त्यांच्यासाठी आयुष्य बदलणारा क्षण होता. ‘फंक्शनल न्यूट्रिशन म्हणजे केवळ लक्षणांवर उपचार न करता आजाराच्या मूळ कारणाचा शोध घेणे. वैज्ञानिक तपासण्या, योग्य आहार, जीवनशैलीतील बदल आणि आवश्यक पोषणपूरकांच्या मदतीने शरीराला नैसर्गिकरीत्या बरे करण्याचा दृष्टिकोन आहे.’ मुग्धांनी हा मार्ग स्वतःवर वापरून पाहण्याचा निर्णय घेतला. २०१७ च्या सुरुवातीला त्यांनी संपूर्ण शरीराची तपासणी करून घेतली. आपल्या आरोग्याच्या समस्यांची मूळ कारणे समजून घेण्याचा प्रयत्न केला. जानेवारी ते जुलै २०१७ या काळात त्यांनी आहारात बदल केले. आवश्यक व्हिटॅमिन्स आणि प्रोटीन सप्लिमेंट्स घेतले आणि जीवनशैली सुधारली. अवघ्या पाच-सहा महिन्यांत त्यांचे वजन ६० किलोपर्यंत कमी झाले.

शरीरात ऊर्जा परत आली. मानसिक आरोग्य सुधारले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आत्महत्येचे विचार पूर्णपणे नाहीसे झाले. स्वतःच्या आरोग्यप्रवासातील बदलांचे फोटो मुग्धा नियमितपणे फेसबुकवर शेअर करत होत्या. हे पाहून एका मैत्रिणीने वजन कमी करण्यासाठी त्यांची मदत मागितली. आपण मदत करू शकू की नाही याची त्यांना खात्री नव्हती. पण स्वतःचे ज्ञान वापरून पाहण्याचे त्यांनी ठरवले. त्यांनी मैत्रिणीला आहारविषयक सल्ला दिला. तीन-चार महिन्यांतच त्या मैत्रिणीचे वजन कमी होऊ लागले. त्या मैत्रिणीने स्वखुशीने महिन्याला २,५०० रुपये सल्ला शुल्क दिले. तेव्हा मुग्धा यांना जाणवले की हे केवळ त्यांच्यासाठी नाही, तर अनेक लोकांसाठी उपयोगी ठरू शकते. आणि याच क्षणापासून एका नव्या करिअरचा जन्म झाला. जुलै २०१७ मध्ये त्यांनी ‘आयथ्राइव्ह न्यूट्रिशन कन्सल्टन्सी’ची सुरुवात केली. ना कार्यालय, ना कर्मचारी, ना भांडवल. मुग्धाकडे फक्त वेळ आणि कौशल्य होते. घरातून फोनवर आणि ऑनलाइन सल्लामसलत करत त्यांनी काम सुरू केले. मौखिक प्रसिद्धीमुळे त्यांच्या सेवांची चर्चा वेगाने पसरली. लवकरच देशभरातून लोक त्यांच्याशी संपर्क साधू लागले. वजन कमी करणे, मधुमेह नियंत्रणात आणणे, पचनसंस्थेच्या समस्या आणि इतर जीवनशैलीजन्य आजारांवर त्यांनी लोकांना मदत करायला सुरुवात केली. २०१८ मध्ये त्यांची भेट फंग स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टमेंट्सचे कार्यकारी संचालक राजेश राणावत यांच्याशी झाली. त्यांनी मुग्धांना त्यांच्या भविष्यातील उद्दिष्टांविषयी विचारले. प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचून औषधांशिवाय जगाला बरे करायचे आपले उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. मुग्धाच्या या ध्येयाने प्रभावित होऊन राणावत यांनी ८० लाख रुपयांच्या बीज भांडवलाचा प्रस्ताव दिला. मात्र त्यात एक अटसुद्धा होती. अट होती व्यवसायाला संघटित स्वरूप द्यायची. दोन दिवस विचार केल्यानंतर मुग्धांनी प्रस्ताव स्वीकारला. गुंतवणूक मिळाल्यानंतर त्यांनी पुण्यात एक बंगला भाड्याने घेतला आणि चार जणांच्या छोट्या टीमसह काम सुरू केले. आज ही टीम तब्बल ६० सदस्यांपर्यंत वाढली आहे. त्यांची संस्था मधुमेह, मायग्रेनसह जवळपास १७४ प्रकारच्या आरोग्य समस्यांवर जीवनशैली आणि पोषणाच्या माध्यमातून मार्गदर्शन करते. औषधांशिवाय उपचार करण्यावर ते भर देतात. फक्त गंभीर प्रकरणांमध्ये डॉक्टरांचा सल्ला घेण्यास सांगितले जाते. आज ‘आयथ्राइव्ह’ केवळ सल्लागार संस्था राहिलेली नाही. त्यांनी ‘आयथ्राइव्ह अॅकॅडमी’ची स्थापना केली आहे, जिथे फंक्शनल न्यूट्रिशनिस्ट तयार केले जातात. याशिवाय, विविध आरोग्यविषयक उत्पादनेही उपलब्ध करून दिली जातात. या सर्व उपक्रमांमधून कंपनीने ३.६ कोटी रुपयांची उलाढाल गाठली आहे.

