स्थायी समितीने प्रस्तावाला दिली मंजुरी
मागील पाच वर्षांपासून कंत्राटदाराने थांबवले होते काम
महापालिकेने नव्याने नेमला कंत्राटदार
मुंबई : परळमधील (Parel) कोविडपूर्वी हाती घेण्यात आलेल्या शिरोडकर मंडईच्या पुनर्विकास प्रकल्प कामांतील कंत्राटदाराने पळ काढल्यानंतर आता येथील प्रकल्पाचे काम अर्धवट राहिले होते. या कामाला गती देण्याच्या दृष्टीकोनातून नव्याने नियुक्त केेलेल्या कंत्राट कामाला स्थायी समितीने मंजुरी दिली. त्यामुळे तब्बल पाच वर्षांनी रखडलेल्या या प्रकल्पाच्या कामाला आता प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे.
परळ येथील जगन्नाथ भातणकर मार्गावरील महानगर पालिकेच्या मालकीच्या डॉ. शिरोडकर मंडई वसलेल्या भूकर क्र. ९२ व ९४ (भागशः), परळ शिवडी विभाग धारण करणा-या भूखंडाचा पुनर्विकास करुन त्या ठिकाणी महापालिका मंडई आणि कर्मचारी निवासस्थाने बांधण्यासाठी सन २०१८मध्ये कंत्राटदाराची निवड करण्यात आली होती. त्यानुसार डिसेंबर २०१८ पासून प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली. परंतु सन २०२३ नंतर भूखंडाच्या काही जागेवर पुर्वीच्या बंद करण्यात आलेल्या कंत्राटाअंतर्गत तळ घर आणि तळ मजला तसेच एक ते सहा मजल्याचे बांधकाम केल्यानंतर कंत्राटदाराने पुढील काम करण्यास असमर्थता दर्शवली. आज येथील तळ घरामध्ये मासळी बाजार भरत आहे.
https://prahaar.in/2026/06/26/bmc-news-rat-enters-municipal-corporation-hall-panic-among-corporators/
पूर्वी २१ मजल्याचे बांधकाम केले जाणार होते, आता त्यासोबतर ४८ मजल्याची उत्तुंग इमारतही बांधली जाणार आहे. त्यामुळे या अर्धवट राहिलेल्या प्रकल्पातील (Project) सद्यस्थितीतील इमारतीमधील (Building) उर्वरित कामे पूर्ण करणे व तिचे २१ मजल्यांपर्यंतचे बांधकाम करणे आणि उर्वरित रिकाम्या भुखंडावर जुन्या इमारतीशी संलग्न नवी इमारत तळघरासह ४८ मजल्यांपर्यंत बांधकाम करण्यासाठी नव्याने कंत्राटदार नेमण्यात आला आहे. यामध्ये मूळ कंत्राट २३९.५० कोटी रुपये आणि विविध करांसह २९७.९२ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. कुणाल आणि हिराणी या संयुक्त भागीदार कंपनीची निवड करण्यात येत आहे.
याबाबचा प्रस्ताव आला असता यामिनी जाधव यांनी यापूर्वीच्या कंत्राटदाराने काम अर्धवट का सोडले असा सवाल केला. तर यशवंत किल्लेदार यांनी ४३ हजार ४५८ चौरस मीटरचे बांधकाम केली आहेत, यामध्ये निवासी तसेच सेवा निवासस्थाने तसेच प्रकल्प बाधितांसाठी किती सदनिका असतील अशी विचारणा केली. तर यशोधर फणसे यांनी या मंडईच्या जागेत वर्सोवा येथील कोळी महिला व्यवसाय करत असून या मंडईच्या इमारतीच्या बांधकामासाठी सविस्तर सादरीकरण व्हावे अशी मागणी केली.
डॉ सईदा खान यांनी या अर्धवट कामासाठी पेमेंट दिले आहे का असा सवाल करत सल्लागार म्हणून मेंहेंदळे असोशिएट्स ही कंपनी आहे. हे महापालिकेचे निवृत्त अधिकारी होते. मग त्यांना सल्लागार म्हणून कसे नियुक्त केले असा सवाल केल. भाजपच्या प्रिती सातम यांनी आदित्य ठाकरे यांनी भूमिपुजन केलेल्या आणि रखडलेल्या या प्रकल्पाला गती देण्यासाठी हा प्रस्ताव आणला गेला त्याबद्दल अध्यक्षांचे आभार मानले.तसेच येथील तळघरात सध्या कोळी भगिनींना कोंबून ठेवले आहे. त्यांना ना विजेची सोय ना, प्रसाधनगृहाची ना स्वच्छतेची असा सवाल केला. त्यामुळे याठिकाणी स्थायी समितीच्यावतीने भेट द्यावी, जेणेकरून कोळी भगिनींच्या व्यथा आणि समस्या निदर्शनास येतील,असे सांगत याठिकाणी सुविधा पुरवणे आवश्यक असल्याचे सांगितले.
https://prahaar.in/2026/06/26/jharkhand-accident-news-truck-rams-into-passenger-vehicle-in-ramgarh-7-dead/
मिनाक्षी पाटणकर यांनी टर्न कि बेसवर याचे बांधकाम का केले जात आहे असा सवाल केला जात आहे. तर तेजिंदर सिंग तिवाना यांनी संयुक्त भागीदारी कंपनीतील एकाची आर्थिक स्थिती कमी दिसून येत असून हा रखडलेला प्रकल्प पाहता प्रशासनाने याची काळजी घेतली जावी,अशा सूचना केल्या. तर श्रध्दा जाधव यांन वरळी शिवडी लिंक रोडवरील प्रकल्प बाधितांना याठिकाणच्या इमारतीमध्ये पुनर्वसन व्हावे अशी सूचना केली. यावर प्रशासनाच्यावतीने कोविडमुळे हा प्रकल्प रखडला होता. त्यामुळे विकासकाने यावर ३० टक्के रक्कम वाढवून देण्याची मागणी केली होती. पण नियमानुसार त्यांना १० टक्के वाढीव देवू शकतो. त्यामुळे हा करार संपुष्टात आणला होता. त्यामुळे संबंधित कंपनीला आपण दंड आकारला नाही. त्यामुळे सध्या सहा मजल्याच्या अर्धवट इमारतीच्या जागेवर २१ मजल्याची इमारत बांधली जाणार आहे आणि या व्यतिरिक्त ४८ मजल्याची इमारत बांधली जाणार आहे. प्रशासनाच्यावतीने ही माहिती देण्यात आल्यानंतर स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी सदस्यांनी उपस्थित केलेल्या सर्व मुद्यांची उत्तरे देण्याचे निर्देश देत या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.