Pusegaon (Satara): सातारा जिल्ह्यातील पुसेगाव येथे गुरुवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरच्या साहाय्याने बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडून तब्बल ६ लाख ६१ हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या धाडसी चोरीमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
https://prahaar.in/2026/06/20/fifa-worldcup-2026-new-rule-proves-costly-for-paraguay-player/
काय घडली घटना?
पुसेगाव येथील सातारा-पंढरपूर रस्त्यावरील सेवागिरी कॉम्प्लेक्समध्ये बँक ऑफ इंडियाचे एटीएम आहे. शुक्रवार, १९ जून रोजी पहाटे सव्वाचारच्या सुमारास पांढऱ्या रंगाच्या विना नंबर प्लेट असलेल्या कारमधून काही चोरटे घटनास्थळी आले. त्यांनी एटीएमचे शटर उचकटून आत प्रवेश केला आणि गॅस कटरच्या साहाय्याने मशीन कापून त्यातील ५०० रुपयांच्या १,३२२ नोटा, म्हणजेच ६ लाख ६१ हजार रुपयांची रोकड लंपास केली. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने चोरट्यांनी एटीएममधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचेही नुकसान केले आहे.
https://prahaar.in/2026/06/20/more-than-9-million-farmers-in-the-state-will-receive-significant-relief-ahead-of-the-kharif-season/
पोलिसांची नाकाबंदी आणि तपास
एटीएम फोडताना होणारा आवाज ऐकून इमारतीमधील रहिवाशांना संशय आला. त्यांनी तातडीने पुसेगाव पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी चोरट्यांचा पाठलाग सुरू केला, मात्र चोरटे दहिवडीपर्यंत जाऊन नंतर फलटण मार्गे दौंडच्या दिशेने पसार झाल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून स्पष्ट झाले आहे.
पुसेगावचे सहायक पोलिस निरीक्षक एन. जे. खुणे यांनी या घटनेची पुष्टी केली असून, सहायक फौजदार डी. बी. बर्गे अधिक तपास करत आहेत. या घटनेनंतर सातारा जिल्ह्यातील लगतच्या सर्व पोलिस ठाण्यांना सतर्क करण्यात आले असून, जिल्ह्यामध्ये नाकाबंदी करण्यात आली आहे.