Nashik Crime : नाशिकमध्ये घडलेल्या एका धक्कादायक घटनेनं सर्वानाच हादरा बसला आहे. नव्या संसाराची स्वप्ने डोळ्यांत साठवून सासरी गेलेल्या २२ वर्षीय विवाहितेने अखेर जीवनालाच पूर्णविराम दिला आहे. याचं कारणही तितकंच धक्कादायक आहे. शहरातील ध्रुवनगर परिसरातील जिजामाता कॉलनी (शिवाजीनगर) येथे घडली आहे. पतीच्या अनैतिक संबंधांमुळे सतत मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याने या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे.
https://prahaar.in/2026/06/18/the-stage-is-left-bereft-veteran-artist-prasad-savkar-has-passed-away/
नेमकं प्रकरण काय ?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साक्षी वैभव गोरे (वय २२) असे मृत विवाहितेचे नाव असून वैभव रावसाहेब गोरे (वय २३) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साक्षी ही निफाड (Niphad) तालुक्यातील रामनाथ दत्तू पगार यांची एकुलती एक मुलगी. एप्रिल २०२४ मध्ये मोठ्या कुटुंबाने मोठ्या आनंदात तिचा विवाह वैभव गोरे या तरुणासोबत लाऊन दिला होता. संसाराच्या नव्या वाटेवर पाऊल ठेवताना तिनेही इतर मुलींप्रमाणे सुखी आयुष्याची स्वप्ने पाहिली. मात्र, पदरी निराशा पडली. लग्नानंतर काही दिवसांतच तिच्या आयुष्यात निराशेचे ढग दाटू लागले.
फिर्यादीनुसार, वैभव गोरे याचे ध्रुवनगर (Dhruvanagar) परिसरातील एका महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याचे साक्षीला समजले. या प्रकारामुळे ती मानसिकदृष्ट्या खचून गेली होती. संसार टिकावा, नातेसंबंध सुधारावेत आणि पतीने आपले वर्तन बदलावे यासाठी साक्षीने अनेकदा प्रयत्न केले. तिच्या माहेरच्या कुटुंबीयांनीही वैभवची वारंवार समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा काहीही परिणाम झाला नाही असा आरोप करण्यात आला आहे.
https://prahaar.in/2026/06/18/horrific-accident-in-himachal-7-dead-after-car-plunges-into-gorge/
‘मला इथून घेऊन जा…’
मंगळवारी (१६ जून) दुपारी साक्षीने तिच्या मामाला फोन करून मनातील वेदना व्यक्त केल्या होत्या. पती पुन्हा संबंधित महिलेच्या घरी गेल्याचे आपण स्वतः पाहिल्याचे तिने सांगितले. यानंतर तिचा आणि त्या महिलेचा वादही झाला होता. मानसिकदृष्ट्या पूर्णपणे खचलेल्या साक्षीने मामाला, “तुम्ही काहीही करा, पण मला इथून तातडीने घेऊन जा,” अशी विनंती केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. फोनद्वारे केलेला हा तिच्या आयुष्यातील शेवटचा संवाद ठरला. काही वेळानंतर दुपारी दोनच्या सुमारास साक्षीने राहत्या घरात गळफास घेतल्याचे समोर आले. घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला.
https://prahaar.in/2026/06/18/nahi-bolunga-marathi-row-erupts-at-mumbai-central-railway-enquiry-counter-after-staffer-refuses-to-speak-marathi-video-viral/
एकुलत्या एका मुलीच्या जाण्याने कुटुंबावर शोककळा
साक्षी ही आई-वडिलांची एकुलती एक मुलगी होती. तिच्या निधनामुळे संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे. मुलीचा संसार सुखाचा व्हावा यासाठी आई-वडिलांनी केलेली स्वप्ने एका क्षणात भंगली. या घटनेने परिसरातही हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, गंगापूर पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांनी (Gangapur Police) फिर्यादीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.