– ‘देवगिरी’वर मध्यरात्री खलबते; संघटनात्मक पातळीवर मोठे फेरबदल होणार
मुंबई : रुपाली चाकणकर यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागल्यानंतर, आता या रिक्त पदावर वैशाली नागवडे यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या ‘देवगिरी’ या शासकीय निवासस्थानी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची सोमवारी मध्यरात्री महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी आणि रिक्त पदे भरण्यासाठी सविस्तर चर्चा झाली. पक्षाच्या संघटनात्मक पातळीवर मोठे फेरबदल करण्यावर ज्येष्ठ नेत्यांचे एकमत झाले असून, वैशाली नागवडे यांच्या रूपाने पक्षाला नवा महिला चेहरा मिळण्याची चिन्हे आहेत.
https://prahaar.in/2026/06/16/horrific-minibus-accident-on-the-shahapur-murbad-road-driver-killed-three-passengers-critically-injured/
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणानंतर रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष पदासह राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तेव्हापासून हे पद रिक्त होते. ‘देवगिरी’वरील या बैठकीला ज्येष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ, कार्याध्यक्ष प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह पार्थ पवार प्रामुख्याने उपस्थित होते. या बैठकीत महिला प्रदेशाध्यक्षपदासह युवक, विद्यार्थी आणि युवती विभागातील फेरनियुक्त्यांवर अंतिम शिक्कामोर्तब झाल्याची विश्वासनीय माहिती आहे.
पक्षाची विस्कळीत झालेली घडी पुन्हा बसवण्यासाठी महिला प्रदेशाध्यक्ष आणि युवक अध्यक्ष या अत्यंत महत्त्वाच्या व प्रभावी पदांवर नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचे नेत्यांनी ठरवले आहे. दुसरीकडे, विद्यार्थी अध्यक्ष आणि युवती अध्यक्ष या पदांवर मात्र सध्या कार्यरत असलेल्या पदाधिकाऱ्यांनाच पुन्हा संधी देत त्यांची फेरनियुक्ती करण्यात येणार असल्याचे संकेत मिळाले आहेत/
https://prahaar.in/2026/06/16/water-storage-in-ahilyanagar-district-has-dropped-to-just-24-54-percent/
महिला आयोगाबाबत निर्णय प्रलंबित
– सूत्रानी दिलेल्या माहितीनुसार, महिला प्रदेशाध्यक्ष पदासाठी वैशाली नागवडे, युवक अध्यक्ष पदासाठी निखिल ठाकरे आणि विद्यार्थी अध्यक्ष म्हणून आकाश झांबरे (फेरनियुक्ती) यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे कळते.
– राष्ट्रवादीच्या कोट्यातील राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करावी, याबाबत या बैठकीत निर्णय होऊ शकलेला नाही. रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यानंतर या पदासाठी सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा शिंदे, डॉ. ज्योती मेटे आणि सुनेत्रा पवार यांच्या निकटवर्तीय वैशाली मोठे यांची नावे चर्चेत आहेत.
– त्याचप्रमाणे शिवसेनेच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शायना एनसी यांच्या नावाबाबतही या बैठकीत चर्चा झाली. त्यांना राष्ट्रवादीत प्रवेश देऊन या पदावर नियुक्ती करण्याबाबतचा प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर चर्चिला गेल्याची माहिती सुनेत्रा पवार यांनी बैठकीत दिली.