महापौर आणि आयुक्तांनी खरेदी केल्या छत्री
मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या नियोजन विभागाच्या सहकार्याने आणि ‘दि नॅशनल असोसिएशन ऑफ डिसएबल्ड एंटरप्रायजेस’ (NADE) या संस्थेच्या वतीने दिव्यांग व्यक्तींनी तयार केलेल्या ‘नेत्रा’ ब्रँडच्या छत्री व रेनकोट यांचे प्रदर्शन मुंबई महानगरपालिका मुख्यालयात भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाला मुंबईच्या महापौर रितू तावडे (Ritu Tawde) तसेच महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे (Ashwini Bhide) यांनी भेट दिली आणि आपण स्वतः ऑनलाईन पेमेंट करत छत्री विकत घेतली. आयुक्तानी स्वतः छत्री घेतल्याने दिव्यांगांच्या चेहऱ्यावरी आनंद द्विगुणित झालेला पाहायला मिळत होता.

या दालनास मुंबईच्या महापौर रितू तावडे, यांनी मंगळवारी २३ जून २०२६ रोजी भेट दिली. तसेच महिला व बाल कल्याण समिती अध्यक्ष मीनल तुर्डे, महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनीही प्रदर्शनाला भेट दिली. या दालनास महानगरपालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. महानगरपालिकेच्या सर्व प्रशासकीय विभागांमध्ये (वॉर्ड ऑफिस) हे प्रदर्शन भरविण्यात आले होते.
https://prahaar.in/2026/06/23/weather-update-the-next-24-hours-are-crucial-for-maharashtra-a-yellow-alert-has-been-issued-for-30-districts-in-the-state-is-the-monsoon-set-to-arrive-soon/
महापौर रितू तावडे यांनी प्रदर्शनातील उत्पादनांची पाहणी करून तीन छत्री खरेदी केल्या. तसेच प्रदर्शनात सहभागी असलेले दिव्यांग उद्योजक विक्रम मोरे यांच्याशी संवाद साधत त्यांच्या कामकाजाची माहिती घेतली आणि त्यांच्या जिद्दीचे व उद्यमशीलतेचे कौतुक केले. तत्पूर्वी महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी सोमवारी या प्रदर्शनाला भेट देत एक छत्रीची खरेदी केली होती.
दिव्यांग व्यक्तींनी तयार केलेल्या छत्री, रेनकोटची गुणवत्ता पाहून त्यांच्या कौशल्याचे आणि चिकाटीचे कौतुक वाटते. अशा वस्तुंचे प्रदर्शन भरविण्याच्या उपक्रमांमुळे दिव्यांग घटकांबाबत, त्यांच्या कौशल्यांबाबत जनजागृती होण्यास मदत होते. तसेच दिव्यांगांचा आत्मविश्वासही दुणावतो, असे मत मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी व्यक्त केले.दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबनासह समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांच्या उत्पादनांना व्यापक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिकेच्या नियोजन विभागातर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनामुळे दिव्यांग व्यक्तींच्या उत्पादनांविषयी नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण होण्यास मदत होत असून, त्यांच्या आत्मविश्वासातही भर पडत आहे.

https://prahaar.in/2026/06/23/four-arrested-four-officials-suspended-in-lucknow-coaching-class-fire-case/
महिला व बाल कल्याण समिती अध्यक्ष मीनल तुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली भरविण्यात आलेल्या या प्रदर्शनास मोठ्या संख्येने अभ्यागतांनी भेट दिली आहे. ‘नेत्रा’ ब्रँडच्या उत्पादनांना मिळालेला प्रतिसाद दिव्यांग उद्योजकांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरत आहे, असे संचालक (नियोजन) डॉ. प्राची जांभेकर यांनी सांगितले.