भिवंडी : भिवंडी शहरातील मुंबई-नाशिक महामार्गावरील निम्बोळी परिसरात रविवारी (२८ जून) टायर आणि लाकडी पॅलेटच्या गोदामाला भीषण आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. गोदामात मोठ्या प्रमाणात टायर आणि लाकडी साहित्य साठवलेले असल्याने काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केले. या भीषण आगीने शेजारील काही दुकानांनाही आपल्या विळख्यात घेतल्याने नुकसान वाढले आहे. (Bhiwandi Fire)
मुंबई-नाशिक महामार्गालगत निम्बोळी गावाजवळ असलेल्या या गोदामातून अचानक धुराचे प्रचंड लोट आणि आगीच्या उंच ज्वाळा उसळू लागल्या. स्थानिक नागरिकांनी तातडीने अग्निशमन दलाला माहिती दिल्यानंतर भिवंडी अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. (Bhiwandi Fire)
https://prahaar.in/2026/06/28/upsc-recruitment-2026-direct-recruitment-for-105-posts-in-the-central-government-by-when-can-you-apply/
गोदामात मोठ्या प्रमाणावर टायर आणि लाकडी पॅलेटचा साठा असल्याने आग वेगाने पसरत असून ती विझविण्याचे काम अत्यंत कठीण ठरत आहे. त्यातच घटनास्थळी पाण्याचा तुटवडा जाणवत असल्याने अग्निशमन दलाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी अतिरिक्त पाण्याच्या टँकरचीही मदत घेण्यात येत असल्याची माहिती आहे. (Bhiwandi Fire)
या आगीमुळे काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुरक्षेच्या दृष्टीने परिसरातील नागरिकांना सुरक्षित अंतरावर हलविण्यात आले असून, वाहतूक व्यवस्थेवरही काही प्रमाणात परिणाम झाला. सुदैवाने, या घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. मात्र, गोदाम आणि शेजारील दुकानांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Bhiwandi Fire)
https://prahaar.in/2026/06/28/karachi-attack-pakistan-shaken-suicide-attack-on-rangers-camp-in-karachi-many-injured/
दरम्यान, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आग पूर्णपणे विझल्यानंतर पंचनामा करून या दुर्घटनेमागील कारणांचा सखोल तपास केला जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. (Bhiwandi Fire)
View this post on Instagram