नवी दिल्ली : केरळमध्ये ४ जून रोजी झाला. मात्र अल निनोच्या इफेक्टमुळे जून महिना सरत आला तरी पावसाला अपेक्षित गती मिळालेली नाही. आतापर्यंत भारतात पावसाची ४३ टक्के तूट आहे. या महिनाभरात द्वीपकल्पात वेगाने वाटचाल करत जूनच्या अखेरीस मोसमी वारे संपूर्ण देशभर पोहचायला हवे होते. पण अजूनही देशातील अनेक भागांमध्ये कोरडं वातावरण आणि निरभ्र आकाश दिसून येत आहे. मध्य भारतात पावसाची ५९ टक्के तूट आहे तर गुजरातमध्ये तब्बल ८४ टक्के कमी पावसाची नोंद झाली. महाराष्ट्रातही सरासरीहून कमी पावसाची नोंद झाली आहे. यंदाचा जून महिना गेल्या १४६ वर्षांमधील सर्वात कोरडा जून असल्याचे सांगितले जात आहे. आधीच उशिरा आगमन झालेल्या मान्सूनमुळे बळीराजाची कामे खोळंबली असताना बहुतांश भागात समाधानकारक पाऊस न पडल्याचे चित्र आहे.
https://prahaar.in/2026/06/28/venezuela-earthquake-major-shock-for-star-player-during-the-fifa-world-cup-partner-lost-in-the-earthquake/
मान्सून १५ जूनपर्यंत दक्षिण, पूर्व, ईशान्य भारतातील बहुतांश भागांमध्ये व्यापला होता. त्यानंतर मोसमी वाऱ्यांची वाटचाल अचानक थांबली. दरम्यान काही भागांमध्ये पुन्हा पाऊस सुरू झाला. मुंबई आणि परिसरात २३ ते २४ जून दरम्यान २४ तास मुसळधार पाऊस झाला. पण त्यानंतर पुन्हा एकदा मुंबईत कोरडं वातावरण निर्माण झालं. तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली. पुण्यातही गेल्या काही दिवसांपूर्वी मान्सून दाखल झाला असला तरी शहरात फक्त हलक्या सरींची नोंद झाली आहे. घाट परिसरात तर तुरळक पाऊसचं नोंदला गेला.
एल निनो(El Niño) सक्रिय झाल्याची घोषणा जरी झाली असली तरी त्याची तीव्रता हिवाळ्यापर्यंत वाढू लागते. जुलै, ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यांमध्ये मान्सूनवरील पकड मजबूत होते. त्यामुळे जून महिन्यात झालेल्या कमकुवत पावसाला एल निनो जबाबदार नाही हे स्पष्ट होतं. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, जूनच्या अखेरीस मान्सूनचा प्रवास कमीच राहील पण जुलैच्या सुरुवातीपासून पुन्हा मजबूत होणार आहे. पावसाचा जोर वाढण्यास महाराष्ट्राच्या किनारपट्टीपासून सुरुवात होईल. त्यानंतर पावसासाठी पोषक वातावरण कायम राहिल्यास संपूर्ण देशात विस्तार होईल. मुंबईसह कोकण किनारपट्टीवरील अनेक भागांमध्ये जुलै महिन्यात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातही कोसळणार. जून ते सप्टेंबर दरम्यान 60% पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. तर यंदा सरासरीच्या 10 टक्के कमी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आले असून सरासरीच्या कमी पावसामुळं देशभर दुष्काळाचे सावट घोंगावत असून त्या दृष्टीने आता प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे.
https://prahaar.in/2026/06/28/seven-people-including-two-women-arrested-in-kerala-in-a-drug-smuggling-case/
यंदा भारताला तुलनेने कमकुवत मान्सूनचा सामना करावा लागत असून खरीप पिकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. कमी पावसामुळे सर्वाधिक प्रभावित होण्याची शक्यता असलेल्या जिल्ह्यांसाठी कृषी मंत्रालयाने आपत्कालीन योजना तयार केल्या आहेत. यासह 25 टक्के किंवा त्याहून कमी सिंचन व्याप्ती असलेल्या 111 जिल्ह्यांना ‘उच्च प्राधान्य'(High priority) देऊन हस्तक्षेपाची गरज असल्याचे ओळखले आहे, असे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान(Shivraj Singh Chauhan) यांनी सांगितले आहे.
देशाचे कृषी क्षेत्र आणि जलाशये भरण्यासाठी मान्सून अत्यंत महत्त्वाचा आहे. सरकारी अधिकाऱ्यांनी तातडीने जल व्यवस्थापन आणि पायाभूत सुविधांची देखभाल करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. मुंबई, ठाणेसह अनेक शहरांमध्ये पाणी वापरावरील निर्बंधही लागू करण्यात आले आहेत. 2026 च्या उत्तरार्धात एल निनोचा प्रभाव वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे, ज्यामुळे दुष्काळाची परिस्थिती निर्माण होऊन $4 ट्रिलियन अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो. अशी देखील भीती व्यक्त केली जात आहे.