मुग्धा यांचे बालपण १९८० च्या दशकात बंगळूरुतील व्हाईटफील्डमध्ये गेले. त्याकाळी व्हाईटफील्ड हे काही घरांचे छोटेसे गाव होते. ताजे, सेंद्रिय अन्न आणि निसर्गाच्या सान्निध्यात त्यांचे बालपण गेले. त्यांचे वडील ‘जॉय आईस्क्रीम’मध्ये काम करत होते आणि त्यांनी तब्बल ३२ नवीन फ्लेवर्स विकसित केले होते. खाद्यपदार्थांविषयीची आवड आणि प्रयोगशीलता त्यांच्याकडूनच मुग्धांना मिळाली. १९९२ मध्ये मुग्धाचे कुटुंब पुण्यात आले. मुग्धाने कमल नयन बजाज शाळेत शिक्षण घेतले आणि नंतर एसएनडीटी महिला विद्यापीठातून अन्न विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर तिने तीन वर्षे व्याख्याता म्हणूनही काम केले. शैक्षणिक पात्रता पोषणशास्त्रातील असली तरी मुग्धाने व्यावसायिक आयुष्याची सुरुवात मनुष्यबळ संसाधन  (एचआर) क्षेत्रात केली. कन्व्हर्जिस इंडिया,  फायबरलिंक, टेस्को,  फ्लिपकार्ट आणि सायटेल यांसारख्या कंपन्यांमध्ये तिने विविध पदांवर काम केले. पतीच्या नोकरीमुळे तिला सतत शहरे बदलावी लागली आणि अखेरीस ती कॅनडातील टोरोंटो येथे स्थायिक झाली. मात्र तिथेच तिचे आरोग्य ढासळले आणि आयुष्याला नवे वळण मिळाले.

२०१७ मध्ये तिने आरोग्याला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला, वैयक्तिक आयुष्यातील मोठे बदल स्वीकारले आणि पुण्यात परतली. याच निर्णयातून ‘आयथ्राइव्ह’चा जन्म झाला. कोट्यवधींचा व्यवसाय उभारल्यानंतरही मुग्धांची जीवनशैली अत्यंत साधी आहे. त्या अजूनही पुण्यात भाड्याच्या घरात राहतात. स्कुटीवर फिरतात. ऑफिस घराजवळच असल्याने त्यांनी कार घेतलेली नाही हे विशेष. त्यांच्या मते, यश म्हणजे केवळ पैसा किंवा भौतिक सुखसुविधा नव्हेत. लोकांना अधिक निरोगी बनवणे आणि त्यांना आयुष्यात यशस्वी होण्यास मदत करणे हेच त्यांचे ध्येय आहे. आयुष्य केवळ जगण्यासाठी नसते, तर भरभराटीसाठी असते, अशी त्यांची विचारसरणी आहे.

नैराश्य, आजारपण, बेरोजगारी, वैयक्तिक संघर्ष आणि अनिश्चितता यांवर मात करून मुग्धा प्रधान यांनी स्वतःचे आयुष्य बदललेच, पण हजारो लोकांच्या आयुष्यातही सकारात्मक बदल घडवला. शून्य गुंतवणुकीत सुरू झालेला त्यांचा प्रवास आज ३.६ कोटी रुपयांच्या यशस्वी उद्योगात रूपांतरित झाला आहे. त्यांची कहाणी सांगते. अंधार कितीही घनदाट असला, तरी योग्य दिशा, जिद्द आणि स्वतःवरचा विश्वास असेल, तर नव्या सुरुवातीची पहाट नेहमीच उगवते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here