Home साप्ताहिक कोलाज प्रामाणिकपणा

प्रामाणिकपणा

0
प्रामाणिकपणा

जीवनगंध-पूनम राणे

शाळा सुरू व्हायला अवघे दोन दिवस बाकी होते. सरला मॅडम आपल्या घराची साफसफाई करण्यात गुंग होऊन गेल्या होत्या. त्यांचा भला मोठा रो हाऊस होता. सभोवती बागबगीचे होते. सोबतीला रखमा होतीच आणि महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या मोठ्या मुलाचे लग्नही ठरलेले होते. त्यामुळे पाऊस पडायच्या अगोदर आपल्या घराची साफसफाई करावी, असा विचार करून त्या कपाटातील खण अन् खण स्वच्छ करत होत्या.घरामध्ये ७५ वर्षांच्या सेवानिवृत्त सासूबाई होत्या. महानगरपालिकेत त्या नोकरीला होत्या. इतकी वर्षे झाली तरी, त्या सतत साडी परिधान करत असत.त्या सरलाला म्हणाल्या, ‘अगं सरला,’ आता मला जरीकाठीच्या साड्या पेलवत नाहीत. तू सुद्धा काही त्या साड्या परिधान करत नाहीस. आपली पुढील येणारी पिढी सुद्धा त्या साड्या परिधान करणार नाही. माझ्या साड्या या रखमाला दे.

सासुबाईंचे बोलणे ऐकून सरलाने त्यांच्या साड्या काढल्या. प्रत्येक साडीमागे सासुबाईंच्या आठवणी दडलेल्या होत्या. भावाच्या लग्नातील, भाचीच्या लग्नातील, आपल्या निरोप समारंभाच्या वेळी आपल्या मैत्रिणीकडून मिळालेली भेट, वाढदिवसानिमित्त खरेदी केलेली, अशा कितीतरी साड्या त्यामध्ये होत्या. जवळजवळ वीस साड्या सरलाने रखमाला दिल्या. मोठ्या आनंदाने रखमा त्या साड्या घेऊनघराकडे निघाली.खरं म्हणजे रखमाच्या मुलीचे सुद्धा लग्न ठरलेले होते. सरलाच्या सासूच्या साड्या म्हणजे रकमाच्या घरच्या लोकांना त्या नवीनच वाटत होत्या. काही साड्यांच्या घड्या देखील मोडलेल्या नव्हत्या. त्यामध्ये अतिशय सुंदर गुलाबी रंगाचा एक शालू देखील होता. रकमाच्या मुलीला तो अत्यंत आवडला. कितीतरी सिल्क पिवर सिल्क किमती साड्या त्यामध्ये होत्या. श्रीमंतांना त्या नकोशा वाटल्या तरी, सर्वसामान्यांना त्या नवीनच वाटत असतात. रखमाची मुलगी रखमाला म्हणाली, ‘आई तू माझ्या साखरपुड्यासाठी नवीन साडी खरेदी करू नकोस. या साड्या अगदी नव्या कोऱ्या वाटतात. साखरपुड्याला परिधान करेन’.

गुलाबी रंगाची पिवर सिल्क साडी रखमाच्या मुलीला अत्यंत आवडली. प्रथम तिने ती नेसून पाहावी असे ठरवले. यासाठी प्रथम तिने त्या रंगाचा ब्लाऊज पीस खरेदी केला. ब्लाऊज मिळताच तिने ती साडी परिधान करण्यासाठी घेतली. साडीची घडी मोडताच त्यामध्ये पाचशे रुपयांच्या दहा नोटा सापडल्या. रखमाच्या मुलीने ताबडतोब आपल्या आईला ही गोष्ट सांगितली. आईने ओळखले सरला मॅडमच्या सासुबाईंनी कदाचित हे पैसे साडीच्या घडीत ठेवले असावेत आणि त्या विसरल्या असाव्यात.रखमा ते पाच हजार रुपये घेऊन सरलाच्या घरी गेली. घडलेली हकीकत सांगितली. सासुबाई कान देऊन ऐकत होत्या. त्या म्हणाल्या, ‘अगं रखमा अगं मी ठेवले असतील साडीच्या घडीत.’आणि विसरलेही असेल. आता ते पैसे तू परत आम्हाला देऊ नकोस. ते तुझ्याकडेच ठेव.तुझा प्रामाणिकपणा खरंच वाखाणण्याजोगा आहे. परिस्थितीने तू गांजली असलीस तरी, सत्य आणि प्रामाणिकपणा हे दोन विशेष गुण तुझ्या अंगी आहेत. हे मी जाणत नाही का! अगं गेली तीस वर्षे तू आमच्याकडे येतेस. आमच्या घरातील एक सदस्य होऊन गेली आहेस. अगं मागच्या वेळेला कपडे धुताना यांच्या पँटीत तुला असेच दोन हजार रुपये सापडले होते. तू लगेच माझ्या हातावर आणून ठेवले. तुझी सवय मला माहीत नाही का? असे म्हणून सरला मॅडमच्या सासुबाईंनी आपल्याकडून दहा हजार रुपये रखमाला तिच्या मुलीच्या साखरपुड्यासाठी दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here