Home ब्रेकिंग न्यूज Goregaon-Mulund Link Road : गोरेगाव – मुलुंड जोड मार्ग प्रकल्प विहीत मुदतीत पूर्ण करावा

Goregaon-Mulund Link Road : गोरेगाव – मुलुंड जोड मार्ग प्रकल्प विहीत मुदतीत पूर्ण करावा

0
Goregaon-Mulund Link Road : गोरेगाव – मुलुंड जोड मार्ग प्रकल्प विहीत मुदतीत पूर्ण करावा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : गोरेगाव – मुलुंड जोड मार्ग ( जी एम एल आर) प्रकल्प टप्पा ३ – ब अंतर्गत दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात जुळ्या बोगद्याच्‍या बांधकामासाठी बोगदा खनन संयंत्र (टीबीएम ) चे सुटे भाग ‘शाफ्ट’मध्ये जोडण्यात येत आहेत. तसेच, गोरेगाव – मुलुंड जोड मार्ग अंतर्गत दिंडोशी ते गोरेगाव दरम्यान उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू आहे. महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी बुधवारी १७ जून २०२६ रोजी या प्रकल्‍प स्थळास प्रत्यक्ष भेट देवून कामांची पाहणी केली. कामाच्या प्रगतिचा सविस्तर आढावा घेत कामकाजाची गती आणि गुणवत्तेची पडताळणी करून संबंधित अभियंत्‍यांना आवश्यक ते निर्देश दिले.

https://prahaar.in/2026/06/17/vidyavihar-flyover-good-news-for-mumbaikars/

महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे म्‍हणाल्‍या की, गोरेगाव – मुलुंड जोड मार्ग हा मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा महत्त्वाकांक्षी व बहुप्रतीक्षित पायाभूत सुविधा प्रकल्प आहे. त्याच्या पूर्णत्वामुळे दोन्ही उपनगरांमधील प्रवास अधिक जलद, सुलभ आणि सुरक्षित होणार आहे. प्रकल्पाच्या टप्पा ३ – ब अंतर्गत दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात उभारण्यात येत असलेल्या जुळ्या बोगद्यांच्या कामासाठी बोगदा खनन संयंत्राचे सुटे भाग शाफ्टमध्ये जोडण्याचे काम वेगाने सुरू आहे. या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने बोगदा खणकाम अधिक सुरक्षित, अचूक आणि कार्यक्षम पद्धतीने करण्यात येणार आहे.

https://prahaar.in/2026/06/17/stay-on-dr-ashwini-joshis-transfer-new-order-issued/

तसेच, दिंडोशी ते गोरेगाव दरम्यान उभारण्यात येत असलेल्या उड्डाणपुलाचे कामही नियोजनानुसार प्रगतिपथावर असून, या उड्डाणपुलामुळे परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास आणि प्रवासाचा कालावधी लक्षणीयरीत्या घटण्यास मदत होणार आहे. या रस्‍ते प्रकल्पातील सर्व कामे निर्धारित वेळापत्रकानुसार पूर्ण करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ, यंत्रसामग्री आणि संसाधनांचे प्रभावी नियोजन करावे. कामाच्या गुणवत्तेसह सुरक्षा मानकांचे काटेकोर पालन करावे, असे निर्देश संबंधित अभियंते व कंत्राटदारांना देण्‍यात आले. या प्रसंगी अतिरिक्‍त आयुक्‍त (प्रकल्‍प) अभिजीत बांगर, उप आयुक्‍त (महानगरपालिका आयुक्‍त कार्यालय) प्रशांत गायकवाड, उप आयुक्‍त (विशेष अभियांत्रिकी) पुरूषोत्‍तम माळवदे, उप आयुक्त (अभियांत्रिकी) शशांक भोरे, प्रमुख अभियंता (पाणीपुरवठा प्रकल्‍प) चंद्रकांत चौधरी, प्रमुख अभियंता (मुंबई मलनिस्सारण प्रकल्प) अशोक मेंगडे, प्रमुख अभियंता (पूल) राजेश मुळे यांच्‍यासह संबंधित अभियंते, अधिकारी यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here