राज्य सरकारकडून अभ्यास गट स्थापन; मार्गांचे सुसूत्रीकरण आणि ‘टेलिस्कोपिक भाडे’ रचनेवर होणार काम
मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) विविध शहरांमध्ये प्रवास करणाऱ्या कोट्यवधी प्रवाशांसाठी खुशखबर आहे. ‘एमएमआर’ क्षेत्रातील सर्व सार्वजनिक बस सेवांमध्ये सुसूत्रता आणून प्रवाशांना एकाच तिकिटावर संपूर्ण प्रवास करता यावा, यासाठी नगर विकास विभागाने सोमवारी उच्चस्तरीय ‘अभ्यास गट’ स्थापन केला आहे. हा अभ्यास गट प्रामुख्याने बस मार्गांचे सुसूत्रीकरण करणे, वेळापत्रकांचा मेळ घालणे आणि प्रवाशांना वाजवी दरात प्रवास देणाऱ्या ‘टेलिस्कोपिक भाडे’ रचनेवर काम करणार आहे. यामुळे भविष्यात मुंबई आणि आसपासच्या उपनगरांतील प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ, जलद आणि किफायतशीर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
नीति आयोगाने देशभरातील प्रमुख शहर-क्षेत्रांना आर्थिक वाढीसाठी ‘ग्रोथ हब’ म्हणून विकसित करण्याची संकल्पना मांडली आहे. या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत देशात ‘पायलट सिटी-रिजन’ म्हणून ‘मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रा’ची निवड करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील ‘ग्रोथ हब नियामक मंडळा’ने दिलेल्या निर्देशानुसार, या संपूर्ण क्षेत्रासाठी एकात्मिक बस वाहतूक आराखडा तयार करण्याची प्रक्रिया गतिमान करण्यात आली आहे.
https://prahaar.in/2026/06/15/smart-meter-jayant-patil-meets-devendra-fadanvis/
एमएमआरमधील सर्व बस सेवांचे जाळे एकमेकांशी जोडण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘तांत्रिक गटा’च्या अध्यक्षपदाची जबाबदारी बृहन्मुंबई विद्युत पुरवठा व परिवहन लि. (बेस्ट) च्या सहायक महाव्यवस्थापकांकडे (वाहतूक आणि संचालन) सोपवण्यात आली आहे. या गटात नवी मुंबई, ठाणे, मीरा-भाईंदर, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार आणि पनवेल महानगर परिवहन सेवांच्या वाहतूक व्यवस्थापकांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे.
नेमके काम काय करणार?
– एमएमआर क्षेत्रातील सर्व महापालिकांच्या बस मार्गांचा सर्वंकष अभ्यास करून नवीन सुसंगत मार्ग प्रस्तावित करणे.
– सर्व परिवहन सेवांच्या सुसंगत वेळापत्रकांचे मूल्यमापन करणे आणि तंत्रज्ञान एकात्मिकरणासाठी रोडमॅप तयार करणे.
– दोन किंवा अधिक शहरांच्या अधिकारक्षेत्रातून जाणाऱ्या आंतरशहरी फेऱ्यांसाठी एकत्रित भाडेदर निश्चित करणे आणि या महसुलाच्या वाटपाची पद्धत सुचविणे.
– या तांत्रिक गटाला आपला सविस्तर अहवाल १५ जुलै २०२६ पर्यंत अभ्यास गटाकडे सादर करावा लागणार आहे.
https://prahaar.in/2026/06/15/smart-meter-jayant-patil-meets-devendra-fadanvis/
भाडे रचना कशी असेल?
– तांत्रिक गटाच्या शिफारसींवर अंतिम निर्णय घेण्यासाठी ‘बेस्ट’च्या महाव्यवस्थापकांच्या अध्यक्षतेखाली एक मुख्य ‘अभ्यास गट’ स्थापन करण्यात आला आहे. या अभ्यास गटात ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार, मीरा-भाईंदर, भिवंडी-निझामपूर, उल्हासनगर आणि पनवेल महानगरपालिकेच्या आयुक्तांचा सदस्य म्हणून समावेश आहे.
– या अभ्यास गटाच्या कार्यकक्षेत प्रवाशांच्या सोयीसाठी सध्याच्या भाडे रचनेचे सुसूत्रीकरण करणे समाविष्ट आहे. विशेषतः लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी प्रवाशांचा खर्च कमी व्हावा या दृष्टीने ‘टेलिस्कोपिक भाडे’ पद्धती (म्हणजेच अंतरानुसार टप्प्याटप्याने कमी होणारे भाडे) लागू करणे आणि सामायिक तिकीट प्रणाली अंतर्गत मिळणाऱ्या महसुलीच्या विभाजनाचे सूत्र सुनिश्चित करण्याचे महत्त्वाचे काम हा गट करणार आहे.